फ्रँकफर्टमधील एका छोट्याशा जागेत रात्री उशिरापर्यंत जॅझचे सूर घुमत होते. बाहेर युद्धाचे ढग होते. शहरावर नाझींची सत्ता होती. प्रत्येक संशयास्पद हालचालींवर Gestapo ची नजर होती. आत काही तरुण संगीताच्या तालावर हरवून गेले होते. अचानक दरवाजावरचा पहारेकरी धावत आत आला. त्याने फक्त एवढेच सांगितले, Gestapo येत आहे.
काही सेकंदांत वातावरण बदलले. जॅझ थांबला आणि नाझींना मान्य असलेले संगीत सुरू झाले. हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील वाटतो, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रँकफर्टमध्ये हे खरोखरच घडत होते.
जॅझ ऐकणेही होता गुन्हा
आज आपण संगीत ऐकण्यासाठी मोबाईल उघडतो. क्षणार्धात जगभरातील गाणी आपल्या कानावर आदळतात. पण 1940 च्या दशकातील नाझी जर्मनीत परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. कोणते संगीत ऐकायचे, कोणते कलाकारण स्वीकारायचे व कोणते संगीत वाजवायचे यावर सरकारचे नियंत्रण होते. अमेरिकेत लोकप्रिय झालेल्या जॅझ संगीतावर Adolf Hitler च्या नाझी राजवटीने बंदी घातली होती. आफ्रिकन-अमेरिकन मुळांमुळे जॅझला वांशिक पूर्वग्रहातून तुच्छ लेखले जात होते. त्यामुळे जॅझ वाजवणे किंवा ऐकणे हे काही तरुणांसाठी केवळ संगीताची आवड राहिली नव्हती. तर ते सत्तेच्या सांस्कृतिक नियंत्रणाला दिलेले एक छोटेसे आव्हानच बनले होते.
1920 च्या दशकात जर्मनीला पडली होती जॅझची भुरळ
जॅझचा जन्म अमेरिकेत झाला. पण त्याची लय व प्रयोगशीलता लवकरच युरोपात पोहोचली. 1920 च्या दशकात जर्मनीतील तरुणांमध्ये जॅझ लोकप्रिय झाले. मोठ्या शहरांतील कल्बमध्ये जॅझ व स्विंग संगीत ऐकले जात होते. नवीन संगीत, नवीन फॅशन व अधिक मोकळ्या जीवनशैलीचे आकर्षण तरुणांना वाटत होते. पण 1933 मध्ये नाझी पक्ष सत्तेवर आल्यानंतर सांस्कृतिक वातावरण झपाट्याने बदलले.
नाझींना पारंपरिक जर्मन संस्कृती व त्यांच्या तथाकथित आर्यन मूल्यांना अनुरूप कला हवी होती. जॅझ त्यांना परदेशी, बंडखोर व त्यांच्या वांशिक विचारसरणीच्या अगदी विरोधाभासी होते.
Negermusik म्हणून जॅझचा अवमाननाझी प्रचारयंत्रणेने जॅझला कमी लेखण्यासाठी अपमानास्पद शब्दप्रयोग केले. आफ्रिकन-अमेरिकन संगीतकारांचा प्रभाव असलेल्या या संगीताला Negermusik असे संबोधले गेले. त्यांच्या मते, हे संगीत आर्यन संस्कृतीला शोभणारे नव्हते. प्रत्यक्षात जॅझची ताकदच त्याच्या विविधतेत होती. त्यात आफ्रिकन -अमेरिकन संगीत परंपरा, ब्लूज, रिदम व प्रयोगशीला यांचा संगम होता. त्यामुळेच नाझींच्या दृष्टिकोनातून ते केवळ एक संगीतप्रकार नव्हता, तर तो त्यांच्या वांशिक व सांस्कृतिक शुद्धतेच्या क्लपनेलाच धक्का देणारा होता. संगीतावर केलेली ही कारवाई म्हणजे प्रत्यक्षात समाजाच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होता.
गोबेल्सच्या नियंत्रणात संगीतविश्व
नाझी प्रचारमंत्री Joseph Goebbels यांच्या नेतृत्वात संगीत क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी Reich Music Chamber म्हणजेच Reichsmusikkammer प्रभावी करण्यात आली. संगीतकार, कार्यक्रम, क्लब आणि संगीताचे सार्वजनिक सादरीकरण यावर या व्यवस्थेची नजर होती. नाझी राजवटीला मान्य असलेले संगीत प्रोत्साहित केले जात होते, तर अधोगतीचे किंवा अपवित्र मानले गेलेले संगीत दडपले जात होते.
जॅझ आणि स्विंग संगीत त्याच्या निशाण्यावर होते. संगीतविश्वातील या नियंत्रणाला Gestapo सारख्या गुप्त पोलिस यंत्रणेची साथ होती. त्यामुळे एखाद्या क्लबमध्ये जॅझ वाजवणाऱ्या तरुणांना हे माहीत होते की त्यांच्यावर फक्त संगीतप्रेमी म्हणून नव्हे, तर संशयित म्हणूनही नजर ठेवली जाऊ शकते.
1941 मध्ये फ्रँकफर्टमध्ये काही तरुण जॅझप्रेमी एकत्र आले. त्यांनी Frankfurt Hot Club ची सुरुवात केली. या गटामागे होर्स्ट लिपमन या तरुणाची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्या आई-वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये मित्र एकत्र येत आणि जॅझ वाजवत. सुरुवातीला हे काही मित्रांचे साधे संगीतप्रेम वाटत होते. पण नाझी राजवटीने जॅझवर नियंत्रण वाढवले तसे या भेटींना वेगळे महत्त्व मिळाले.
Hans Otto Jung,
Carlo Bohländer आणि
Emil Mangelsdorff यासारखे तरुण या वर्तुळाशी जोडले गेले. बाहेर नाझींची सत्ता होती आणि आत या तरुणांचे स्वतःचे छोटेसे संगीतविश्व तयार झाले होते.
संगीत सुरू करण्यापूर्वी द्यावा लागे पहारा
Frankfurt Hot Club च्या बैठकीत वाद्ये जितकी महत्त्वाची होती, तितकाच महत्त्वाचा होता पहारेकरी. जॅझ सुरू करण्यापूर्वी कोणीतरी बाहेर लक्ष ठेवत असे. कारण Gestapo कधीही अचानक येऊ शकत होती. एखादा संशयास्पद अधिकारी दिसला की, लगेच आत संदेश पोहोचवला जात असे. मग काही क्षणांत जॅझ बंद आणि दुसरे संगीत सुरू. विचार करा, एका खोलीत तरुण संगीत वाजवत आहेत आणि बाहेर एक मित्र जीव धोक्यात घालून पहारा देत आहे. त्याच्यासाठी ती केवळ मित्रांची मैफल नव्हती. आत वाजणाऱ्या प्रत्येक सुराची किंमत त्याला माहीत होती.
जॅझची धून आणि स्वातंत्र्याची भावना
Gestapo येतेय! हा इशारा मिळताच वादकांच्या बोटांची हालचाल थांबे आणि काही वेळाने अधिकारी निघून गेले की पुन्हा जॅझ सुरू होई. या छोट्याशा प्रसंगात त्या काळातील तरुणांचे मानसिक जग दडलेले आहे. त्यांच्याकडे सत्ता नव्हती, राजकीय व्यासपीठ नव्हते व नाझी राजवटीशी लढण्यासाठी कोणतीही मोठी संघटना नव्हती. त्यांच्याकडे होते संगीत. त्यामुळे जॅझ ऐकणे म्हणजे त्यांना स्वतःच्या आवडीचा अधिकार जपल्यासारखे वाटत होते. हळूहळू त्यांची ही आवडच एका शांत सांस्कृतिक प्रतिकाराचे रूप घेऊ लागली.
नाझींना जॅझ नको होते, म्हणून आम्हाला ते आणखी आवडायचे
Hans Otto Jung यांच्या आठवणीतील एक वाक्य या संपूर्ण कहाणीचा अर्थ सांगते. ते म्हणत, नाझींना जॅझ आवडत नव्हते. ते जॅझ दडपण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्हाला ते आणखी आवडू लागले. त्यांचे हे वाक्य साधे होते. पण त्यामागची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. सरकार एखाद्या संगीताला नाकारत आहे म्हणून ते अधिक आवडणे म्हणजे त्या तरुणांच्या मनात विरोधाची भावना निर्माण झाली होती. त्यांच्यासाठी जॅझ म्हणजे फक्त नाचण्याचे किंवा ऐकण्याचे संगीत नव्हते. तो स्वतःची आवड निवडण्याचा अधिकार होता. हुकूमशाहीच्या काळात हा अधिकारही धोकादायक ठरू शकतो, हे त्यांना चांगलेच माहीत होते.
याच काळात जर्मनीत Swingjugend किंवा Swing Youth नामक तरुणांची प्रतिप्रवाहातील संस्कृती विकसित झाली. या तरुणांना जॅझ, स्विंग आणि ब्रिटिश-अमेरिकन संगीताची विशेष आवड होती. त्यांच्या फॅशनपासून त्यांच्या संगीताच्या आवडीपर्यंत अनेक गोष्टी नाझींच्या अपेक्षांपेक्षा वेगळ्या होत्या. दुसरीकडे Hitler Youth ही नाझी पक्षाची अधिकृत युवक संघटना होती. तिथे तरुणांना नाझी विचारसरणी, शारीरिक शिस्त आणि तथाकथित वांशिक शुद्धतेचे संस्कार दिले जात. Swingjugend मात्र या चौकटीत बसत नव्हते. म्हणून त्यांच्याकडे नाझी अधिकाऱ्यांच्या संशयाने पाहिले जाऊ लागले.
Swingjugend वर Gestapo ची नजर
Swingjugend चळवळ वाढत गेली तसे नाझी प्रशासनाने तिच्यावर कारवाई सुरू केली. काही तरुणांना अटक करण्यात आली, चौकशी झाली. काहींना छळालाही सामोरे जावे लागले. काही सदस्यांना Moringen सारख्या छळछावण्यांत पाठवण्यात आले. या तरुणांची चूक अनेकदा एवढीच होती की त्यांना नाझींनी ठरवून दिलेल्या चौकटीत जगायचे नव्हते. त्यांना परदेशी संगीत आवडत होते. त्यांना स्विंगच्या तालावर नाचायचे होते. त्यांना स्वतःची फॅशन करायची होती. हुकूमशाहीला मात्र व्यक्तीची ही छोटीशी स्वतंत्र निवडही सहन होत नव्हती.
एमिल मॅंगल्सडॉर्फ - संगीतप्रेमी की बंडखोर?
Frankfurt Hot Club मधील Emil Mangelsdorff यांचे व्यक्तिमत्त्व या संघर्षाचे उत्तम उदाहरण होते. ते गटातील तुलनेने तरुण सदस्यांपैकी एक होते. त्यांच्या वागण्यात Swingjugend ची बंडखोर छटा अधिक दिसत असे. सहकारी Carlo Bohländer यांच्या मते, एमिलला थोडा त्रास द्यायला आवडत असे. मात्र या धाडसाची किंमतही त्यांना मोजावी लागली. 1943 मध्ये त्यांना defeatism च्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तीन आठवडे त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना सैन्यात भरती करून सोव्हिएत आघाडीवर पाठवण्यात आले.
युद्ध संपले तरी एमिलची कैद संपली नाही
सोव्हिएत आघाडीवरील युद्ध हा एमिलच्या आयुष्यातील आणखी एक कठीण टप्पा होता. नाझी राजवटीच्या आदेशामुळे त्यांना सैन्यात जावे लागले. युद्ध संपल्यानंतरही मात्र त्यांची मुक्तता लगेच झाली नाही. ते 1949 पर्यंत युद्धकैदी म्हणून राहिले. एका तरुणाने जॅझवर प्रेम केले म्हणून सुरू झालेली गोष्ट तुरुंग, सैन्य आणि युद्धकैदेपर्यंत पोहोचली होती. पण या सर्व अनुभवांनंतरही संगीताशी त्यांचे नाते संपले नाही. उलट युद्धानंतरच्या काळात ते जर्मन जॅझविश्वातील महत्त्वाचे नाव बनले. इतिहासाने त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संगीताचा आवाज पुढेही ऐकू येत राहिला.
होर्स्ट लिपमनची BBC ऐकण्याची चूक
Frankfurt Hot Club चे प्रमुख सूत्रधार
Horst Lippmann यांनाही नाझी राजवटीने सोडले नाही. Gestapo ने त्यांना गुप्तपणे BBC ऐकत असल्याचे पकडले. नाझी जर्मनीमध्ये परदेशी रेडिओ प्रसारण ऐकणे गंभीर गुन्हा मानले जात होते. त्यामुळे होर्स्टला अटक करण्यात आली. काही आठवडे तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगातील परिस्थितीमुळे त्यांची प्रकृती बिघडली. गंभीर झाली. त्यांच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांची सुटका केली. मात्र त्यानंतर होर्स्टने युद्ध संपेपर्यंत एका मित्राच्या घराच्या तळघरात लपून राहणे पसंत केले. जॅझ वाजवणारा तरुण आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अंधाऱ्या तळघरात दिवस काढत होता.
कार्लो बोहलँडरची सुटकेची युक्ती
Carlo Bohländer यांची कहाणीही तितकीच विलक्षण आहे. 1940 मध्ये त्यांना सैन्यात भरती व्हावे लागले. पण आठवडी सुट्टीत ते फ्रँकफर्टला परत येत आणि विविध क्लबमध्ये संगीत वाजवत. युद्धाच्या काळात संगीतासाठी हा प्रवास करणे एक मोठे दिव्य होते. धोकादायक होते. पुढे सैन्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात वजन कमी केले.
शेवटी ते सैन्यसेवेतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांच्या आयुष्यात युद्ध आणि संगीत सतत एकमेकांशी संघर्ष करत होते. एका बाजूला राज्याचा आदेश होता; दुसऱ्या बाजूला जॅझचे सूर होते.
हान्स ओटोचा गुप्त रेकॉर्ड संग्रह
Hans Otto Jung यांना जॅझचे रेकॉर्ड जमा करण्याची विशेष आवड होती. नाझी राजवटीने गैर-आर्यन संगीतावर निर्बंध आणले असतानाही त्यांनी विविध मार्गांनी अनेक रेकॉर्ड मिळवले. आज एका क्लिकवर संगीत मिळते. त्या काळात मात्र एकेका रेकॉर्डसाठी शोध घ्यावा लागत होता. संपर्क वापरावा लागत होता. अनेकदा तो लपवूनही ठेवावा लागत होता. सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना हा संग्रह वाढवणे कठीण झाले. आजारपणामुळे त्यांना सैन्यसेवेतून मुक्तता मिळाली आणि त्यांनी पुन्हा संगीताकडे लक्ष दिले. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक रेकॉर्ड हा त्या काळातील सांस्कृतिक दडपशाहीविरुद्धचा एक छोटासा पुरावा होता.
गुप्त रेकॉर्डिंगमध्ये जिवंत राहिलेला इतिहास
Frankfurt Hot Club च्या सदस्यांनी युद्धाच्या काळात काही गुप्त संगीत रेकॉर्डिंगही केली. त्यातील काही ध्वनिमुद्रणे पुढे जतन झाली. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. कारण ही केवळ जॅझची रेकॉर्डिंग नाहीत; ती नाझी जर्मनीतील सांस्कृतिक प्रतिकाराची ध्वनिमुद्रित साक्ष आहेत. युद्धाच्या काळात बॉम्बस्फोट, रणांगणे आणि राजकीय भाषणे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंदली गेली. पण एका बंद खोलीत काही तरुणांनी वाजवलेली जॅझची धूनही त्या काळाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. त्या सुरांमध्ये भीती होती, उत्साह होता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आवडीवरचा विश्वास होता.
संगीतापेक्षा मोठी होती स्वातंत्र्याची भावना
युद्धाच्या काळात जॅझ म्हणजे आमच्यासाठी संगीतापेक्षा अधिक होते, असे Hans Otto Jung यांनी सांगितले होते. या वाक्याचा अर्थ समजून घेतला तर Frankfurt Hot Club ची संपूर्ण कहाणी स्पष्ट होते. हुकूमशाही फक्त राजकीय विरोधकांना दडपत नाही; ती माणसाच्या दैनंदिन निवडीवरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते. कोणते पुस्तक वाचायचे, कोणते संगीत ऐकायचे, कोणती कला आवडायची, हेही सत्तेला ठरवायचे असते. अशा वेळी एखादी जॅझची धून ऐकणे हा देखील स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आग्रह ठरू शकतो. Frankfurt Hot Club ने कदाचित कोणतेही मोठे राजकीय आंदोलन उभे केले नाही; पण त्यांनी स्वतःची आवड सोडली नाही.
युद्ध संपले, पण संगीताचा प्रवास सुरूच राहिला
1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपले. नाझी राजवटीचा अंत झाला. पण Frankfurt Hot Club शी संबंधित अनेक संगीतकारांचा प्रवास तिथे थांबला नाही. त्यांनी पुन्हा जॅझ वाजवले, संगीतविश्वात काम केले आणि पुढील पिढ्यांपर्यंत हा संगीतप्रवाह पोहोचवला. काही जण जर्मन जॅझच्या इतिहासात महत्त्वाचे कलाकार म्हणून पुढे आले. त्यांच्या आयुष्याकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, नाझी सत्तेने त्यांच्या संगीतावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या संगीतप्रेमाला संपवू शकली नाही. युद्धाने त्यांचे आयुष्य बदलले; मात्र त्यांच्या हातातील वाद्य कायम राहिले.
एका सुराचा अर्थ कधी कधी खूप मोठा असतो
Frankfurt Hot Club ची कथा ऐकताना सुरुवातीला ती काही तरुणांच्या जॅझप्रेमाची गोष्ट वाटते. पण थोडे खोलात गेल्यावर तिचा अर्थ बदलतो. हा
Nazi Germany, Jazz Music, Swingjugend आणि सांस्कृतिक प्रतिकाराचा इतिहास होता. या गोष्टीद्वारे हुकूमशाहीला माणसाच्या शरीरावर आणि हालचालींवर नियंत्रण मिळवता येते; पण त्याच्या मनातली प्रत्येक आवड नष्ट करता येत नाही हे स्पष्ट होते. एका बाजूला Gestapo होती, दुसऱ्या बाजूला काही तरुण आणि त्यांची वाद्ये होती. शक्तीची तुलना केली तर सामना असमान होता. पण त्या तरुणांकडे नाझी सत्तेविरोधात आपल्याला काय ऐकायचे आहे आणि कसे जगायचे आहे हे ठरवण्याची एक विलक्षण ताकद होती.
जॅझ थांबला नाही
Frankfurt Hot Club ची कहाणी अखेरीस एका साध्या, पण ताकदवान विचारावर येऊन थांबते. सत्ता संगीतावर बंदी घालू शकते. कलाकाराला धमकावू शकते. क्लबवर नजर ठेवू शकते. रेकॉर्ड जप्त करू शकते. एखाद्या तरुणाला तुरुंगातही टाकू शकते. पण सुरांची आठवण माणसाच्या मनातून पुसणे इतके सोपे नसते. म्हणूनच आज, अनेक दशकांनंतर, Frankfurt Hot Club आणि Swingjugend ची कहाणी पुन्हा-पुन्हा सांगितली जाते. कारण त्या तरुणांनी जगाला एक महत्त्वाचा धडा दिला, तो म्हणजे कधी कधी स्वातंत्र्याचा आवाज भाषणांतून नव्हे, तर संगीताच्या एका मंजूळ सुरातूनही ऐकू येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा