भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

जेव्हा घरचं जेवण 300 किलोमीटर प्रवास करून समोर येतं…



रविवारची सकाळ वेगळीच असते. आळशी ऊन खिडकीतून आत येतं, पंख्याची हळुवार हवा कानात गाणं गुणगुणते, आणि अचानक बाबांचा फोन येतो, “आज संभाजीनगरला येतोय, जेवण घेऊन.”

पहिल्यांदा वाटतं, मजा करतायत. तीनशे किलोमीटर अंतर, फक्त जेवणासाठी? सकाळची रेल्वे हुकते. वाटतं मजा घेतली. पण मध्यरात्री दीड वाजता दाराची बेल वाजते आणि दरवाजा उघडताच बाबांच्या हातात ती मोठी स्टीलची डब्याची बॅग दिसते, तेव्हा कळतं की ही मजा नव्हे, ही प्रेमाची सवय आहे जी वर्षानुवर्षे चालत आली आहे.
आईने सकाळी पाच वाजल्यापासून स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते. भाऊ आणि भावजय दोघेही तिला साथ देतात. कुणी बटाट्याची भाजी चिरतं, कोणी वांग्याचे भरते भाजतं, कुणी पुरणपोळीची पोळी लाटतं, कुणी गुलाबजाम लाडू करतं. घरात सगळीकडे मसाल्याचा, तूपाचा, गूळ-खोबऱ्याचा सुगंध पसरलेला असतो. डब्यात काय-काय भरलंय याची यादी आई फोनवर सांगते, “वांग्याचं भरतं, बटाट्याची रस्सा भाजी, मटकी उसळ, चिकन कोल्हापुरी, पुरणपोळी, गुलाबजाम, आणि तुझी आवडती कोथिंबीर वडी.”मी फक्त हसतो. कारण मला माहिती आहे, हे सगळं फक्त माझ्यासाठी नाही. हे बाबांचंही प्रेम आहे. ते म्हणतात, “आम्ही घरी जेवतो तेव्हा तुमची आठवण येते. नात व सूनेची आठवण येते. म्हणून आज हे तुमच्यासमोर ठेवलं.”बाबा सांगतात, सायंकाळी सात वाजता नांदेडहून निघालो. आईने डबे घट्ट बांधले, वरून रुमालाने गुंडाळले, प्लॅस्टिकमध्ये ठेवले आणि सांगितले, “हात लावू नका, थंड होऊ नये म्हणून.” रस्त्यात दोनदा चहा प्यायलो, पण डबा उघडला नाही. कारण आईने सांगितलं होतं, “ तुझ्या मुलींसमोर उघडा.”जेव्हा ताट वाढलं जातं, तेव्हा मी पाहतो की पुरणपोळी अजूनही मऊ आहे. वांग्याचं भरतं तेलावर तरंगतंय. चिकनचा रस्सा इतका गरम आहे की भाकरी सोबत हात पोळतो. आईने प्रत्येक पदार्थावर तूप सोडलेलं आहे. मला वाटतं, हे जेवण नाही, हे घर आहे. तीनशे किलोमीटर अंतर पार करून माझ्यासमोर आलेलं माझं बालपण आहे.आई फोन करते, “कसं झालं जेवण? वडी आवडली का?”
मी हसत म्हणतो, “आई, तू स्वतः येऊन जेवायला बसलीस असतीस तरच मजा आली असती.”
ती हसते, “अरे, मी तर तुझ्यासोबतच आहे. प्रत्येक चमच्यात मी आहे.”
भावजयने बनवलेली बिर्याणी एवढी चविष्ट आहे की, सांगायलाच नको. भावाने बनवलेली कोथिंबीर वडी इतकी कुरकुरीत की आवाज येतो. बाबांनी सांगितलं, “तुझ्या भावाने स्वतः हात लावले आहेत. म्हणाला होता, ‘माझ्या दादाला आवडते ना ही वडी?’”जेवण संपल्यावर बाबा डोळे मिटून बसतात. म्हणतात, “आता समाधान झालं.”
मी विचार करतो, खरंच समाधान कशात आहे? जेवणात की प्रेमात? की त्या तीनशे किलोमीटराच्या प्रवासात?
संध्याकाळी परत जायची वेळ होते. बाबा डबा परत घेऊन जातात. आईने पुन्हा काहीतरी भरलेलं असतं, उद्याच्या नाश्त्यासाठी. मी विचार करतो, हे असंच चालू राहिलं पाहिजे. मी कुठेही असलो, कितीही मोठा झालो, रविवारी आईबाबांचा फोन यायलाच हवा, “आज संभाजीनगरला येतोय, जेवण घेऊन.”कारण काही गोष्टी पैशाने मिळत नाहीत.
काही गोष्टी फक्त आईच्या हातच्या जेवणात, बाबांच्या तीनशे किलोमीटराच्या प्रवासात आणि भाव-भावजयच्या प्रेमात मिळतात.
रविवार संपतो. पण त्याची ऊब, त्याचा सुगंध, ती भावना मनात कायमची राहते.
आणि पुन्हा पुढच्या रविवारी फोनची वाट बघतो,
“आज संभाजीनगरला येतोय…”
0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा