कधी - कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक अद्भुत व अविश्वसनीय असते. एकाचेळी जुळी मुले जन्माला येणे हेच अनेकांसाठी आश्चर्याची बाब असते. त्यामुळे एकाचवेळी 9 बाळांचा जन्म झाल्याची घटना प्रथमदर्शनी कुणालाही अफवा वाटेल. पण माली (Mali) देशातील हलीमा सिसे (Halima Cissé) नामक महिलेने एक-दोन नव्हे तर तब्बल 9 बाळांना एकाचवेळी जन्म देत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.
मे 2021 मध्ये ही महिला बाळंत झाली आणि वैद्यकीय इतिहासासह मानवी जीवनाच्या कहाणीत एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अध्याय जोडला गेला...
सुरुवातीपासूनच हाय रिस्क गर्भधारणा
हलीमा सिसे ही मालीतील एका सामान्य कुटुंबातील महिला. तिचे आयुष्य इतर महिलांप्रमाणेच सर्वसाधारण होते. ती गरोदर राहिली. तिच्या मनात आई होण्याचा एक वेगळाच आनंद निर्माण झाला. सोबत मनात एका विशिष्ट जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली. सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना तिच्या उदरात 7 बाळे दिसत होती. 7 बाळे एकाच गर्भात असणे हेच अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक मानले जाते. त्यामुळे ही गर्भधारणा सुरुवातीपासूनच “हाय रिस्क” म्हणून ओळखली जात होती. हलीमा आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा काळ आनंद, भीती आणि अनिश्चिततेने भरलेला होता.
बाळंतपणासाठी दुसऱ्या देशात हलवले
मालीमध्ये एवढ्या गुंतागुंतीच्या गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली प्रगत वैद्यकीय सुविधा मर्यादित होती. त्यामुळे माली सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला. हलीमा सिसे यांना विशेष उपचारांसाठी फ्रान्सला हलवण्यात आले. फ्रान्समधील एका अत्याधुनिक रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू झाले. प्रत्येक दिवस आईसह बाळांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आणि जीवघेणा होता.
हलीमा बाळंत झाली अन् इतिहास रचला गेला
मे 2021 मध्ये अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे (सी-सेक्शन) प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय पथक 7 बाळांसाठी सज्ज होते. मात्र प्रत्यक्षात जे घडले, त्याने संपूर्ण वैद्यकीय जगाला हादरवून सोडले. हलीमाच्या पोटातून एकामागून एक बाळ जन्माला येत गेले. 7 बाळांनंतरही प्रसूती थांबली नाही. आठवे आणि नंतर नववे बाळ जन्माला आले. त्या क्षणी ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित असलेले डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी सर्वचजण स्तब्ध झाले. कारण त्यांच्या डोळ्यांपुढे एक इतिहास घडत होता.
एकामागून एक मुले जन्मास येत गेली
या 9 बाळांमध्ये 5 मुली आणि 4 मुले होती. प्रत्येक बाळ फार कमी वजनाचे होते. काही बाळांचे वजन अर्धा किलोसुद्धा नव्हते. त्यामुळे त्यांना तात्काळ नवजात अतिदक्षता विभागात (NICU) ठेवण्यात आले. पुढील अनेक आठवडे आणि महिने हे केवळ बाळांसाठीच नव्हे, तर वैद्यकीय विज्ञानासाठीही कसोटीचे होते. इतक्या अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या 9 बाळांना जिवंत ठेवणे हे अत्यंत अवघड आव्हान होते.
पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे, आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने आणि सातत्यपूर्ण काळजीमुळे सर्व बाळांची तब्येत सुधारली. हलीमा सिसे यांच्यासाठी हा काळ शारीरिक वेदनांबरोबरच मानसिक संघर्षाचाही होता. मात्र आपल्या बाळांसाठी त्यांनी असामान्य धैर्य दाखवले. अखेर अनेक महिन्यांच्या उपचारांनंतर, सर्व 9 बाळे सुखरूप आणि निरोगी असल्याचे स्पष्ट झाले.
गिनीज बुकमध्ये झाली नोंद
या अभूतपूर्व घटनेची दखल गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने घेतली. “Most children delivered at a single birth to survive” म्हणजेच एकाच वेळी जन्मलेली आणि जिवंत राहिलेली सर्वाधिक मुले, या श्रेणीत हलीमा सिसे यांचे नाव नोंदवले गेले. यापूर्वी हा विक्रम 8 मुलांचा होता. हलीमा सिसे यांनी तो मोडला आणि एक नवा इतिहास रचला.
आज, ही 9 बाळे 4 वर्षांची झाली आहेत. सर्व बाळे निरोगी असून, हसत-खेळत मोठी होत आहेत. त्यांच्या खोड्या, गोंधळ आणि निरागस हास्याने घर नेहमी भरलेले असते, असे हलीमा सिसे सांगतात. जे बाळे कधी जगतील की नाही अशी शंका होती, तीच बाळे आज आयुष्याचा आनंद घेत आहेत, हेच या कथेचे सर्वात मोठे यश आहे.
निसर्ग, विज्ञान अन् मानवी जिद्द
ही घटना केवळ एका आईची गोष्ट नाही. ती मातृत्वाच्या ताकदीची, मानवी इच्छाशक्तीची आणि वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीची साक्ष आहे. हा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड केवळ एक आकडा नसून, तो एका आईच्या संघर्षाचा, वेदनांचा आणि विजयाचा दस्तऐवज आहे. हलीमा सिसे यांची कहाणी आपल्याला हेच सांगते की कधी कधी निसर्ग, विज्ञान आणि माणसाची जिद्द एकत्र आली, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा