13 व्या शतकाच्या सुरुवातीला मध्य आशियाच्या विशाल गवताळ प्रदेशातून एक तरुण योद्धा पुढे आला. त्याचे नाव होते तेमुजीन. पुढे हाच तेमुजीन जगाच्या इतिहासात चंगेझ खान या नावाने प्रसिद्ध झाला. त्याने विखुरलेल्या मंगोल जमातींना एकत्र करून अशी लष्करी ताकद निर्माण केली की, चीनपासून मध्य आशियापर्यंतचे बहुतांश प्रदेश त्याच्या नियंत्रणाखाली आले. त्याच्या सैन्याच्या वेगाने व युद्धतंत्राने तत्कालीन राजवटी अक्षरशः हादरल्या. यामुळे त्यांचे साम्राज्य मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली साम्राज्यांपैकी एक बनले. Genghis Khan
गरिबीतून साम्राज्याच्या शिखरापर्यंत
चंगेझ खानचा जन्म साधारणतः 1162 च्या आसपास मंगोलियाच्या ओनोन नदीच्या परिसरात झाल्याचा दावा केला जातो. त्याचे वडील येसुगेई हे मंगोल जमातीतील प्रभावशाली प्रमुख होते. पण तेमुजीन लहान असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. परिणामी, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. त्याच्या कुटुंबाला जमातीने एकप्रकारे वाऱ्यावरच सोडले. या परिस्थितीत वाढलेला या मुलाने पुढे आपल्यासारखेच अनेक योद्धे जमा केले. हळूहळू त्याने आपल्या प्रतिस्पर्धी जमातींना पराभूत केले. त्यामुळे 1206 मध्ये मंगोल जमातींच्या सभेत त्याला चंगेझ खान ही पदवी मिळाली.
चंगेझ खानच्या सैन्याची खरी ताकद काय होती?
चंगेझ खानचा विजय केवळ तलवारीच्या जोरावर झाला असे म्हणणे अपुरे ठरेल. त्याने मंगोलांच्या जुन्या जमातींच्या निष्ठेपेक्षा संघटित लष्करी व्यवस्थेला महत्त्व दिले. त्याच्या सैन्यात शिस्त, वेगवान घोडदळ, संदेशवहन व युद्धातील दिशाभूल यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलाज ात होता. शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेर व व्यापारी मार्गांचाही वापर केला जात असे. त्यामुळे संख्येने मोठ्या सैन्यांनाही मंगल घोडदळ वेगाने मागे टाकत असे. त्याच्या साम्राज्याचा विस्तार केवळ युद्धामुळे नव्हे तर या संघटित व्यवस्थेमुळेही झाला.
रक्तपाताच्या सावलीतील साम्राज्य
चंगेझ खानच्या मोहिमांत प्रचंड हिंसाचार झाला. काही शहरांनी प्रतिकार केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. मध्य आशिया व चीनमधील अनेक प्रदेशांत मंगोल सैन्याच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यामुळे चंगेझ खानची प्रतिमा अनेक इतिहास कथांमध्ये एक क्रूर शासक म्हणूनच झाली. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या राजवटीत व्यापारी मार्गांना संरक्षण, संदेशवहनाची व्यवस्था व विविध धर्मांना तुलनेने स्वातंत्र्य देण्याची उदाहरणेही आढळतात. त्यामुळेच चंगेझ खानचा इतिहास हा केवळ क्रूर आक्रमक किंवा महान शासक अशा निवडक शब्दांत मावत नाही.
साम्राज्य किती अवाढव्य होते?
चंगेज खानच्या मृत्यूपर्यंत मंगोल साम्राज्याने आशियातील प्रचंड भूभाग व्यापला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांनी आणखी प्रदेश जिंकले. यामुळे साम्राज्याचा विस्तार पूर्व आशियापासून युरोपच्या दिशेने झाला. पुढील काही दशकांत मंगोल सत्ता पॅसिफिक महासागरापासून कॅस्पियन समुद्रापर्यंत पोहोचली. त्यामुळे Mongol Empire हे इतिहासातील सर्वात मोठ्या भूभागावर पसरलेल्या साम्राज्यांपैकी एक ठरले. या साम्राज्याच्या विस्तारामुळे व्यापार, स्थलांतर, संस्कृती व जनुकीय वंशरेषांवरही दीर्घकालीन परिणाम झाला.
खरी आश्चर्याची गोष्ट चंगेझ खानच्या तलवारीत नव्हती
चंगेझ खानच्या मृत्यूनंतर जवळपास 8 दशकांनी शास्त्रज्ञांना त्याच्याशी संबंधित असलेल्या DNA चा ठसा आढळला. 2003 मध्ये प्रसिद्ध झालेल्या The Genetic Legacy of the Mongols या अभ्यासात आशियातील विविध लोकसंख्यांच्या Y-chromosome चा अभ्यास करण्यात आला. एका विशिष्ट Y-chromosome चा प्रसार अतिशय मोठ्या प्रदेशात आढळला. संशोधनानुसार, संबंधित प्रदेशातील जवळपास 8 टक्के पुरुषांकडे ही वंशरेषा होती. त्या काळच्या जागतिक लोकसंख्येच्या अंदाजानुसार, ती जवळपास 0.5 टक्के पुरुषांमध्ये म्हणजे जवळपास 16 दशलक्ष पुरुषांमध्ये आढळत होती. Genghis Khan descendants
16 दशलक्ष पुरुषांचा चंगेझ खानशी संबंध?
याचवेळी एक जगातील सुमारे 16 million men could be descendants of Genghis Khan असा खळबळजनक दावा करण्यात आला. Y-chromosome वडिलांकडून मुलाकडे जात असल्यामुळे तो पुरुष वंशरेषेचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. या lineage चा उगम मंगोलियात जवळपास 1 हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असा दावा या अभ्यासात करण्यात आला. चंगेझ खानच्या साम्राज्याच्या विस्ताराशी त्याचा भौगोलिक प्रसार जुळत असल्याने संशोधकांनी ही वंशरेषा चंगेझ खान किंवा त्याच्या जवळच्या पुरुष नातेवाईकांशी संबंधित असण्याची शक्यता मांडली.
पण इथेही एक मोठे पण आहे
ही गोष्ट वाचताना एक महत्त्वाची सावधगिरी आवश्यक आहे. चंगेझ खानचे स्वतःछे डीएनए आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या Y-chromosome ला हेच चंगेझ खाचे डीएनए असे ठामपणे म्हणता येत नाही. 2018 मधील एका ंशोधनिबंधाने या प्रसिद्ध C2-Star Cluster वंशरेषेचा उगम चंगेझ खानच्या काळापेक्षा खूप पूर्वीचा असू शकतो असा निष्कर्ष मांडला. संशोधकांच्या मते, ही वंशरेषा व्यापक Mongolic populations मध्ये आधीपासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 16 दशलक्ष पुरुषांना थेट चंगेझ खानचे वंशज म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही.
मग चंगेझ खानचे किती मुले होती?
चंगेझ खानला नेमकी कित मुले होती, याचे निश्चित उत्तर इतिहासाकडे नाही. त्याला 200 पेक्षा जास्त मुले होती, हा दावा अनेक लोकप्रिय लेखांमध्ये दिसतो. परंतु त्याला तितका मजबूत ऐतिहासिक पुरावा नाही. त्याच्या प्रमुख पत्नी बोरतेपासून चार प्रसिद्ध मुले जोची, चगताई, ओगदाई व तोलुई झाले. त्याच्या इतर पत्नी व उपपत्नींपासून झालेल्या संततीची संख्या मात्र निश्चितपणे मोजता येत नाही. त्यामुळे 200 मुलांचा बाप हे शीर्षक आकर्षक असले तरी त्याला लोकप्रतिय ऐतिहासिक दावा म्हणणूच पाहणे अधिक योग्य आहे.
बोरते - चंगेझ खानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची स्त्री
चंगेझ खानच्या आयुष्या बोरतेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. दोघांचे लग्न तरुण वयात झाले. पण लग्नानतंर काही काळातच शत्रूंनी बोरतेचे अपहरण केले. तेमुजीनने तिचा शोध घेलता. काही सहकाऱ्यांच्या मदतीने तिला परत मिळवले. ही घटना चंगेझ खानच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. बोरते परत आल्यानंत काही काळातच तिच्या पोटी जोचीचा जन्म झाला. पुढे याच जोचीच्या जन्माभोवती चंगेझ खानच्या कुटुंबातील सर्वात मोठा वाद निर्माण झाला.
जोचीच्या जन्मावर संशय का घेण्यात आला?
बोरतेचे अपहरण झाल्यनंतर ती काही काळ शत्रूच्या ताब्यात होती. त्यामुळे जोचीचा जन्म झाल्यानंतर त्याच्या जैविक पित्याविषयी संशय निर्माण झाला. चंगेझ खानने जोचीला आपला मुलगा म्हणून स्वीकार केला. पण त्याचा भाऊ चगताई याचा त्याला विरोध होता. भविष्यात चंगेझ खानच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा हा जुना वाद पुन्हा उफाळून आला. अर्थात चंगेझ खानने आपले साम्राज्य किती विस्तारले असले तरी, त्याला त्याच्या घरातीलच वाद मिटवता आला नाही. यामुळेच त्याच्या वारसा कोण चालवणार, यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला.
उत्तराधिकारी निवडीवेळी जोची व चगताई यांच्यातील संबंध अत्यंत ताणले गेले. ऐतिहासिक परंपरेनुसार चगताईने जोचीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला वाटत होते की, त्याच्या जन्माच्या पितृत्वाविषयी शंका आहे. त्याला संपूर्ण मंगोल साम्राज्याचा वारस कसे मानायचे, या प्रश्नाने चंगेझ खानसमोर मोठी अडचम उभी राहिली. कारण एका बाजूला तो जोचीवर विश्वास ठेवत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या इतर मुलांचा विरोध स्पष्ट होता. भावांमधील संघर्ष प्रत्यक्ष भांडणापर्यंत पोहोचल्याचे Secret History of the Mongols च्या परंपरेत वर्णन आहे.
एक डोके आणि अनेक शवपेट्या
चंगेझ खानने आपल्या मुलांना एक प्रतिकात्मक कथा सांगितल्याचे वर्णन आढळते. अनेक डोकी असलेल्या सापाला प्रत्येक डोके वेगवेगळ्या दिशेने जायचे असल्याने तो स्वतःची शिकारही करू शकत नव्हता. उलट अनेक शेपट्या पण एकच डोके असलेला साप एकाच दिशेने पुढे जाऊ शकत होता. या कथेतून चंगेझ खानचा संदेश स्पष्ट होता. तो म्हणजे, सत्ता टिकवायची असेल तर नेतृत्वात एकता असली पाहिजे. पण स्वतःच्या मुलांमधील मतभेद पाहता हा संदेश किती कठीण होता हे त्यालाही जाणवत होते.
जोची नव्हे ओगदाई का?
चंगेझ खानने शेवटी ओगदाईला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले. ओगदाई हा त्याचा तिसरा मुलगा होता. जोची व चगताई या दोघांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षामुळे ओगदाई हा तुलनेने स्वीकारार्ह पर्याय ठरला. चंगेझ खानच्या मृत्यूनंतर 1229 मध्ये ओगदाईची महान खान म्हणून औपचारिक निवड झाली. पण जोची त्यापूर्वीच 1227 मध्ये मरण पावला. त्यामुळे चंगेझ खानच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे ओगदाईच्या हातात गेली.
सत्ता वाटली, पण साम्राज्य टिकले
चंगेझ खानच्या मृत्यूनंतर मंगोल साम्राज्य लगेच नष्ट झाले नाही. उलट त्याच्या मुलांनी व नंतरच्या वंशजांनी वेगवेगळ्या प्रदेशांवर सत्ता प्रस्थापित केली. जोचीच्या वंशातून पुढे Golden Horde उभी राहिली. चगताईच्या वंशातून मध्य आशियातील Chagatai Khanate विकसित झाली. ओगदाईच्या वंशाचा मंगोल साम्राज्याच्या केंद्रावर प्रभाव राहिला, तर तोलुईच्या वंशातून पुढे कुबलाई खानसारखे शक्तिशाली शासक आले. अशा प्रकारे चंगेझ खानचे साम्राज्य त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या रक्ताच्या विविध शाखांमधून पुढे जात राहिले.
चंगेझ खानचा हरम व वंशवृद्धी
चंगेझ खानच्या वंशाच्या मोठ्या विस्ताराविषयी बोलताना त्याच्या काळातील राजकीय व सामाजिक व्यवस्था लक्षात घेणे आवश्यक आहे. विजेत्या शासकांना अनेक पत्नी व उपपत्नी असण्याची प्रथा त्या काळी होती. युद्धात पराभूत झालेल्या राजघराण्यांशी विवाह किंवा स्त्रियांना राजकीय संरचनेत समाविष्ट करण्याच्या घटनाही घडत. त्यामुळे प्रभावशाली पुरुषांच्या वंशाचा विस्तार सामान्य लोकांच्या तुलनेत अनेक पटींनी वेगाने होऊ शकत असे. जनुकीय अभ्यासात दिसणार्या मोठ्या Y-lineage expansions मागे अशा सामाजिक परिस्थितीचा मोठा वाटा असू शकतो.
डीएनए नेमके काय सांगतो?
Y-chromosome फक्त वडिलांकडून मुलाकडे जातो. त्यामुळे तो एका पुरुष वंशरेषाचा मागोवा मिळतो. परिणामी, एखाद्या मोठ्या Y-lineage चा विस्तार दिसला, तर त्या वंशरेषेतील पुरुषांना एकच प्राचीन पुरुष पूर्वज असण्याची शक्यता असते. पण तो पूर्वज नेमका कोण होता, हे डीएनए एकटा सांगू शकत नाही. त्यासाठी त्या ऐतिहासिक व्यक्तीचा किंवा त्याच्या नि्श्चित वंशजाचा डीएनए उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे Genghis Khan DNA हा विषय आजही वैज्ञानिक व ऐतिहासिक चर्चेचा विषय आहे.
हजारा लोक व मंगोल वंशाचा दावा
2003 च्या संशोधनात पाकिस्तान व अफगानिस्तान परिसरातील हजारा (Hazara) लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या काही पुरुषांमध्ये संबंधित Y-chromosome lineage आढळल्याचे या संशोधनात नमूद करम्यात आले आहे. हजारा समुदायाच्या काही मौखिक परंपरांमध्ये स्वतःचा संबंध मंगोल आक्रमकांशी जोडला जातो. या गोष्टींमुळे त्या काळच्या संशोधकांना चंगेझ खानशी संबंधित वंशरेषेच्या सिद्धांताला काही प्रमाणात आधार मिळतो. मात्र आधुनिक जनुकीय संशोधनाच्या प्रकाशात या संबंधाकडे सावधपे पाहावे लागते.
चंगेझ खानचा शेवट कसा झाला
जगाच्या इतिहासात प्रचंड साम्राज्य उभे करणाऱ्या चंगेझ खानचा मृत्यू 18 ऑगस्ट 1227 रोजी झाला. पण त्याच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र आजही निश्चित नाही. आजारपण, युद्धातील दुखापत किंवा घोड्यावरून पडल्यामुळे झालेली दुखापत अशा विविध शक्यता इतिहासात मांडल्या गेल्या आहेत. त्याच्या मृत्यूची बातमीही काही काळ गुप्त ठेवण्यात आली होती. कारण साम्राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये अशी काळजी घेतली जात होती. त्याच्या इच्छेनुसार ओगदाईला उत्तराधिकारी बनवण्यात आले.
कुठे आहे चंगेझ खानची कबर
चंगेझ खानच्या मृत्यूएवढेच त्याचे दफनही इतिहासीतल एक मोठे रहस्य आहे. त्याची कबर नेमकी कुठे आहे, याचा निश्चित पुरावा आजवर मिळाला नाही. याविषयी अनेक ठिकाणांविषयी संशोधन झाले, पण कोणताही दावा निर्णायक ठरला नाही. काही परंपरांनुसार, त्याचे दफन गुप्तपणे करण्यात आले. समाधीची जागा जाणीवपूर्वक लपवण्यात आली. आधुनिक काळात उपग्रह प्रतिमा, पुरातत्त्वीय सर्वेक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनेही या रहस्याचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले आहेत.
चंगेझ खानच्या कहाणीतील सर्वात मोठा विरोधाभास इथे दिसतो. ज्याने आपल्या आयुष्यात संपूर्ण साम्राज्याला एका सत्तेखाली आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्याच मुलांमध्ये उत्तराधिकाऱ्यावरून संघर्ष झाला. ज्याच्या वंशाचा जनुकीय ठसा लाखो पुरुषांत असण्याची शक्यता मांडली गेली, त्याच व्यक्तीची स्वतःची संतती किती होती हे ही निश्चितपणे सांगता येत नाही. त्याचा डीएनए निश्चितपणे ओळखता आला नाही. त्याची कबरही सापडली नाही. त्यामुळे चंगेझ खानचा इतिहास हा केवळ विजयांचा इतिहास नसून वंश, सत्ता व रहस्य यांचा अनोखा संगम आहे.
चंगेझ खान मृत्यूवेळी एकटा होता का
चंगेझ खानच्या अनेक संतती होत्या. त्यामुळे तो मृत्यूवेळी एकटाच होता, याविषयी संशोधकांत मतभेद होते. काही लोकांसाठी चंगेझ खान म्हणजे मंगोल साम्राज्याचा निर्दयी योद्धा होता, तर काहींसाठी असामान्य लष्करी संघटक होता. Genetic Legacy of Genghis Khan च्या संशोधनाने चंगेझ खानविषयी जगाला थक्क करणारा एक जनुकीय सिद्धांत मिळाला. पण नंतरच्या शोधनिबंधांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे काहीही असले तरी आजही चंगेझ खानशी संबंधित एक मोठी पुरुष वंशरेषा आजही अस्तित्वात असल्याचे मानले जाते. पण ती थेट त्याचीच आहे हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा