मानवजातीच्या इतिहासातील सर्वात काळे प्रकरण म्हणून गुलामगिरीकडे पाहिले जाते. धर्म, वंश, सत्ता आणि पैशाच्या जोरावर माणसाने माणसालाच विकत घेतले. त्याला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली. आफ्रिकन लोकांच्या बाबतीत ही गुलामगिरी केवळ श्रमशोषणापुरती मर्यादित नव्ती. ती त्यांच्या शरीरावर, संततीवर व अस्तित्वावर चालवलेली अमानुष सत्ता होती. पेटा सेका ही अशाच एका गुलामाची कथा आहे. त्याचे संपूर्ण आयुष्य माणूस म्हणून नव्हे तर मालमत्ता व उत्पादन यंत्रणा म्हणून वापरले गेले.
प्रथम पाहू आफ्रिकन गुलामगिरीची पार्श्वभूमी
15 व्या शतकापासून युरोपियन वसाहतवादी शक्तींनी आफ्रेकेतून कोट्यवधी लोकांना पकडून अमेरिकन खंडात नेले. ब्राझाली, कॅरिबियन बेटे व उत्तर - दक्षिण अमेरिका हे गुलामांचे प्रमुख बाजार बनले. ब्राझीलने सर्वाधिक आफ्रिकन गुलाम आयात केले. ऊस शेती, खाणी, बंदरे व मोठ्या जमीनदारीसाठी गुलामांची गरज होती. या व्यवस्थेत गुलाम हे माणूस नव्हते, तर माल होते. त्यांच्या आयुष्याला किंमत नव्हती. त्यांच्या शरीराला मात्र चांगला बाजारभाव होता.
कोण होता पेटा सेका?
पेटा सेका याचे मूळ नाव Roque Jose Florencio होते. तो आफ्रिकेत नज्मला, पण गुलाम म्हणून ब्राझीलमध्ये गेला. 19 व्या शतकात तो एका ब्राझिलियन जमीनदाराच्या मालकीचा गुलाम बनला. त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची उंची व ताकद. त्याच्याविषयी असे सांगितले जाते की, पेटा सेका तब्बल 7 फूट 2 इंच उंच, अत्यंत बलदंड व असामान्य शारीरिक क्षमतेचा होता. त्या काळात अशी शरीरयष्टी गुलामांच्या बाजारात प्रचंड किंमतीची मानली जात होती.
गुलामांचे प्रजनन हाच होता व्यवसाय
गुलामगिरीत माणसाचे मूल्य त्याच्या ताकदीवर, वयावर व शरीरावर ठरत होते. बलवान पुरुष गुलामांना शेतकाम, ओझी वाहणे व कठोर श्रमांसाठी वापरले जाई. पण काही जमीनदारांनी याहून पुढे जात गुलामांच्या प्रजननलाच व्यवसाय बनवले. बलदंड पुरुष व तरुण स्त्री गुलाम यांच्यापासून जन्मणारी मुले भविष्यात अधिक उपयुक्त गुलाम ठरतील, असा त्यामागचा अमानुष हिशेब होता.
पेटा सेका ब्रीडर कसा बनला?
पेटा सेका अत्यंत ताकदवान असल्याने त्याच्या मालकाने त्याचा वापर ब्रीडर म्हणून करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच त्याच्याकडून मुद्दाम संतती निर्माण करून घेणे. गुलाम महिलांना त्याच्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जाईल. यात ना त्याची संमती महत्त्वाची होती, ना त्या स्त्रियांची. हा संपूर्ण प्रकार म्हणजे मानवी शरीरावर केलेला उघड हिंसाचार होता.
इतिहासातील काही नोंदींनुसार पेटा सेका 200 हून अधिक मुलांचा बाप होता. ही मुले जन्मताक्षणीच गुलाम ठरत. त्यानंतर त्यांची विक्री केली जात असत. या मुलांमधून जमीनदाराने मोठी संपत्ती कमावली.
पितृत्व असूनही बाप नसेला माणूस
पेटा सेका हा जैविकदृष्ट्या बाप होता. पण सामाजिकदृष्ट्या तो कधीच वडील होऊ शकला नाही. त्याला आपल्या मुलांना ओळखण्याचा, त्याच्याशी नाते जोडम्याचा किंवा त्यांचे भविष्य ठरवण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्याच्या डोळ्यांपुढे त्याचीच मुले विकली जात होती. वेगवेगल्या मालकांकडे पाठवली जात होती. हे दृश्य एखाद्या माणसाच्या मनावर किती खोलवर जखमा करत असेल याची कल्पनाही कुणी करू शकत नाही.
130 वर्षांचे आयुष्य लाभल्याचा दावा
पेटा सेका विषयी असा दावा केला जातो की, तो जवळपास 130 वर्षे जिवंत होता. पण काही इतिहासकार त्यावर शंका घेतात. कारण, त्या काळातील जन्मनोंदी अचूक नव्हत्या. मात्र एवढे निश्चित आहे की, तो दीर्घकाळ जगला. अनेक पिढ्या त्याच्या समोर गुलाम म्हणून जन्मल्या. त्याचे प्रदीर्घ आयुष्य म्हणजे गुलामगिरीच्या क्रौर्याचे जिवंत स्मारकच होते.
ब्राझीलमधील गुलामगिरीचा अंत
ब्राझीलमध्ये 1888 साली गुलामगिरी अधिकृतपणे रद्द करण्यात आली. पण त्या आधाची पेटा सेका वृद्द झाला होता. त्याला प्रत्यक्ष स्वातंत्र्य अनुभवायला मिळाले की नाही याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. पण गुलामगिरी संपली तरी अशा लाखो लोकांच्या आयुष्यावर झालेल्या जखमा कधीच भरून निघाल्या नाहीत.
आज ब्राझीलमधील अनेक लोक स्वतःला पेटा सेका यांचे वंशज मानतात. पण हा वंश अभिमानाचा नसून, इतिहासातील अन्यायाची आठवण करून देणारा आहे. पेटा सेका ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, तर ती संपूर्ण गुलाम व्यवस्थेचे भयावह रूप आहे. माणसाला केवळ शरीर म्हणून पाहिले जेते तेव्हा सभ्यता टिकू शकते का? असा प्रश्न पेटा सेकाची जीवनकथा वाचताना व ऐकताना डोळ्यापुढे उभा राहतो. माझ्याही डोळ्यापुढे उभा राहिला. तुमच्या?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा