किडनी विकार हा आधुनिक काळातील एक गंभीर व वेगाने वाढणारा आजार आहे. जगभरातील कोट्यवधी लोक यामुळे त्रस्त आहेत. वैद्यकीय शास्त्रात आतापर्यंत किडनीचे एकदा नुकसान झाले की ते कायमचेच असते, अशी ठाम धारणा होती. पण आता ही धारणा बदलणार आहे. एका नव्या संशोधनामुळे नुकसान झालेली किडनीही पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फायब्रोसिसमुळे किडनी पूर्ववत होण्याची शक्यता कमी
किडनी हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ती रक्तातील विषारी घटक गाळून बाहेर टाकते. शरीरातील पाणी व क्षारांचे संतुलन राखते. रक्तदाब नियंत्रणात ठेवते व लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक हार्मोन्स तयार करते. त्यामुळे किडनीचे कार्य बिघडले की, त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. विशेषतः Acute Kidney Injury म्हणजेच अचानक होणारे किडनी नुकसान अनेक वेळा पुढे Chronic Kidney Disease मध्ये रूपांतरित होते. दीर्घकाळ सुरू असलेल्या किडनी आजारात किडनीच्या पेशींमध्ये कायमस्वरूपी चट्टे तयार होतात. त्याला फायब्रोसिस म्हटले जाते. हे फायब्रोसिस एकदा तयार झाले की किडनी पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता फारच कमी राहते.
सेरामाइड्स हा संशोधनाचा केंद्रबिंदू
या नव्या संशोधनाचा केंद्रबिंदू म्हणजे सेरामाइड्स नावाचे चरबीसदृश रेणू. सेरामाइड्स हे पेशींच्या पडद्याचा एक नैसर्गिक भाग आहे. सामान्य परिस्थितीत ते शरीरासाठी उपयुक्तही असतात. पण किडनीवर ताण येतो तेव्हा म्हणजे संसर्ग, रक्तपुरवठ्यातील अडथळा, मोठी शस्त्रक्रिया, काही औषधांचे दुष्परिणाम व विषारी घटकांचा परिणाम होतो तेव्हा किडनीच्या ऊतींमध्ये सेरामाइड्सचे प्रमाण झपाट्याने वाढते. हे वाढलेले सेरामाइड्स किडनीच्या पेशींसाठी घातक ठरतात.
मायटोकॉन्ड्रियाद्वारे पेशींना ऊर्जा पुरवठा
सेरामाइड्सचा सर्वात गंभीर परिणाम मायटोकॉन्ड्रिया या पेशीतील ऊर्जाकेंद्रावर होतो. मायटोकॉन्ड्रिया पेशींना ऊर्जा पुरवण्याचे काम करते. किडनीसारख्या अवयवासाठी ही ऊर्जा अत्यंत महत्त्वाची असते. कारण, किडनीचे फिल्टरेशन हे सतत व मोठ्या प्रमाणावर चालणारे कार्य आहे. सेरामाइड्स मायटोकॉन्ड्रियाच्या कार्यात अडथळा आणतात. त्यामुळे पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही, पेशी मृत्यूच्या दिशेने पुढे सरकतात आणि हळूहळू किडनीचे संपूर्ण कार्य बिघडते. एकदा पेशी मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्या की, किडनीचे नुकसान कायमस्वरुपी होते, अशी आजवरची समजूत होती.
प्रयोगशाळेत उंदरांवर यशस्वी प्रयोग
पण ही समजूत बदलण्याचे संकेत देणारे संशोधन Cell Metabolism या आंतरराष्ट्रीय, peer-reviewed वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग करून Acute Kidney Injury च्या स्थितीत सेरामाइड्सची भूमिका सखोलपणे तपासली. त्यांनी काही उंदरांना किडनीला इजा होण्यापूर्वी सेरामाइड्सची निर्मिती कमी करणारे एक संयुग दिले. त्यानंतर त्यांच्या किडनींना कृत्रिमरित्या इजा करण्यात आली. तद्नंतर दोन्ही गटांची तुलना करण्यात आली.
प्रयोगाचे काय निघाले निष्कर्ष?
या प्रयोगाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे व आश्चर्यकारक ठरले. ज्या उंदरांना सेरामाइड्स कमी करणारे उपचार देण्यात आले, त्यांच्यात मायटोकॉन्ड्रिया पूर्णपणे कार्यरत राहिले. त्यांच्या किडनीच्या पेशींना गंभीर इजा झाली नाही. त्यांच्या किडनीची रचना सुरक्षित राहिली. तसेच किडनीचे कार्यही जवळपास सामान्य पातळीवर अबाधित राहिले. याऊलट ज्या उंदरांना हे उपचार देण्यात आले नाही, त्यांच्यात किडनीचे तीव्र नुकसान झाले. सूज, पेशी मृत्यू व किडनी रचनेत मोठे बदल दिसून आले. या परिणामांवरून असे स्पष्ट झाले की, किडनीचे नुकसान अपरिहार्य नाही. योग्यवेळी पेशी पातळीवर संरक्षण दिल्यास ते टाळता येऊ शकते.
या संशोधनामुळे किडनी उपचारांविषयी एक नवा दृष्टिकोन पुढे येण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत उपचार हे नुकसान झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यावर केंद्रित होते. पण या संशोधनाद्वारे किडनीच्या पेशींची ऊर्जा व्यवस्था म्हणजे मायटोकॉन्ड्रिया सुरुवातीच्या टप्प्यात जतन करण्यात आले तर संपूर्ण अवयवाचे संरक्षण करता येऊ शकते. सेरामाइड्सची निर्मिती रोखल्यास सूज कमी होते. पेशींचा मृत्यू थांबतो व फायब्रोसिस होण्याची शक्यता कमी होते.
किडनी रुग्णांसाठी वरदान ठरणार संशोधन
किडनी विकार असणाऱ्या रुग्णांच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. आज अनेक रुग्ण Acute Kidney Injury नंतर कधीच पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यांची वाटचाल पुढे Chronic Kidney Disease कडे होतात. त्यामुळे सेरामाइड्सवर आधारित उपचार मानवांमध्ये यशस्वी ठरले, तर किडनी इंजेनंतर तत्काळ दिले जाणारे औषध किडनीचे कार्य पुन्हा पूर्ववत करू शकते. यामुळे डायलिसिसची गरज कमी होऊ शकते. किडनी प्रत्यारोपणाचे प्रमाण घटू शकते व रुग्णांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते.
विशेषतः संसर्ग, अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया किंवा औषधांचे दुष्परिणाम यामुळे होणाऱ्या अचानक किडनी नुकसानीत हे उपचार क्रांतिकारी ठरू शकतात. पण दीर्घकाळ चाललेल्या Chronic Kidney Disease मध्ये, जिथे मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी चट्टे तयार झालेले असतात, तिथे सेरामाइड्स रोखणे कितपत प्रभावी ठरेल, याबाबत अजून निश्चित निष्कर्ष उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपचारांकडे सध्या तरी आशादायक वैज्ञानिक दिशा म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.
किडनीच्या आजाराची दिशा बदलणार
शास्त्रज्ञ सध्या या संशोधनाच्या विविध टप्प्यांवर काम करत आहेत. यात मानवी किडनी पेशींवर प्रयोग, सुरक्षित डोस निश्चित करणे, प्रारंभिक क्लिनिकल ट्रायल्स आणि मूत्रातील सेरामाइड्स मोजण्यासाठी बायोमार्कर्स विकसित करणे आदी प्रक्रियांचा समावेश आहे. यात यश आले तर भविष्यात लिपिड-आधारित थेरपी, पेशी पुनरुत्पादन तंत्र आणि अँटी-फायब्रोसिस उपचार यांचा संगम किडनी उपचारात नवे पर्व आणू शकतो.
भविष्यात हे संशोधन मानवांमध्ये यशस्वी ठरल्यास किडनी उपचारांची दिशा “नुकसान कमी करण्यापासून” थेट “किडनी पूर्ववत” होण्यापर्यंत वळू शकते. आज केवळ आशेचा किरण असणारे हे संशोधन उद्या किडनी रुग्णांसाठी जीवन बदलणारे ठरू शकेल यात शंका नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा