रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

नारायण मेघाजी लोखंडे


रविवार, हा दिवस आपला प्राणवायू. संपूर्ण आठवड्याची थकावट हा दिवस दूर करतो. पण रविवारची ही साप्ताहिक सुट्टी आपल्या पदरात कशी पडली? त्यासाठी कुणी व किती संघर्ष केला? आपल्यासारख्या कामगार लोकांसाठी आठवड्यात एक दिवस सुट्टी मिळावी म्हणून आपले जीवन कुणी खर्ची घातले? हे आपल्याला माहिती असलेच पाहिजे. 

कारण, भारतात एक काळ असा होता की, जेव्हा आठवडा सोमवारपासून सुरू होत होता ना रविवारपासून... त्यावेळी आठवड्याची सुरुवात किंवा शेवट कोणत्याही दिवसापासून मानता येत होते. म्हणजे तेव्हा साप्ताहिक सुट्टी नावाचा प्रकारच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आठवड्यातील सातही दिवस कामगारांसाठी केवळ काम आणि कामच होते.

पण आज रविवार ही आठवड्यातील सर्वमान्य सुट्टी असल्याचे मानले जाते. काही ठिकाणी कामकाजाचा आठवडा तर अवघ्या 5 दिवसांवर घसरला आहे. त्यामुळे भारतात रविवारची सुट्टी केव्हा व कशी सुरू झाली? याचा इतिहास जाणून घेणे फार गरजेचे आहे. चला तर मग व्यक्तिविशेषमध्ये आज आपण आढावा घेऊया कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे Narayan Meghaji Lokhande यांच्या जीवनपटाचा... 


कोण होते नारायण मेघाजी लोखंडे? Who Is Narayan Meghaji Lokhande

नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर हे होते. त्यांचे वडील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ठाण्याला गेले होते. तिथेच 13 ऑगस्ट 1848 रोजी नारायण यांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंत शालेय शिक्षण झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते मुंबईतील भायखळा येथे गेले. गोपिकाबाई असे त्यांच्या पत्नीचे नाव होते. गोपीनाथ नामक त्यांना एक मुलगा होता. नारायण यांनी प्रथम रेल्वेत कारकून म्हणून नोकरी केली. त्यानंत पोस्ट व कापड गिरणीत स्टोअरकिपर म्हणून काम केले. यावेळी त्यांनी वाचन व लेखनाचा छंदही त्यांनी जोपासला. 27 ऑक्टोबर 1876 रोजी लोखंडे यांनी लिहिलेल्या पंचदर्पण पुस्तिकेचे प्रकाशन झाले. Who introduced the Sunday holiday in India?

कामगार संघटना चळवळीचे जनक Father Of The Trade Union Movement

नारायण मेघाजी लोखंडे हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. 19 व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय व सांप्रदायिक मुद्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकासाठी त्यांची आठवण केली जाते. याशिवाय 1895 मध्ये झालेल्या हिंदू - मुस्लिम दंगलीत केलेल्या कामाविषयी त्यांना रावबहादूर ही पदवी देण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांना जस्टीस ऑफ पीस हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने 2005 मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले होते. 



नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक प्रमुख सहकारी होते. कापड गिरणीत काम करताना त्यांचा संबंध दहशतीच्या वातावरणात दिवसातून 13-14 तास काम करणाऱ्या गिरणी कामगारांशी आला. त्यांना आठवड्याची सुट्टीही मिळत नव्हती. परिणामी, लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीला वाहून घेण्याचा निश्चय केला. त्यासाठी ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी 23 सप्टेंबर 1884 रोजी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहँड्स असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी स्वतःला समाजसेवेत वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. 

नारायण मेघाजी लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांना आठवडी सुट्टी मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यानंतर 10 जून 1890 पासून रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला. Sunday Holiday History

दीनबंधूच्या माध्यमातून प्रखर पत्रकारिता  Deenbandhu Newspaper

पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. 9 मे 1880 रोजी मुंबईतून दीनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हे नियतकालिक शेतकरी व कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडत असे. त्याच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी नामक एक दैनिकही काढले. 


सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधू ह्या मुखपत्रातून वाचा फोडली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.

दुसरा कामगार कायदा आयोग 1884 (Second Labour Law Commission 1884)

ब्रिटीश सरकारने 1884 मध्ये दुसरा कामगार कायदा आयोग लागू केला. पण या आयोगामुळे गिरणी कामगारांच्या स्थिती फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे सप्टेंबर 1884 मध्ये लोखंडे यांनी मुंबईत पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे 5,500 कामगारांचे लेखी निवेदन पाठवले. त्यात दर रविवारी सुट्टी, दररोज 14 तासांऐवजी 12 तास काम, मुलांचे नोकरीचे वय 7 वरून 9 वर्षे करावे, दरमहा 15 तारखेच्या आत वेतन मिळावे, कामगाराला दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी, तसेच फार मोठी शारीरिक इजा होऊन कामगार कामासाठी अपात्र ठरला तर त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी अशा अनेक मागण्या या निवेदनात होत्या. या मागण्यांचे निवेदन कलकत्त्यास गव्हर्नर जनरलकडे पाठवण्यात आले होते. 

..अन् मिळाली रविवारची सुट्टी 

नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 साली मुंबई गिरणी कामगार संघ (बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन) नामक भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. एप्रिल 1890 मध्ये 10 हजार स्त्री-पुरुष कामगारांची मोठी परिषद लोखंड्यांनी मुंबईत भरवली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्त्वाची घटना समजली जाते. त्यानंतर लगेचच 10 जून 1890 रोजी शासनाने, कामगारांना दर रविवारी पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला. 1891 साली कामगार कायदा संमत करून लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना जे. पी. हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.


महात्मा फुले आणि नारायण मेघाजींची भेट

कापड गिरणीतील बहुतांश कामगार हे बहुजन समाजाचे होते. एका बाजूला जातीव्यवस्था व दुसऱ्या बाजूला मिल मालक या दुहेरी व्यवस्थेत त्या काळातील कामगार अडकला होता. पारंपरिक पद्धतीनुसार बहुजन समाजातील लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. पण शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून होता. त्यात दुष्काळ, आजारपण आल्यावर सावकाराकडून कर्ज काढण्याची नामुष्की येत असे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम या गोष्टींना वाचा फोडली. त्यांनी शेतकरी व कष्टकरी वर्गातील बहुजनांचे शोषण कसे होते? याची मांडणी केली. आपला विचार ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत.


मुंबईतील ताडदेव येथे 1 डिसेंबर 1873 रोजी ज्योतिबा फुले यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 वर्षीय लोखंडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तिथे या दोन्ही नेत्यांची पहिल्यांदा भेट झाली. नारायण लोखंडे यांनी मुंबई व उपनगरातील दक्षिणी फुलमाळी समुदायाचे संघटन केले होते. ते या समुदायाच्या जातपंचायतीत पंच म्हणूनही काम पहायचे. लोखंडे आपल्या समुदायाच्या जातपंचायतीसारख्या उपक्रमात सहभागी असले तरी त्यांची दृष्टी व्यापक होती. ते सर्वच समुदायातील कष्टकऱ्यांसाठी तेवढ्याच तळमळीने काम करत असत. महात्मा फुलेही अशा विविध समुदायांची मोट बांधून त्यांना सत्यशोधक चळवळीत आणत.

महात्मा फुले झाले लोखंडेंवर नाराज  Mahatma Phule

दीनबंधुमुळे नारायण लोखंडे यांना महात्मा फुले यांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागले. त्याचे झाले असे की, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक लिहिले. त्याचे एकूण 4 भाग छापून येणार होते. पण लोखंडे यांनी या पुस्तकाचे दोनच भाग छापले. पण इतर 2 भागांमुळे ब्रिटीश सरकारचा नाहक रोष निर्माण होईल, या भितीपोटी त्यांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारवर टीका करणारे इतर 2 भाग छापले नाही. यामुळे फुले हे लोखंडेंवर चांगलेच नाराज झाले. भेकड छापखानेवाले म्हणत त्यांच्यावर टीका केली.  

मुंबईत 1896 मध्ये प्लेगची भयंकर साथ पसरली. या साथीत अनेक जण मृत्युमुखी पडले. या गंभीर स्थितीतही नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेऊन प्लेगग्रस्तांसाठी एक मराठा इस्पितळ काढले. पण दुर्दैवाने लोखंडे यांनाच प्लेग झाला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

By- Bhagyadarshi Lokhande | भाग्यदर्शी लोखंडे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा