अटलांटिक महासागराच्या निळ्या पाण्यात एक अदृश्य त्रिकोण आहे. त्या त्रिकोणात विमान व जहाज अचानक बेपत्ता होते. कंपास दिशा दाखवणे विसरतो. हे सर्वकाही एलियन्सचा वावर व प्राचीन नगरी अटलांटिसच्या अवशेषांमुळे निर्माण होणाऱ्या विचित्र ऊर्जेमुळे होत असल्याचे सांगितले जाते. हा प्रदेश म्हणजे... बर्म्युडा ट्रायंगल, जगातील सर्वात रहस्यमय व गूढ भाग!
या भागात जोरदार वादळ निर्माण होतात. लाटांच्या प्रचंड भिंती उभ्या राहतात. मिथेने वायूचे बुडबुडे समुद्रतळातून वर येऊन जहाज बुडवतात असेही मानले जाते. हे सर्व एलियन्समुळे होते की, अटलांटिसच्या क्रिस्टल ऊर्जेमुळे? याचा धुंडाळा आपण या ब्लॉगद्वारे घेऊया...
बर्म्युडा ट्रायंगल हा जगातील एक सर्वाधिक गूढ प्रदेश आहे. त्याविषयी अनेक रहस्यमय कथा सांगितल्या जातात. अनेक दशकांपासून लोकांमध्ये या प्रदेशाविषयी कुतूहल आहे. काहीजण हा एक गूढ भौगोलिक प्रदेश मानतात, तर काही जण भीतीदायक प्रदेश म्हणून ओळखतात. प्रत्यक्षात मात्र बर्म्युडा ट्रायंगल ही कोणतीही वैज्ञानिक संकल्पना नाही. तो अधिकृत भौगोलिक प्रदेशही नाही. मानवी कल्पनाशक्ती व माध्यमांच्या मांडणीतून ही संकल्पना तयार झाली आहे. त्यामुळे या विषयाकडे आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
बर्म्युडा ट्रायंगल अटलांटिक महासागरातील एक काल्पनिक त्रिकोण आहे. त्याचा कोणताही अधिकृत नकाशा नाही. पण सामान्यतः तो मियामी, बर्म्युडा बेटे आणि सान हुआन या 3 ठिकाणांना जोडणारा भाग असल्याचे मानले जाते. या क्षेत्राच्या सीमा निश्चित नाहीत. वेगवेगळ्या लेखकांनी त्या वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. त्यामुळे बर्म्युडा ट्रायंगलचे क्षेत्रफळ कायम बदलत राहते. हीच गोष्ट त्याच्या काल्पनिक स्वरूपाकडे लक्ष वेधते.
बर्म्युडा ट्रायंगलमध्ये विमाने व जहाजे बेपत्ता होतात?
बर्म्युडा ट्रायंगलविषयी सर्वात प्रसिद्ध असलेली कथा म्हणजे त्यात जहाजे व विमाने गायब होतात. असे सांगितले जाते की, विमाने या भागावरून उडतात तेव्हा ते अचानक अदृश्य होतात. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. त्यातून कोणता संदेशही मिळत नाही. एवढेच नाही तर त्याचे कोणते अवशेषही सापडत नाहीत. काही कथांमध्ये या ट्रायंगलमध्ये विमान व जहातील सर्व चालकदल व प्रवाशीही बेपत्ता झाल्याचे सांगितले जाते. पण या घटनांचा अभ्यास केला असता अनेक दावे चुकीचे ठरतात.
याविषयी आणखी एक दावा केला जातो. त्यात असे सांगितले की, या भागात विमाने व जहाजे पोहोचल्यानंतर त्यांना दिशा दाखवणारा कंपास अचानक बिघडतो. काही प्रवाशांनी कंपास चुकीची दिशा दाखवत असल्याचा दावा केला आहे. यामुळे विमान व जहाज आपली दिशा भरकटते. प्रत्यक्षात पृथ्वीवर अनेक ठिकाणी चुंबकीय उत्तर व वास्तवातील उत्तर यात फरक अस्तित्वात आहे. ही एक नैसर्गिक घटना आहे. ती फक्त बर्म्युडा ट्रायंगलपुरती मर्यादित नाही. आधुनिक उपकरणांमुळे हा प्रश्न आता फारसा उरला नाही.
एलियन्स राहत असल्याचीही दंतकथा?
काही जण या भागात परग्रहवासीय अर्थात एलियन्सचाही वावर असल्याचा दावा करतात. एलियन्सचा संबंध ते विमान व जहाज गायब होण्याशी जोडतात. पण त्याचाही अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. हे दावे प्रामुख्याने विज्ञानकथांमधून आलेत. चित्रपट व कादंबऱ्यांनी त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. विज्ञान या दाव्यांना मान्यता देत नाही.
बर्म्युडा ट्रायंगलचा संबंध अटलांटिस या काल्पनिक नगरीशीही जोडला जातो. काहींच्या मते, ही नगरी याच भागात बुडाली. तिच्या अवशेषांमुळे या भागात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते. पण अटलांटिसचे अस्तित्वच अद्याप सिद्ध झाले नाही. त्यामुळे हा दावाही कमकुवत ठरतो.
अटलांटिस नगरी काय होती?
अटलांटिस ही एक प्राचीन व काल्पनिक नगरी होती. तिचा उल्लेख ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो यांनी इ.स.पू. 360 वर्षांपूर्वी त्यांच्या टिमेयस आणि क्रिटियास या ग्रंथांत केला आहे. प्लेटोच्या मते, अटलांटिस ही अत्यंत प्रगत, श्रीमंत आणि शक्तिशाली संस्कृती होती. ती समुद्राच्या पलीकडे वसलेली होती. तिची तांत्रिक व सामाजिक प्रगती त्या काळातील इतर संस्कृतींपेक्षा पुढारलेली होती.
प्लेटोने दिलेल्या माहितीनुसार, अटलांटिसचे लोक नैतिकदृष्ट्या भ्रष्ट झाले. त्यांचा अहंकार वाढला. देवांनी त्यांना शिक्षा दिली. त्यामुळे एकेदिवशी ती संपूर्ण नगरी भूकंप व प्रचंड समुद्री लाटांमुळे समुद्रात बुडाली. प्लेटोने ही कथा ऐतिहासिक सत्य म्हणून मांडली की, रूपक म्हणून, यावर आजही अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेटोच्या समकालीन किंवा त्याच्यानंतरच्या कोणत्याही प्राचीन ग्रंथांमध्ये अटलांटिसचा ठोस उल्लेख आढळत नाही. पुरातत्त्वीय पुरावेही अटलांटिसच्या अस्तित्वाची पुष्टी करत नाहीत. त्यामुळे आधुनिक इतिहास आणि विज्ञान अटलांटिसला एक काल्पनिक कथा मानते.
प्रत्यक्षात अटलांटिस व बर्म्युडा ट्रायंगल यांचा संबंध 20 व्या शतकात जोडला गेला. विशेषतः बर्म्युडा ट्रायंगलच्या रहस्यमय कथा लोकप्रिय झाल्यानंतर काही लेखकांनी असा दावा केला की, अटलांटिस ही नगरी याच भागात बुडाली असावी. त्यांच्या मते, अटलांटिसच्या अवशेषांमुळे आजही या भागात विचित्र ऊर्जा किंवा चुंबकीय परिणाम निर्माण होतात.
यासंबंधीच्या दाव्यांनुसार, अटलांटिसचे लोक प्रगत ऊर्जा तंत्रज्ञान वापरत होते. काहींनी तर यासंदर्भात “क्रिस्टल एनर्जी” किंवा अद्भुत शक्तींचा उल्लेख केला आहे. या कथांनुसार त्या शक्तींमुळे आजही बर्म्युडा ट्रायंगलमध्ये जहाजे आणि विमाने अडचणीत येतात.
या सर्व कथांचा प्रसार 20 व्या शतकात मोठ्या प्रमाणावर झाला. विशेषतः 1950 नंतर माध्यमांनी या विषयाला खूप प्रसिद्धी दिली. काही पुस्तकांनी या कथांना रहस्यमय रंग दिला. 1974 मध्ये प्रकाशित झालेले चार्ल्स बर्लिट्झ यांचे "The Bermuda Triangle" हे पुस्तक फार लोकप्रिय झाले. पण त्यातील अनेक घटना नंतर चुकीच्या ठरल्या.
अतिशय वर्दळीचा सागरी मार्ग
विज्ञान बर्म्युडा ट्रायंगलकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. हा भाग अतिशय वर्दळीचा समुद्री मार्ग आहे. येथून दरवर्षी हजारो जहाजे व विमाने जातात. पण या क्षेत्रातील हवामान झपाट्याने बदलते. जोरदार वारे वाहतात. उंच लाटा उसळतात. चक्रीवादळे निर्माण होतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. याच क्षेत्रातून गल्फ स्ट्रीम नावाचा शक्तिशाली समुद्री प्रवाहही वाहतो. हा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. अपघात झाल्यास अवशेष लवकर दूर वाहून जातात. त्यामुळे शोधमोहीम राबवताना अडचण येते. अवशेष न सापडल्यामुळे रहस्य निर्माण होते. प्रत्यक्षात मात्र हे नैसर्गिक कारण आहे.
या प्रकरणी मानवी चुकाही महत्त्वाचे कारण ठरतात. जुन्या काळात नकाशे अचूक नव्हते. साधने मर्यादित होती. अनुभवाचा अभाव होता. त्यामुळे या भागात झालेल्या अपघातांना थकवा व चुकीचे निर्णयही कारणीभूत ठरले. पण काही प्रकरणांत या चुकांनी रहस्यमय कथांना खतपाणी घातले.
या प्रकरणी मिथेन वायूचा एक सिद्धांत मांडण्यात आला आहे. त्यानुसार, हा वायू समुद्रतळातून बाहेर पडल्यास जहाज बुडू शकते. मात्र बर्म्युडा ट्रायंगलमध्ये याचा ठोस पुरावा सापडला नाही. त्यामुळे हा सिद्धांत सिद्ध झालेला नाही.
काय आहे मिथेन वायूचा सिद्धांत?
मिथेन वायू म्हणजे नैसर्गिक वायूचा एक प्रकार आहे. तो प्रामुख्याने समुद्रतळाशी किंवा बर्फाखाली मिथेन हायड्रेट्सच्या स्वरूपात साठलेला असतो. काही विशिष्ट परिस्थितीत म्हणजे भूकंप किंवा तापमानातील बदलामुळे हा वायू अचानक बाहेर पडतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात मिथेन पाण्यात मिसळतो, तेव्हा पाण्याची घनता कमी होते. जहाज समुद्रात तरंगत असताना तेथील पाण्याची घनता अचानक कमी झाली, तर जहाजाला पुरेसा तरंग (buoyancy) मिळत नाही. यामुळे जहाज अचानक बुडते. त्याला फार वेळ लागत नाही. चालकदलाला मदत मागण्याची संधीही मिळत नाही. त्यामुळे काही लोकांनी या सिद्धांताचा संबंध बर्म्युडा ट्रायंगलमध्ये जहाजे गायब होण्याशी जोडला.
प्रयोगशाळांमध्ये लहान स्वरुपात करण्यात आलेल्या प्रयोगांत असे दिसून आले की, पाण्यात मोठ्या प्रमाणात मिथेन वायू मिसळल्यास तरंगण्याची क्षमता कमी होते. यामुळे मिथेन वायूचा सिद्धांत लोकप्रिय आझाला. पण प्रयोगशाळेतील स्तिती व प्रत्यक्ष समुद्रातील परिस्थिती यात प्रचंड फरक आहे. याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते. बर्म्युडा ट्रायंगलमध्ये मिथेन वायूच्या स्फोटामुळे जहाजे बुडाल्याचा कोणताही पुरावा नाही. समुद्रशास्त्रज्ञांनी अटलांटिक महासागरातील या भागाचा सखोल अभ्यास केला. उपग्रह निरीक्षणे, सोनार मॅपिंग व समुद्रतळाचे नमुने यात अशा घटनांचे कोणतेही संकेत आढळले नाही.
या प्रकरणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मिथेन हायड्रेट्स जगातील अनेक सागरी क्षेत्रांत आढळतात. ते बर्म्युडा ट्रायंगलपुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे मिथेन वायूच जहाज बुडवण्याचे प्रमुख कारण असते, तर जगभरातील अनेक सागरी मार्गांवर अशाच रहस्यमय घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या असत्या. पण तसे नाही. विमानाच्या बाबतीत मिथेन वायूचा सिद्धांत आणखी कमकुवत ठरतो. मिथेन वायू समुद्रातून बाहेर पडल्यानंतर तो वातावरणात लवकर पसरतो. तो विमान उडतात तिथपर्यंत पोहोचण्याची
शक्यता नाही. त्यामुळे विमान अपघातांशीही मिथेन वायूचा संबंध जोडणे चुकीचे आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे सागरी विमा कंपन्या व नौदलाच्या नोंदींनुसार, या भागातील अपघातांचे प्रमाण असामान्य असे नाही. जगातील इतर सागरी मार्गांसारखेच इथे अपघात होतात. त्यामुळे कोणत्याही संस्थेने बर्म्युडा ट्रायंगलला धोकादायक क्षेत्र म्हणून घोषित केले नाही.
शेवटी एवढेच म्हणावे लागेल की, बर्म्युडा ट्रायंगल रहस्यमय नाही. तो एक सामान्य सागरी भाग आहे. निसर्गाच्या नियमांनुसारच येथे घटना घडतात.




.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा