आजच्या 21 व्या शतकात अंतराळ विज्ञान हे केवळ वैज्ञानिक संशोधनापुरते मर्यादित राहिले नाही. ते आता भूराजकारण, संरक्षण, अर्थकारण व जागतिक वर्चस्व यांच्याशी थेट जोडले गेले आहे. उपग्रह, अंतराळ स्थानके, चंद्र व मंगळ मोहिमा आणि अंतराळ तंत्रज्ञानावर आधारित लष्करी प्रणाली यामुळे अंतराळ हे आज नव्या प्रकारचे सामरिक क्षेत्र बनले आहे. त्यामुळे चीनने पृथ्वीपासून सुदूर अंतराळात स्वर्गीय महाल अर्थात Tiangong हे अंतराळ स्थानक उभारले आहे. आता हा अंतराळ स्थानक भारताससह जगासाठी एक धोका आहे की संधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Tiangong नेमके काय आहे?
Tiangong हे चीनचे कायमस्वरुपी मानवी वस्ती असणारे अंतराळ स्थानक आहे. ते लो-अर्थ ऑर्बिटमध्ये (Low Earth Orbit) पृथ्वीभोवती तब्बल 350 ते 400 किलोमीटर उंच अंतरावर फिरते. चीनला ISS अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेत सहभागी होता आले नाही. कारण, अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी साम्यवादी चीनवर निर्बंध लादले होते. त्यामुळे चीनने Tiangong हे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला.
Tiangong प्रमुखतः 3 प्रमुख मॉड्यूल्सवर आधारित आहे. Tianhe (मुख्य मॉड्यूल), Wentian आणि Mengtian (प्रायोगिक मॉड्यूल्स). तिथे जैविक संशोधन, अवकाशात मानवी शरीरावर होणारे परिणाम, नवीन तंत्रज्ञान चाचण्या आदी विविध वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. वरकरणी हे स्थानक पूर्णतः वैज्ञानिक हेतूंसाठी असले तरी, त्यामागे असणारी चीनची रणनीतिक व लष्करी महत्त्वकांक्षा दुर्लक्षित करता येत नाही.
चीनची अंतराळ रणनीती व जागतिक संदर्भ
चीनने मागील 2 दशकांत अंतराळ क्षेत्रात वेगवान प्रगती साधली आहे. स्वतःची उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली (BeiDou), अँटी -सॅटेलाइट क्षेपणास्त्र चाचण्या, चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात यान उतरवे, मंगळ ग्रहावर रोव्हर पाठवणे आदी गोष्टी चीनच्या अंतराळ महत्त्वकांक्षेचे निदर्शक आहेत. त्यामुळे Tiangong हा केवळ वैज्ञानिक प्रयोग नाही. चीनच्या दीर्घकालीन सामरिक दृष्टिकोनाचा भाग आहे.
आंतराराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, चीन अंतराळ स्थानकाच्या मदतीने भविष्यात अंतराळातील वाहतूक नियंत्रण, उपग्रह निरीक्षण, डेटा संकलन व इतर संभाव्य लष्करी प्रयोग करू शकतो. त्यामुळेच भारतासारख्या देशांनी या घडामोडींकडे केवळ वैज्ञानिक नव्हे तर रणनीतिक दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे.
भारतासाठी काही धोका आहे का?
चीनचे अंतराळ स्थानक भारतासाठी काही बाबतीत संभाव्य धोका ठरू शकते. सर्वात महत्त्वाचा धोका म्हणजे अंतराळातून होणारी निगराणी (Space Surveillance). आधुनिक उपग्रह व अंतराळ प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून भूभागा, लष्करी हालचाली, उपग्रह नेटवर्क्स व संप्रेषण यावर लक्ष ठेवणे सहज शक्य आहे. चीन - भारत सीमेवरील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेतली तर ही बाब भारतासाठी चिंताजनक ठरू शकते.
दुसरा धोका म्हणजे अंतराळातील सामरिक स्पर्धा. चीनने अंतराळ स्थानकाच्या माध्यमातून लष्करी तंत्रज्ञानाची चाचणी किंवा भविष्यातील युद्धतंत्र विकसित केले तर आशियातील सामरिक संतुलन बदलू शकते. यामुळे अंतराळ हे भविष्यातील युद्धाचे नवे मैदान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानातील दरी वाढण्याचा धोका. चीनने अंतराळ संशोधनात मोठी आघाडी घेतली आणि भारत त्या वेगाने पुढे गेला नाही, तर दीर्घकालीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत मागे पडू शकतो. त्यामुळे वैज्ञानिक, आर्थिक व संरक्षणात्मक परिणाम होऊ शकतात.
भारतासाठी नव्या संधी काय?
चीनचे अंतराळ स्थानक भारतासाठी धोकादायक वाटले असले तरी भारताकडे या संकटाचे संधीत रुपांतर करण्याचीही संधी आहे. सर्वप्रथम चीनच्या अंतराळ स्थानकामुळे भारताला स्वतःच्या अंतराळ कार्यक्रमाला अधिक वेग देण्याची प्रेरणा मिळाली आहे. ISRO ने यापूर्वीच गगनयान मानवी अंतराळ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भारत स्वतःची अंतराळ स्थानक उभारण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दुसरी संधी म्हणजे जागतिक सहकार्य. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हळूहळू आपल्या शेवटच्या घटका मोजण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारत, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांसोबत संयुक्त संशोधन, डेटा शेअरिंग व शांततामय अंतराळ वापरासाठी पुढाकार घेऊ शकतो. चीनच्या एकतर्फी प्रगतीच्या तुलनेत संतुलन साधण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
तिसरी संधी म्हणजे तंत्रज्ञान व नवोन्मेष. चीनच्या प्रगतीकडे केवळ स्पर्धक म्हणून न पाहता, भारताने स्वतःच्या ताकदीवर भर देणे आवश्यक आहे. कमी खर्चिक अंतराळ मोहिमा, विश्वासार्ह उपग्रह प्रक्षेपण व खासगी क्षेत्राचा सहभाग हे भारताचे मॉडेल आधीच जागतिक पातळीवर प्रशंसनीय ठरले आहे.
भारताची तयारी व भविष्यातील दिशा
ISRO ने गत काही वर्षांत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चांद्रयान - 3 चे यश, आदित्य-L1 सौर मोहिम, मंगळयानासारख्या प्रकल्पांनी भारताची वैज्ञानिक क्षमता सिद्ध केली आहे. गगनयान प्रकल्पाद्वारे भारत मानवी अंतराळ उड्डाणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर भारतासाठी स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचा मार्ग खुला होईल.
याशिवाय भारताने अंतराळ धोरण (Space Policy), खासगी कंपन्यांसठी खुली कवाडे व संरक्षणात्मक अंतराळ यंत्रणा यावरही भर देण्याची गरज आहे. अंतराळाला शांततेचे क्षेत्र म्हणून जपताना, राष्ट्रीय सुरक्षेचीही तितकीच काळजी घ्यावी लागेल.
त्यामुळे चीनचे Tiangong अंतराळ स्थानक हे भारतासाठी केवळ एक धोका किंवा एक संधी अशा सोप्या चौकटीत पाहता येणार नाही. ते एकाचवेळी इशारा व संधी आहे. धोका या अर्थाने की, अंतराळातील सामरिक स्पर्धा वाढत आहे आणि संधी या अर्थाने की भारताला स्वतःच्या वैज्ञानिक, तांत्रिक व रणनीतिक क्षमतेला नव्या उंचीवर नेण्याची वेळ आली आहे.
भारताने दूरदृष्टीने विचार करून शांततामय अंतराळ वापर, आंतरराष्ट्रीय सहकार्य व स्वदेशी तंत्रज्ञान विकास यावर भर दिला, तर चीनचे अंतराळ स्थानक भारतासाठी अडथळा ठरण्याऐवजी प्रगतीचा प्रेरणास्त्रोत ठरू शकतो. कारण, अतंराळ हे केवळ राष्ट्रांच्या वर्चस्वाचे नव्हे, तर मानवजातीच्या सामूहिक भविष्याचे क्षेत्र आहे. त्या भविष्यात भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते.


.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा