भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

मोनालिसा हास्य रहस्य

मोनालिसा (Mona Lisa) हे नाव आज जगभर ओळखले जाते. पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात (Louvre Official Website) एका काचेमागे तिचे चित्र सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी दरवर्धी कोट्यवधी लोक येतात. ते पाहून आश्चर्यचकित होतात. एवढे साधे दिसणारे हे चित्र एवढे जगप्रसिद्ध का झाले? हा प्रश्न त्यांना व मलाही पडतो. या प्रश्नाचे उत्तर आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये नव्हे तर 500 वर्षांचा इतिहास तथा मानवी मानसशास्त्र व कलेच्या प्रवासात दडलेले आहे.

फोटो नव्हे हाताने रंगवलेले चित्र 

सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, मोनालिसाच्या ज्या चित्राचा आपण फोटो म्हणून उल्लेख करत आहोत, तो प्रत्यक्षात फोटो नाही. ते एक हाताने रंगवलेले चित्र आहे. हे चित्र काढण्यात आले तेव्हा कॅमेऱ्याचा शोध लागला नव्हता. हे चित्र साधारणतः 1503 ते 1506 या काळात काढले गेले. रंगवले गेले. हा काळ युरोपच्या पुनरुत्थानाचा होता. तेव्हा माणूस, निसर्ग, भावना व विज्ञान यांचा नव्याने विचार सुरू झाला होता. 



लिओनार्दो दा विंची मोनालिसाच्या चित्राचा निर्माता होता. तो केवळ चित्रकार नव्हता, तो शरीरचनाशास्त्रज्ञ, अभियंता, संशोधक व तत्त्वचिंतक होता. दा विंचीला मानवी चेहरा रंगवताना केवळ सौंदर्य दाखवायचे नव्हते, तर त्या चेहऱ्यामागील मन, भावना व विचार पकडायचे होते. त्यामुळे त्याची चित्रे पाहताना ती जिवंत असल्याचे वाटतात. 

मोनालिसा नेमकी कोण होती?

मग प्रश्न उभा येतो, मोनालिसा नेमकी कोण होती? काही इतिहासकारांच्या मते, मोनालिसा ही इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात राहणारी लिसा घेरार्दिनी नामक स्त्री होती. तिचे लग्न फ्रान्चेस्को देल जिओकोंडो या व्यापाऱ्याशी झाले होते. त्यामुळे या चित्राला ला जिओकोंडा असेही म्हटले जाते. लिसा कोणतीही राणी नव्हती. संत नव्हती. प्रसिद्ध व्यक्तीही नव्हती. ती एक सामान्य गृहिणी होती. 

असे सांगितले जाते की, लिसाच्या पतीने आपल्या पत्नीचे चित्र काढण्यासाठी दा विंचीला विनंती केली. त्या काळात व्यापारी वर्ग श्रीमंत होत होता व समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अशा चित्रांचे महत्त्व वाढले होते. पण येथे एक मोठे रहस्य आहे. लिओनार्दो दा विंचीने हे चित्र कधीच त्या कुटुंबाला दिले नाही. त्याने ते चित्र स्वतःकडेच ठेवून घेतले. त्यानंतर त्याने त्यात आयुष्यभर बदल केले. फ्लॉरेन्सपासून मिलानपर्यंत व शेवटी फ्रान्सपर्यंत हे चित्र त्याच्यासोबतच प्रवास करत राहिले. 

स्फुमातो तंत्रशैलीचा वापर 

मोनालिसाचे (Louvre - Mona Lisa Virtual Reality Experience) सर्वात मोठे आकर्षण म्हणते तिचे गूढ हास्य. ती हसते की गंभीर आहे की अंतर्मुख आहे? याविषय़ी प्रत्येक प्रेक्षकाला वेगळेच वाटते. याचे कारण दा विंचीने वापरलेली स्फुमातो (Sfumatoही तंत्रशैली. या शैलीत रंगाच्या कडा स्पष्ट नसतात. सावल्या एकमेकांत मिसळतात. त्यामुळे डोळ्यांना व मेंदूला सतत नवे अर्थ सापडत राहतात. 

मोनालिसाचे डोळे आपल्याकडेच पाहत असल्याचा भास होतो. आपण कोणत्याही दिशेने गेलो तरी तिची नजर आपल्यावरच रोखली असल्याचे आपल्याला वाटते. हा कोणताही जादूचा प्रकार नाही. मानवी मेंदूचा दृश्यभ्रम आहे. पण हा भ्रम निर्माण करण्याची कला दा विंचीला अवगत होती. त्याने ती मोनालिसाच्या फोटोत मुद्दाम वापरली. 

मोनालिसाच्या चेहऱ्यावर भुवया का नाहीत?

मोनालिसाच्या फोटोत मागे दिसणारा निसर्गही तेवढाच गूढ आहे. तिथे दिसणारे डोंगर, नद्या व रस्ते कोणत्याही प्रत्यक्ष ठिकाणाशी जुळत नाहीत. काही अभ्यासकांच्या मते, ही पार्श्वभूमी म्हणजे मानवी मनाचे प्रतीक आहे. अस्थिर, बदलणारे व अनिश्चित. समोर शांत चेहरा व मागे अस्थिर जग असा विरोधाभास या चित्रात दिसतो. (Art & Object - Brief History)

मोनालिसाच्या चेहऱ्यावर भुवया का नाहीत? हा प्रश्नही अनेकांना पडतो. काहींच्या मते, त्या काळात भुवया काढण्याची फॅशन होती. तर काहींच्या मते, कालांतराने फोटोतील रंग ओसरल्यामुळे त्या दिसेनाशा झाल्या. पण काही अभ्यासक असेही सांगतात, भुवया नसल्यामुळे चेहरा अधिक सार्वत्रिक होतो. तो कुणाचाही चेहरा वाटू शकतो. 

1911 साली मोनोलिसा हे चित्र लूव्र संग्रहालयातून चोरीला गेले. ते 2 वर्षे गायब होते. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष या फोटोकडे वेधले गेले. वर्तमानपत्रे, चर्चा व अफवांमुळे मोनालिसा एक जागतिक घटना बनली. फोटो सापडल्यानंतर त्याची प्रसिद्धी आणखी वाढली. 


आज मोनालिसाकडे केवळ लिसा घेरार्दिनीचा फोटो म्हणून पाहिलेज ात नाही. ती मानवी भावनांचा प्रयोग, स्त्रीच्या अंतर्मनाचा शोध व कलाकाराच्या असमाधानाचे प्रतीक बनली आहे. लिओनार्दो दा विंचीने हे चित्र कधीच पूर्ण मानले नाही. कदाचित म्हणूनच मोनालिसा आजही अपूर्ण वाटते. म्हणूनच ती आपल्याला सतत प्रश्न विचारण्यास भाग पाडते. 

मोनालिसा जगप्रसिद्ध आहे, कारण ती सुंदर आहे म्हणून नव्हे तर आपल्याला कोणतेही ठोस उत्तर देत नाही म्हणून... ती फक्त प्रश्न विचारते. तो प्रश्न आज 500 वर्षांनंतरही जिवंत आहे.... 




















0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा