रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई


अवघ्या पंचविसाव्या वर्षी ऐन तारुण्यात महाराणी ताराबाईंवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. मोगल-मराठा संघर्षात राजाराममहाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची खूप मोठी हानी झाली. राजाराम महाराजांच्या जाण्यामुळे जी एक पोकळी निर्माण झाली होती, ती ताराबाईंनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली. काळाने दिलेले आव्हान स्वीकारून त्यांनी हिंदुस्थानाच्या इतिहासात शौर्यशाली राणी म्हणून लौकिक मिळविला. कवी देवदत्त आपल्या काव्यात तिच्या कर्तृत्वाचे वर्णन करतो :

"दिल्ली झाली दीनवाणी

दिल्लीशाचे गेले पाणी

ताराबाई रामराणी

भद्रकाली कोपली ।।.....

रामराणी भद्रकाली

रणरंगी कुद्ध झाली

प्रलयाची वेळ आली

मुगलहो सांभाळा ||"

दिल्लींद्र औरंगजेबाचे पाणी घालविणारी कर्तबगार स्त्री ताराबाईंच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण झाली. तिने सात वर्षे सतत त्यांच्याशी सामना दिला आणि राजाराममहाराजांनी रक्षलेले स्वराज्य मोगलांच्या आक्रमणातून बचावले. Maharani Tarabai, Rani Tarabai, 

राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटी औरंगजेबाने मराठ्यांच्या प्रदेशात आपली मोहीम सुरू केली होती. वसंतगड किल्ला हस्तगत करून राजाराममहाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्याने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा दिला होता. हा किल्ला मराठे निकराने लढवीत होते. वेढा देऊन बसलेल्या मोगलांना त्यांनी सळो की पळो करून सोडले; परंतु बादशहाने आपला हट्ट सोडला नाही. एके दिवशी बुरुज पडून मोगलांचे हजारो सैनिक ठार झाले. प्रचंड प्राणहानी आणि वितहानी झाली. शेवटी मराठ्यांनी त्यांना किल्ला देऊन टाकला. लगेच परळीला वेढा देण्यात आला. थोड्या प्रतिकारानंतर औरंगजेबाने तोही किल्ला घेतला (सन १७००). Tarabai vs Aurangzeb, Aurangzeb and Tarabai

आतापर्यंतच्या मोहिमेत मोगलांची हजारो माणसे व जनावरे नष्ट झालेली होती. फौजेला विश्रांतीची गरज होती. म्हणून औरंगजेबाने भूषणगडाकडे कूच करून माण नदीवर छावणी टाकली; परंतु तेथेसुद्धा देव हात धुऊन त्याच्यापाठी लागले होते. दि. १ ऑक्टोबर १७०० रोजी रात्री माण नदीला प्रचंड पूर येऊन असंख्य माणसे व जनावरे पाण्यात बुडून मेली. बादशहासुद्धा कसाबसा वाचला; परंतु लंगडा होऊन बसला. Rajaram Maharaj, Chhatrapati Rajaram, 


पन्हाळा - विशाळगड काबीज

अगोदरच पन्हाळा घेण्यासाठी औरंगजेबाने आपल्या फौजा रवाना केल्या होत्या. औरंगजेब स्वत: पन्हाळ्यासमोर ९ मार्च, १७०० रोजी आला आणि वेढ्याचे काम जोमाने सुरु झाले. ताराबाईंनीही किल्ला लढविण्याचा चंग बांधला होता. पावनगडाच्या किल्लेदाराला लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाला ठेचून काढण्याची प्रेरणा त्या देत असल्याचे पुढील पत्रावरून दिसेल :

'स्वस्तिश्री राज्याभिषेक शके सत्तावीस विक्रमनामे संवत्सरे फाल्गुन शुद्ध चतुर्दशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती यांनी विठोजी केसरकर नामजाद किल्ले पावनगड यांसी आज्ञा केली ऐसीजे, तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नतिजा पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मजुरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच आहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामीची जागा जतन करणे. स्वामी उर्जीत हरबाब करतील दिलासा असो देणे.' Tarabai Biography, Indian History

खुद्द औरंगजेबाने किल्ल्यापुढे मुक्काम टाकूनसुद्धा किल्ला ताब्यात येण्याचे चिन्ह दिसेना. शेवटी शहजादा कामबक्ष याने मराठ्यांना पंचावन्न हजार रुपये देऊन किल्ला सोडून जाण्याची विनवणी केली व किल्ला ताब्यात घेतला. अशा प्रकारे औरंगजेबाने किल्ला जिंकला (सन १७०१ ). यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाने विशाळगडाकडे कूच केले. विशाळगडाजवळच्या गजापुरावर त्याने आपली छावणी केली व गडाच्या वेढ्याचे काम सुरू केले. बरेच परिश्रम घेऊनसुद्धा हा किल्ला हाती येण्याचे चिन्ह दिसेना, तेव्हा शहजादा बेदारबख्तने बादशहाची लाज राखण्यासाठी मराठ्यांना दोन लाख रुपये खंडणी देऊन किल्ला ताब्यात आणला (४ जून, १७०२.)


विशाळगडाकडून परतताना मुसळधार पाऊस सुरु झाला होता. नदीनाल्यांना प्रचंड पूर आला होता. सैन्यात धान्य व गवत यांची महर्गता फार मोठ्या प्रमाणावर होती. अशा परिस्थितीत निसर्गाशी झगडत, नाना हालअपेष्टा सोसत औरंगजेबाचे सैन्य कसेबसे पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले. विशाळगड ते पन्हाळा अंतर कापण्यास मोगली सैन्यास अडतीस दिवस लागले. माणसे, जनावरे व सामग्री यांची प्रचंड धूळधाण झाली. जितका किल्ला लढविता येईल तेवढा लढवून व मोगलांची हानी करून शेवटी त्यांच्याकडून मुबलक पैसा घेऊन त्यांना किल्ला यायचा आणि काही दिवसांनी तो परत जिंकून घ्यायचा, असे ताराबाईंचे धोरण होते.

बादशहाच्या किल्ल्यावरच्या या मोहिमा चालू असताना त्याच्या फौजा सारख्या मराठा सेनानींच्या पाठीमागे धावत होत्या. मराठ्यांनी नर्मदेच्या दक्षिणेकडील भाग, खानदेश, वऱ्हाड व कोकण या मोगलाई मुलखात धामधूम माजवली. तत्कालीन इतिहासकार म्हणतो की, 'मोगलाई परगण्यांतून आणि खेड्यांतून मराठे हे टोळ भुंग्यांप्रमाणे पसरले होते.' बादशहाच्या सैन्याची व मराठ्यांची स्थिती वर्णन करताना तो म्हणतो, 'बादशहाने विशाळगड किल्ल्याला जेव्हा वेढा घातला, त्या वेळी मराठ्यांचा जोर सर्वत्र वाढला. त्यांनी ठिकठिकाणच्या वाटा बंद पाडल्या. लूटमार करुन ते संपन्न बनले. मी तर असे ऐकले आहे की, बादशहाला आयुरारोग्य लाभावे म्हणून मराठे दर आठवड्यास देवाची प्रार्थना करून आपापसात प्रसाद व दक्षिणा वाटत. धान्य कमालीचे महाग झाले. विशेषतः, बादशहाच्या लष्करात तर उपासमारीने अनेक माणसे नष्ट झाली. लष्करात परिस्थिती सर्व प्रकारे विचित्र झाली आणि अनवस्था प्रसंग ओढवला. बादशहा गादीवर आल्यापासून तो एखाद्या शहरात राहिला आहे असे कधीच झाले नाही. सारख्या मोहिमाच मोहिमा चालू झाल्या. त्यामुळे सरदार, सैनिकांना एकाकी जीवन कंठावे लागले त्यामुळे ते बेजार झाले, त्यांनी आपली बायकामाणसे लष्करात बोलावून घेतली आणि लष्करातच त्यांनी आपला संसार थाटला, तेथेच त्यांना मुलेबाळे झाली. ती लष्करात वाढून मोठी झाली आणि लष्करातच म्हातारी झाली आणि लष्करातच मरण पावली. दगडा- मातीच्या घरांची तोंडे काही त्यांच्या दृष्टीस पडली नाहीत.'

धनाजी जाधव, त्यांचा पुत्र चंद्रसेन, नेमाजी शिंदे, हणमंतराव निंबाळकर, हिंदुराव घोरपडे, मालोजीराव घोरपडे, परशुराम त्रिंबक इत्यादी मराठी सरदारांनी औरंगजेबाच्या फौजांना व ठाणेदारांना सळो की पळो करून दहशत बसविली होती. मोगलांच्या रसदेवर, छावण्यांवर व ठाण्यांवर हल्ले करून मोगलांचा अंमल स्वराज्यात बसू दिला नव्हता. मोगलांच्या प्रदेशात मराठ्यांनी स्वाऱ्या सुरू केल्यामुळे मोगलांना मराठे अधिकच पीडादायक ठरू लागले. १७०३ मध्ये मराठ्यांनी प्रथम गुजरातेत मोहीम केली. तापी नदीच्या खोऱ्यातून खानदेश मार्गाने दौड करून त्यांनी तीस हजार सैन्यानिशी सुरतेच्या आसमंतातील प्रदेश बेचिराख केला. याच मध्ये नेमाजी शिंदे या धाडसी मराठा सरदाराने वऱ्हाडात स्वारी केली. एवढेच नव्हे तर नर्मदा ओलांडून पलीकडचा मुलूख लुटला. मराठ्यांच्या इतिहासात नर्मदा ओलांडून मोगलाईत मोहीम काढणारा नेमाजी हा पहिला शूर मराठा वीर होय. वऱ्हाडच्या मोहिमेत औरंगजेबाचा सरदार रुस्तुमखान याला कैद करून त्याने त्याची दोन हजार माणसे ठार केली. नेमाजीच्या माळव्यातील प्रवेशाने मोगली सत्तेला जबरदस्त हादरा बसला.

स्वराज्यात व स्वराज्याच्या बाहेर मोगलाई प्रदेशात मराठ्यांचा जोर वाढतच होता. मोगली सैन्य औरंगजेबाच्या युद्धखोर धोरणाला कंटाळले होते. त्याच्या पाठीमागे त्याचे अधिकारी व सेनानी त्यांच्या हुकमाची अंमलबजावणी करीत नव्हते. असे जरी असले, तरी मराठी सत्ता नष्ट करण्याचा औरंगजेबाचा इरादा किंचितही कमी झाला नव्हता. मराठ्यांचा जोर पाहून तोही हट्टाला पेटला होता. विशाळगड जिंकल्यानंतर त्याने २७ डिसेंबर, १७०२ रोजी सिंहगडाला वेढा घातला. मराठ्यांनी त्याच्या रसदा मारुन त्याचा कोंडमारा केला. पावसाळा तोंडावर आल्याने तत्पूर्वी किल्ला घेणे जरुरीचे होते; परंतु तो किल्ला लढून घेणे मोगलांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी पैसे देण्याचा हुकमी मार्ग स्वीकारून तो ताब्यात घेतला.

२८ नोव्हेंबर १७०३ रोजी औरंगजेबाने राजगडाला वेढा दिला. तोफांचा भडिमार सुरू झाला. मराठ्यांनी कडवा प्रतिकार केला. शेवटी मराठ्यांशी वाटाघाटी करून १६ फेब्रुवारी, १७०४ रोजी मोगलांनी किल्ला ताब्यात घेतला. १० मार्च, १७०४ रोजी तोरणा घेतला. लवकरच राजमाची व लोहगड हेही किल्ले जिंकले.

मराठ्यांप्रमाणेच कृष्णा-भीमेच्या खोऱ्यात बेरड जमातीने औरंगजेबाविरुद्ध बंड सुरू केले होते. औरंगजेबाने अनेक नामांकित सरदार त्यांच्यावर पाठविले; परंतु त्यांचा पुरता मोड करता आला नाही. आता तर मराठे त्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या हालचालींना जोर आला होता. त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी औरंगजेबाने त्यांच्या वाकिणखेडा या राजधानीवर चाल केली. औरंगजेबाची पाठ वळताच मराठ्यांनी लोहगड पुन्हा जिंकून घेतला. लगेच सिंहगड, राजमाची हेही किल्ले घेतले (१७०५.)


मराठे बेरडांनाही मदत करण्यास गेले होतेच. तिथे त्यांनी मोठीच धामधूम उडवली. अखेर २७ एप्रिल, १७०५ रोजी औरंगजेबाने वाकिणखेडा जिंकले.

काही दिवस देवापूरला मुक्काम करून तो बहादूरगडाहून अहमदनगरला आला व तेथेच त्याने छावणी केली (२० जानेवारी, १७०६).

फेब्रुवारी महिन्यात औरंगजेबाने मराठ्यांना खंडणी देऊन सिंहगड परत घेतला; परंतु मोगलांकडील राजगड व वसंतगड हे दोन किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. आता मराठे खुद्द बादशहाच्या छावणीवरच धाडसी हल्ले करू लागले. त्यांचा प्रतिकार करता मोगल मेटाकुटीस आले.

१७०६ मध्ये धनाजीने पंधरा हजार सैन्यानिशी गुजरातेत धडक मारली. महंमद बेगखान व नजर अलीखान या सरदारांचा पराभव करून महंमद बेगखानास कैद केले. गुजरातेत हंगामी सुभेदार अब्दुल हमीदखान त्यांच्या मदतीस आला. त्याच्यावरही चाल करुन धनाजीने त्यांच्या सैन्याचा धुव्वा उडविला आणि त्याला कैद केले (१५ मार्च, १७०६). मोगलांच्या नामुष्कीची बातमी ऐकून औरंगजेबाने बेदारबखत या आपल्या नातवास मराठ्यांवर रवाना केले; पण मराठे केव्हाच पसार झाले होते.

औरंगाबाद व विजापूर प्रांतातही मराठ्यांची धामधूम चालूच होती. मोगलांच्या रसदा मारणे व ठाणेदाराने कैद करणे ही नित्याचीच बाब होती. औरंगजेबाचे मराठी सत्ता नष्ट करण्याचे ध्येय साध्य झाले नाही. अत्यंत निराश व पश्चात्तापदग्ध अवस्थेत हा बलाढ्य सम्राट अहमदनगर येथे २० फेब्रुवारी, १७०७ रोजी मृत्यू पावला. १६८९ मध्ये दक्षिणेत आलेला औरंगजेब उत्तरेत कधीच जाऊ शकला नाही. महाराष्ट्र हीच त्याची दफनभूमी ठरली. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांच्या अवधीत सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, विशाळगड, सातारा, परळी इत्यादी किल्ले मराठ्यांनी परत काबीज केले. सव्वीस वर्षांचे मोगलांचे श्रम वाया गेले.

औरंगजेब दक्षिणेत उतरल्यापासून सतत पाव शतकभर मराठ्यांशी लढत होता. संभाजीमहाराज, राजाराममहाराज व नंतर महाराणी ताराबाई यांनी त्यांच्याशी प्रतिकार करुन मराठी सत्तेचे जतन केले. स्वातंत्र्ययुद्धाचे महत्व मराठ्यांच्या इतिहासात आगळे आहे. इतिहासातील एक ज्वलंत असे हे पर्व आहे. या काळातील शेवटच्या लढ्याचे नेतृत्व शिवछत्रपतींच्या सुनेने, महाराणी ताराबाईंनी केले. या लढ्यात त्यांच्या अंगी असणारे शौर्य, धाडस, मुत्सद्दीपणा, राजकारणपटुत्व हे गुण प्रकट झाले. पंचवीस वर्षाची तरुण विधवा राणी आपल्या चिमुकल्या राज्याच्या साधनानिशी सर्व हिंदुस्थानभर पसरलेल्या बलाढ्य मोगल साम्राज्याशी टक्कर देते, ही गोष्ट केवळ 

हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. मराठ्यांचा कट्टर शत्रू खाफीखान आपल्या ग्रंथात या राणीबद्दल गौरवोद्गार काढतो. तो लिहितो, 'ताराबाई ही राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान व शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीत तिचा मोठा लौकिक झाला होता.'

पुढे तो म्हणतो, 'रामराजाची (राजाराममहाराजांची ) बायको ताराबाई महाराणी यांनी विलक्षण धामधूम उडविली. तीत त्यांचे सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली. '

'ताराबाई महाराणी यांनी सगळा कारभार आपल्या हातात घेतला. सरदारांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या, राज्याचा कारभार, बादशाही मुलखावरील हल्ले या सर्व गोष्टी त्यांच्या तंत्राने चालू लागल्या. त्यांनी आपल्या सरदारांची मने आपल्याकडे ओढून घेतली. त्यांनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की दक्षिणेचे सहा सुभे, सिरोज मंदसोर आणि माळवा या प्रांतांच्या सरहद्दीपर्यंत मराठ्यांनी धामधूम उडविली. बादशहाने आपली हयात मोहिमा करणे आणि किल्ले घेणे यात घालविली. त्यांच्या (ताराबाई) विरुद्ध तो शेवटपर्यंत लढत राहिला; पण मराठ्यांचे बळ आणि बंड ही दिवसेंदिवस वाढतच गेली.'


सोर्स - मराठ्यांचा इतिहास - खंड 2 पेशवाई

डॉक्टर जयसिंगराव पवार

By-Bhagyadarshi Lokhande (भाग्यदर्शी लोखंडे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा