भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

70 व्या वर्षी आई होणे बरोबर की चूक?



नमस्कार मित्रांनो,  

तुम्ही कधी विचार केलाय का की मातृत्वाला वयाची मर्यादा असते?  

गुजरातमधील जिवुनबेन रबारी या 70 वर्षीय महिलेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्या IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने आई बनल्या. हा केवळ वैद्यकीय चमत्कार नाही, तर स्वप्नांची, आशेची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची विजयगाथा आहे.

घडलं असं की… 


जिवुनबेन आणि त्यांचे पती मलधारीभाई रबारी (वय 75) यांचं लग्न 55 वर्षांपूर्वी झालं होतं. पण त्यांना अपत्यप्राप्तीचे सूख लाभले नाही. यामुळे गावात त्यांना लोकांचे टोमणे खावे लागत होते. या दोघांनाही केव्हाच मूल होणार नाही, असे गावकरी बोलायचे. पण जिवुनबेन यांनी कधीच हार मानली नाही. 2024 मध्ये त्यांनी IVF सेंटर गाठलं आणि डॉक्टरांना सांगितलं, “मला आई व्हायचंय, बस्स.”

त्यांचे वय पाहून डॉक्टरही प्रथम घाबरले. कारण 55 वर्षांनंतर IVF यशस्वी होण्याची शक्यता केवळ 1% व त्याहून कमी असते. पण जिवुनबेन यांची इच्छाशक्ती आणि तब्येत पाहून डॉ. नितेश गुप्ता यांनी हे आव्हान स्वीकारले. आत्ता 9 महिन्यांनंतर… २०२५ मध्ये त्यांनी एका निरोगी मुलीला जन्म दिला. 

विश्वविक्रम!  

यापूर्वी हा विक्रम भारतातच होता. 66 वर्षीय रजिया बेगम यांच्याकडे. आता जिवुनबेन रबारी यांनी तो मोडला. Guinness World Records नेही त्यांच्या विक्रमाची दखल घेतली आहे.

डॉक्टर काय म्हणतात?  

“वयाच्या पन्नाशीनंतर गर्भाशयाची क्षमता कमी होते. त्यात अंडी तयार होत नाहीत. पण डोनर एग्स आणि हार्मोन थेरपीने हे शक्य झालं,” असे डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.



गावाची प्रतिक्रिया काय?  

काहींनी कौतुक केलं, तर काहींनी टीका केली -“वय झाल्यावर मूल कशाला?”  

पण जिवुनबेन म्हणाल्या, “मला फक्त एकदा ‘आई’ म्हणून हाक ऐकायची होती. आता माझं आयुष्य पूर्ण झालं.”

बरोबर वाटण्याची कारणे

1. इच्छाशक्ती आणि मानवी हक्क

मातृत्व ही फक्त जैविक गोष्ट नाही, ती मनाची आस आहे. जिवुनबेन यांनी 55 वर्षं ही आस दाबून ठेवली. आता वैद्यकीय तंत्रज्ञानाने ती पूर्ण करणं शक्य झालं, तर त्यात चुकीचं काय?

2. IVF मध्ये डोनर एग्स वापरले

त्यांची स्वतःची अंडी नव्हती, पण डोनर एग्स आणि पतीचे स्पर्म वापरले. म्हणजे नैसर्गिक प्रजननक्षमता संपली होती तरीही तंत्रज्ञानाने मदत केली. हे असंही करतात 40-50 वर्षांच्या अनेक जोडप्यांना.

3. बाळ व बाळंतीण ठणठणीत 

जन्मानंतर दोघेही निरोगी आहेत. 70 वर्षांतही त्यांची तब्येत चांगली आहे. म्हणजे सध्यातरी धोका दिसत नाही.

4. आपण ठरवणारे कोण?

मूल व्हावं की नाही, कधी व्हावं, हा जोडप्याचा वैयक्तिक निर्णय आहे. समाजाने त्यात ढवळाढवळ का करावी?



चूक वाटण्याची कारणे

1. बाळाच्या भविष्याचा प्रश्न

जेव्हा बाळ 10 वर्षांचे होईल तेव्हा त्याची आई 80 वर्षांची असेल. 15 वर्षांचे होईल, तेव्हा आई-बाबा कदाचित हयातही नसतील. मूल अनाथ होईल का?

2. शारीरिक धोका

70 व्या वर्षात गरोदरपण आणि बाळंतपण यात आईच्या जीवाला धोका असतो. हृदय, किडनी, हाडं यांच्यावर प्रचंड ताण येतो. यातून काही झालं तर बाळाचं काय?

3. निसर्गाच्या विरुद्ध

निसर्गाने महिलांची मासिक पाळी 45-55 व्या वर्षी बंद केली म्हणजे प्रजननक्षमता संपली असे संकेत दिले. आपण तंत्रज्ञानाने त्याला आव्हान देतोय. हे नैतिकदृष्ट्या बरोबर आहे का?

4. भावनिक आधार

लहान मूल आई-बाबांच्या मांडीवर खेळायला हवं. 70-75 वर्षांच्या मांडीवर ते शक्य आहे का?



माझे वैयक्तिक मत

वैद्यकीयदृष्ट्या शक्य असेल आणि जोडपे पूर्ण जागरूक असेल तर बरोबर आहे.

पण 55-60 वर्ष ही वयमर्यादा ठेवायला हवी, कारण त्यानंतर बाळाच्या भविष्याचा प्रश्न गंभीर होतो.

जिवुनबेन यांच्यासारख्या प्रकरणाचे मी कौतुक करतो, कारण त्यांनी 55 वर्षे वाट पाहिली. पण प्रत्येकाने असं करावं असं मात्र नाही वाटत.

सर्वोत्तम पर्याय काय?

50-55 वर्षांपर्यंत IVF करून घ्या किंवा दत्तक घ्या. दत्तक घेतलं तर एक अनाथ मूल मिळतं आणि तुमचं मातृत्वही पूर्ण होतं.

तुमचं मत काय?

७० वर्षांत आई होणं बरोबर आहे का?

की वयाची मर्यादा असावी?

कमेंटमध्ये नक्की सांगा… कारण हा प्रश्न फक्त जिवुनबेन यांचा नाही, तो प्रत्येकाचा आहे जो अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेला आहे.



0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा