रात्रीच्या अंधारात लाखो तारे चमकतात. त्या ताऱ्यांतून निघणारा प्रकाश म्हणजे त्या ताऱ्यांची आपल्यासोबत होणारी एक छोटीशी भेट. पण त्या ताऱ्यांमधून आपल्याकडे फक्त प्रकाशच येतो असे नाही. तर त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या अदृश्य किरणांची बरसातही आपल्यावर होत असते. या किरणांपैकी काही किरणे फार सौम्य, तर काही एवढे शक्तिशाली असतात की त्यांच्यापुढे माणूसच काय पृथ्वीही अगदी किरकोळ वाटते. अशा शक्तिशाली किरणांना आपण गामा रे (Gamma Rays) असे म्हणतो.
या ब्लॉगद्वारे आपण गामा रे म्हणजे काय? ते कुठून येतात? ते धोकादायक का आहेत? पण तरीही ते आपल्यासाठी उपयुक्त कसे ठरतात? या प्रश्नांचा धुंडाळा घेऊया.
गामा रे म्हणजे विद्युतचुंबकीय किरणे
आपण रोजच्या जीवनात किरण हा शब्द अनेकदा ऐकतो. सूर्यकिरण, उष्णतेचे किरण, एक्स रे आदी... किरणे म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडतो. साध्या शब्दांत सांगायचे तर किरणे म्हणजे ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग. ही ऊर्जा कधी आपल्याला प्रकाशासारखी दिसते, तर कधी पूर्णपणे अदृश्य असते. शास्त्रज्ञांनी या सर्व किरणांना एकत्र करून त्याला विद्युतचुंबकीय वर्णपट असे नाव दिले आहे. या वर्णपटात रेडिओ व्हेव्हपासून ते गामा रेपर्यंत अनेक प्रकार येतात. या सर्वांत गामा रे हे सर्वात ऊर्जावान व सर्वात शक्तिशाली असतात.
गामा रे म्हणजे विद्युतचुंबकीय किरणांपैकी अत्यंत ऊर्जायुक्त किरणे. त्यांची तरंगलांबी फारच लहान असते. म्हणजे लाटा खूप दाट वेगवान असतात. म्हणूनच त्यांच्यात खूप शक्ती असते. हीच शक्ती त्यांना भिंती, लोखंड, कधीकधी मानवी शरीरसुद्धा भेदून जाण्याची क्षमता देते. त्यामुळेच गामा रे हे सामान्य प्रकाशासारखे नसून, फारच वेगळे व प्रभावी किरणे आहेत. (Electromagnetic Spectrum)
गामा रे कसे तयार होतात?
गामा रे हे असेच कुठेही निर्माण होत नाही. त्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. अंतराळात अशा अनेक घटना घडतात, जिथे अफाट ऊर्जा मुक्त होते. मोठा तारा फुटला की होणाऱ्या सुपरनोव्हा स्फोटातून, न्यूट्रॉन ताऱ्यांमधून व ब्लॅक होलजवळील घडामोडींमधून गामा रे निर्माण होतात. कधी कधी अंतराळात काही सेकंदांसाठी प्रचंड स्फोट होतो आणि त्या क्षणात एवढी मोठी ऊर्जा बाहेर पडते की, त्यातून गामा रेचा मुसळधार मारा होता. अशा घटनांना गामा रे बर्स्ट म्हटले जाते. हे आजवर ओळखलेले विश्वासातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात.
पृथ्वीवरही गामा रे तयार होतात, पण ते नैसर्गिक नसून, मानवनिर्मित किंवा नियंत्रित परिस्थितीतले असतात. अणुकेंद्रातील अभिक्रियांमधून, बॉम्बस्फोट स्फोटात किंवा काही वैद्यकीय उपकरणांमधूनही गामा रे निर्माण होतात. फरक एवढाच की, अंतराळातील गामा रे आपल्या नियंत्रणाबाहेर असतात आणि पृथ्वीवर वापरले जाणारे गामा रे मानव नियंत्रित असतात.
गामा रे घातक की वरदान
गामा रे अत्यंत धोकादायक का मानले जातात? याचे कारणही समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. मानवी शरीर कोट्यवधी पेशींनी बनलेले असते. प्रत्येक पेशीत DNA असतो. DNA म्हणजे जणू काही आपल्या शरीराचा आराखडाच. गामा रे जेव्हा शरीरात शिरतात, तेव्हा ते या डीएनएला हानी पोहोचवू शकतात. डीएनए तुटल्यामुळे पेशींचे काम बिघडते. काही पेशी मरतात. काही पेशी चुकीच्या पद्धतीने वाढू लागतात. याच चुकीच्या वाढून कॅन्सरसारखे आजार निर्माण होतात. त्यामुळे अनियंत्रित गामा किरणोत्सर्ग मानवासाठी घातक ठरतो.
पण हीच शक्ती योग्य नियत्रणात वापरली गेली, तर ती मानवासाठी वरदान ठरते. कॅन्सरच्या उपचारात रेडिओथेरेपीचा वापर केलाज ातो. या उपचारात उच्च ऊर्जेचे किरण वापरून कॅन्सच्या वाईट पेशी नष्ट केल्या जातात. डॉक्टर अत्यंत अचूक मोजमाप करून किरणांचा मारा फक्त वाईट पेशी नष्ट करतात. यामुळे निरोगी पेशींना कमीत कमी इजा होते. यामुळे रुग्णांना जीवदान मिळते.
याशिवाय गामा रेचा वापर वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठीही केला जातो. शस्त्रक्रियेची साधने, सिरींज व इतर उपकरणांवरील सूक्ष्म जंतू गामा किरणांमुळे नष्ट होतात. काही देशांमध्ये अन्न सुरक्षित राहावे म्हणून अनियंत्रित प्रमाणात किरणोत्सर्ग केला जातो. त्यामुळे अन्नातील जंतू मरतात आणि अन्न जास्त काळ टिकते.
पृथ्वीवर जीवसृष्टी कशी टिकली?
एवढे घातक किरण असूनही पृथ्वीवर जीवसृष्टी कशी टिकली? असा प्रश्न आता तुमच्या मनात उभा राहील. तर त्याचे उत्तर पृथ्वीच्या नैसर्गिक सुरक्षा कवचात दडले आहे. पृथ्वीभोवती असणारे चुंबकीय क्षेत्र अनेक घातक कणांना वळवते. विशेषतः पृथ्वीचे वातावरण हे स्वतःच एक तिची संरक्षण ढाल आहे. अंतराळातून येणारे बहुतांश गामा रे वातावरणातच शोषले जातात किंवा नष्ट होतात. हे वातावरण नसते तर पृथ्वीवर जीवनाची कल्पनाही करता आली नसती.
तरीही शास्त्रज्ञ सांगतात की, एखादा प्रचंड गामा रे बर्स्ट थेट पृथ्वीच्या दिशेने आला तर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. ओझोन थर नष्ट होऊ शकतो. असे झाले तर सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा वाढून त्याचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होऊ शकतो.
काही संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या इतिहासातील काही मोठ्या सामूहिक विलुप्ततेमागे अंतराळातील अशाच घटना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशा घटना अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे आजच्या घडीला घाबरण्याचे काहीही कारण नाही.
कोणतीही शक्ती स्वतः वाईट किंवा चांगली नसते
गामा रे आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतात. तो म्हणजे शक्ती स्वतः वाईट किंवा चांगली नसते. ती कशी वापरली जाते, यावर सर्वकाही अवलंबून असते. अणुऊर्जा जशी आपल्या घरातील दिवा पेटवू शकते, तशी ती शहरांचा विध्वंसही करू शकते. गामा रे चेही अगदी तसेच आहे. अनियंत्रित असतील तर विध्वंसक, पण नियंत्रित असतील तर जीव संरक्षक...
थोडक्यात सांगायचे तर गामा रे हे विश्वातील सर्वात शक्तिशाली किरणे आहेत. ही किरणे आपल्याला घाबरवत नाहीत, तर आपले ब्रह्मांड किती अद्भूत व शक्तिशाली गोष्टींनी भरलेले हे समजवण्यासाठी आहेत.
माझ्या ब्लॉगद्वारे एखाद्या विद्यार्थ्याला गामा रे समजले, तर उद्या तोच मुलगा किंवा मुलगी या शक्तीचा योग्य वापर करून मानवजातीचे भविष्य अधिक सुरक्षित व उज्वल करेल यात शंका नाही.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा