भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

ओशो रजनीश; ईश्वरापूर्वी स्वतःला शोधण्याचा सल्ला देणारा माणूस




'जगातील कोणतेही पाप थेट फसवणूक करण्यास सक्षम नाही. पापालाही पुण्याचे कपडे घालावे लागतात. हिंसेलाही अहिंसेचे कपडे घालावे लागतात. त्यामुळे जीवन हे एक रहस्य आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न न करता त्याचा अनुभव घेत पुढे जात राहावे,' असे सांगणारे ओश रजनीश हे आध्यात्मिक जगतातील एक क्रांतिकारी तारा होते. त्यांच्या या शब्दांतच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सार दडलेला आहे. ओशोंनी मानवजातीला आहे त्या जीवनाचा स्वीकार करून सामाजिक बंधनापासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात.

आज पाहूया भारताच्या याच बंडखोर संन्याशाच्या जीवनाचा अन् विचारांचा प्रवास...


ओशो रजनीश यांचा जन्म 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा गावात झाला. त्यांचे खरे नाव चंद्रमोहन जैन असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव बाबूराव जैन, तर आईचे नाव सरस्वती जैन असे होते. या कुटुंबाचा कपड्याचा व्यापार होता. जैन धर्माच्या पारंपरिक वातावरणात वाढलेल्या ओशोंना बालपणापासूनच स्वातंत्र्याची ओढ होती. वयाच्या 7 व्या वर्षापर्यंत ते आपल्या आजोळी आजी-आजोबांकडे राहिले. तिथे त्यांना पारंपरिक शिक्षणाची सक्ती न करता अध्यात्म व स्वाभाविक जीवन जगण्याची शिकवण मिळाली. हा काळ ओशोंच्या व्यक्तिमतावर खूप प्रभाव टाकणारा ठरला. त्यातून त्यांना बंधनमुक्त विचारांचा पाया मिळाला.


ओशोंना 2 भाऊ व 2 बहिणी होत्या. त्यांचा मोठा भाऊ अरविंद (स्वामी अरविंद) व धाकटा भाऊ शैलेंद्र (स्वामी सरस्वती) यांनी नंतर ओशोंच्या आश्रमात संन्यास घेतला. सुरुवातीला त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या वेगळ्या विचारांना विरोध केला. पण अखेर 1978 मध्ये त्यांचे आई-वडिल त्यांच्या पुण्यातील आश्रमात दाखल झाले. ते तिथे शेवटपर्यंत राहिले.

स्वतःच्याच मृत्यूची 7 दिवस पाहिली वाट

ओशो रजनीश अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे होते. त्यांना एखादी गोष्ट केवळ माहिती करून घेणेच आवडत नसे, तर त्या घटनेमागील संपूर्ण सत्य जाणून घेण्यास ते नेहमी उत्सुक असायचे. ते 12 वर्षांचे होते. तेव्हा त्यांना मृत्यूचे कुतूहल वाटले. मत्यूनंतर काय होते? हे जाणून घेण्यासाठी ते सतत स्मशानभूमीत जायचे. तिथे गेल्यावर ते आत्म्यांना 'तुम्ही कुठे गेला आहात?' अशी विचारणा करायचे. त्यांनी अनेक वर्षे हा प्रकार केला. त्यामुळे त्यांचे आई-वडील काळजीत पडले. त्यांनी एका ज्योतिषाला ओशोंचे भविष्य विचारले. तेव्हा भविष्यवेत्याने त्यांना 14 वे ववर्ष लागताच 7 दिवसांच्या आत त्यांचा मृत्यू होईल असे भाकित वर्तवले.

यामुळे ओशोंचे आई-वडील हादरले. पण ओशो स्थिर होते. शांत होते. 14 वे वर्ष लागताच ते एका मंदिरात गेले. तिथे 7 दिवस बसून त्यांनी आपल्या मृत्यूची वाट पाहिली. मृत्यूनंतर काय होते? हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना लागली होती. पण त्यांना मृत्यू आला नाही. या 7 दिवसांत एक साप मंदिरात आला. पण या सापानेही त्यांना काहीच केले नाही.

लहानपणापासूनच प्रश्न विचारण्याचा गुण

वसंत जोशी यांनी ओशोंचे 'ल्युमिनस रिबेल लाइफ स्टोरी ऑफ अ मॅव्हरिक मिस्टिक' नामक आत्मचरित्र लिहिले. त्यात ते म्हणतात, ओशो एका सर्वसामान्य मुलासारखे वाढले. पण त्यांच्यात काहीतरी वेगळे करण्याची जिज्ञासा होती. त्यामुळे ते इतर मुलांपेक्षा वेगळे ठरले. लहानपणापासूनच त्यांच्यात प्रश्न विचारण्याचा व प्रयोग करण्याचा गुण होता. त्यांना लोकांत रस होता. मानवी स्वभावावर बारीक नजर ठेवणे हा त्यांचा मुख्य छंद होता. यामुळेच त्यांची बाह्य जग व मानवी मेंदूवर करडी नजर राहत होती.

प्राध्यापकांशी वाद अन् कॉलेज सोडण्याची वेळ

ओशो 1951 साली बीए पास झाले. त्यानंतर त्यांनी जबलपूरच्या हितकारिणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे तत्वज्ञानाच्या प्राध्यापकासोबत त्यांचा वाद झाला. ते लेक्चर सुरू असताना त्यांना असे काही प्रश्न विचारत की, उत्तरे देताना प्राध्यापकांच्या नाकीनऊ येत असत. यामुळे त्यांना वेळेत आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हता.

वसंत जोशी हा किस्सा सांगताना लिहितात, अखेरीस गोष्टी प्राध्यापकांच्या सहनशक्ती पलीकडे गेल्या. त्यांनी प्राचार्यांकडे ओशोंची तक्रार केली. या महाविद्यालयात एक तर मी राहीन किंवा चंद्रमोहन जैन असा सूर त्यांनी आळवला. त्यानंतर प्राचार्यांनी चंद्रमोहन यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यांनी या प्रकरणात ओशोंची काहीही चूक नसल्याचे मान्य केले. पण त्यांच्यामुळे कॉलेजच्या सीनिअर प्राध्यापकांवर राजीनामा देण्याची वेळ येऊ नये अशी इच्छाही व्यक्त केली. अखेर ओशोंनी इतर एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या अटीवर आपले महाविद्यालय सोडले.

यावेळी रजनीश एवढे कुप्रसिद्ध झाले होते की, सुरुवातीला सर्वच महाविद्यालयांनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. नतंर मोठ्या कष्टाने त्यांना डीएन जैन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तरुणपणी रजनीश यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. एकदा डोकेदुखी फार वाढली. त्यामुळे त्यांच्या क्रांती व अरविंद नामक चुलतभावांना त्यांच्या वडिलांना फोन करून त्याची माहिती द्यावी लागली. वडिलांच्या मते, जास्त अभ्यास केल्यामुळे रजनीश यांचे डोके दुखत होते. कपाळाला मलम लावल्यानंतर रजनीश कसा अभ्यास करत असे हे त्यांना माहिती होते.

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी

रजनीश यांनी 1957 साली रायपूरच्या संस्कृत विद्यापीठात व्याख्याते म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1960 साली ते जबलपूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. त्यावेळी ते एक लोकप्रिय प्राध्यापक ठरले. याच काळात त्यांनी आध्यात्मिक गुरू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी देशभर दौरे केले. राजकारण, धर्म व लैंगिकतेवर वादग्रस्त व्याख्याने दिली. कालांतराने त्यांनी आपल्या प्राध्यापकीचा राजीनामा दिला. ते पूर्णवेळ गुरू बनले. 1969 मध्ये त्यांनी मुंबईत आपले मुख्यालय स्थापन केले. एक वर्षापूर्वी भेट आझालेल्या माँ योग लक्ष्मी त्यांच्या प्रमुख सहाय्यक बनल्या. 1981 पर्यंत त्या या पदावर राहिल्या.

याच काळात ओशोंची भेट क्रिस्टीना वुल्फ नामक एका ब्रिटीश महिलेशी झाली. रजनीश यांनी तिला माँ योगा विवेक असे नाव दिले. ते त्यांना आपल्या मागील जन्मातील दोस्त मानत होते. ही महिला त्यांची वैयक्तिक सहाय्यक बनली.

आश्रमात नारंगी किंवा लाल कपडे घालण्याचे होते आदेश

मां आनंद शीला यांनी अनेक वर्षे ओशोंच्या सचिव म्हणून काम केले. त्या बालपणीच त्यांच्या संपर्कात आल्या होत्या. ओशो आपल्या प्रत्येक महिला अनुयालाला माँ म्हणत. कारण, ते प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचे प्रतीक मानत असत. ते आपल्या पुरुष अनुयायांना स्वामी म्हणून संबोधत. याद्वारे ते त्यांना सदैव नियंत्रणात राहण्याची आठवण करून देत. शीला आपल्या 'डोंट किल हिम, द स्टोरी ऑफ माय लाईफ विथ भगवान रजनीश'मध्ये सांगतात, मी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा भगवान माझ्याकडे पाहून हसले. त्यांनी आपले हात पुढे केले. मला मिठी मारली. हळूवारपणे माझा हात धरला. मी माझे डोके त्यांच्या कुशीत ठेवले. थोड्या वेळाने मी शांतपणे तेथून निघाले, तेव्हा त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, शीला, तू उद्या दुपारी 2.30 वा. भेटण्यासाठी ये, असे म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.

ओशो आपल्या प्रत्येक शिष्याला लाकडाची जपमाळ देत होते. त्यात एक लॉकेट होते. त्याच्या दोन्ही बाजूंना ओशोचा फोटो होता. आपल्या सर्वच अनुयायांनी हे लॉकेट घालावे असे त्यांना वाटत होते. ते आपल्या शिष्यांना भूतकाळापासून दूर नेण्यासाठी एक नवे नावही देत असत. त्यांनी आपल्या शिष्यांना नारंगी किंवा लाल कपडे घालण्याचे आदेश दिले होते. शरीरातील ऊर्जा मुक्तपणे वाहील यासाठी हे कपडे सैल असावेत अशी त्यांची ताकीद होती.

अमेरिकन लेखक टॉम रॉबिन्स यांचे असे मत होते की, ओशोंची पुस्तके वाचून असे वाटते की, ते 20 व्या शतकातील सर्वात महान आध्यात्मिक गुरू होते.

विनोद खन्ना स्टारडम सोडून ओशींच्या चरणी

ओशोंच्या अनुयायांमध्ये देशविदेशातील लोक होते. यात अनेक लहानथोरांचा समावेश होता. अभिनेते विनोद खन्नाही ओशोंचे निस्सिम चाहते होते. ते त्यांच्या प्रेमात पुरते वेडे झाले होते. 1970-80 च्या दशकात विनोद खन्ना चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर होते. पण एकदिवस त्यांनी अचानक संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपत्ती, घरदार या सर्वांचा त्याग करून भगवी वस्त्रे परिधान केली. त्यांनी तेव्हा अमेरिकेत असलेल्या ओशोंचे शिष्यत्व पत्करले.

ते आश्रमातील बागेची देखभाल करायचे. बराच काळ ते ओशोंसोबत होते. एवढे की, त्यांच्या बातम्या माध्यमांत येणेही बंद झाले होते. बॉलिवडूही त्यांना विसरत चालले होते. 1985 साली त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. त्यामुळे ते आता पुन्हा अभियन क्षेत्रात परतणार नाहीत, असे वाटत असतानाच त्यांनी पुनरागमन केले. त्यांनी अनेक हिट चित्रपट केले. एवढेच नाही तर त्यांनी राजकारणातही आपले नशिब आजमावले.

सुप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग एकेठिकाणी ओशोंची प्रशंसा करताना म्हणाले होते, ओशो हे भारतात जन्मलेल्या सर्वात मौल्यवान विचारवंतांपैकी एक होते. ते सर्वात विचारशील, वैज्ञानिक व नाविन्यपूर्ण व्यक्तींपैकी एक होते.

अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये स्थापन केला आश्रम

ओशो रजनीश 1980 च्या दशकात अमेरिकेला गेले. तेथील ओरेगॉन प्रांतात त्यांनी 94 हजार एकर पडीत जमीन खरेदी केली. त्यावर रजनशीपूरम नामक आश्रम स्थापन केला. हा आश्रम म्हणजे एक शहरच होते. ओशोंनी देशविदेशातील आपल्या अनुयायांना याठिकाणी येऊन राहण्याचे निमंत्रण दिले. रजनीशपुरमचे स्वतःचे खासगी विमानतळ होते. महागड्या रोल रॉयस गाड्यांचा ताफा होता. अमेरिकेत ओशोंची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यांचा अनुयायी वर्ग प्रामुख्याने तरुण वर्ग होता. हे तरुण ओशोंना समर्पित होते. त्यामुळे अमेरिकन सरकारही घाबरले होते. त्यांनी ओशोंच्या आश्रमावर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार, संन्यासींना व्हिसा नाकारण्यात येऊ लागला. ओशोंनाही अटक झाली. 12 दिवस त्यांना अज्ञातवासात ठेवण्यात आले.

त्यानंतर 14 नोव्हेंबर 1985 रोजी ओशींनी अमेरिकेतून काढता पाय घेतला. त्यांनी जगातील 21 देशांमध्ये जाऊन राहण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर ते मायदेशी म्हणजे भारतात परतले. 1987 साली त्यांनी पुण्यातील आश्रमात येऊन वास्तव्य केले. याच ठिकाणी त्यांनी प्रवचने देण्यास सुरुवात केली.

ओशोंनी सांगितलेला आनंदी राहण्याचा मार्ग

ओशो सांगतात, तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केले तर कायम नेहमीच दुःखी राहाल. त्यामुळे आनंदावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा. कारण, आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, त्या गोष्टी सक्रिय होतात. त्यामुळे ध्यान ही गुरुकिल्ली आहे. आनंदाची ही गुरुकिल्ली वापरणे अत्यंत आवश्यक आहे.

ओशो म्हणतात, तुम्ही आनंदी राहायचे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. हा तुमचा निर्णय आहे. प्रत्यक्षात हा अगदी सोपा पर्याय आहे. खरे तर तुमच्याशिवाय दुसरा कुणीही आनंदी राहण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. याचे कारण, म्हणजे आनंद मानवाचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याविषयी चिंता करण्याची काहीच गरज नाही. तो पूर्वीपासूनच तुमच्या मनात दडला आहे. तुम्हाला केवळ स्वतःला दुःखी होण्यापासून रोखायचे आहे. ज्यामुळे दुःख होते, तीच गोष्ट तुम्हाला टाळायची आहे.

अनेकदा परिस्थितीनुसार तुम्हाला आज्ञाधारक किंवा बंडखोर व्हावे लागते. पण तुम्हाला खरोखरच आनंदी व्हायचे असेल तर सर्वप्रथम एक व्यक्ती बना. तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही स्वतःच त्याची निवड करा.

ओशो आपल्या स्पष्ट विचासरणीमुळे नेहमीच वादात राहिले. 1979 साली ओशो यांचे संभोग से समाधी की ओर हे पुस्तक आले. या पुस्तकामुळे मोठा वाद निर्माण झाला. अनेक धर्म मार्तंडांमध्ये या पुस्तकामुळे खळबळ माजली. हे पुस्तक व त्यातील विचार यामुळे ओशोंना बहिष्कृत करण्यात आले. तरीही ओशोंचे तत्वज्ञान जगाने स्वीकारले. ओशो यांच्या पुण्यातील कोरेगाव परिसरात असलेला प्रशस्त आश्रम व तिथे असलेले ओशो इंटरनॅश्नल यातील खुलेपण तथा परदेशी अनुयायांची तिथे होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

धर्मगुरू म्हणजे केवळ मृत्यूचे व्यापारी

ओशो एकेठिकाणी आपल्या प्रवचनात सांगतात, मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. तिथे एक नवीन मंदिर बांधण्यात आले होते. त्यात मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जात होती. शेकडो पुजारी व संन्याशी गोळा झाला होते. हजारो भाविक होते. पैशांची मुक्तहस्ते उधळण सुरू होती. सगळे गाव या घटनेमुळे चकीत झाले होते. कारण, ज्या व्यक्तीने ते मंदिर बांधले व या समारंभावर एवढा अमाप पैसा खर्च केला होता तो एक महाकंजुष माणूस होता. त्यामुळे त्याची ही उधळपट्टी पाहून गावकरी थक्क झाले होते. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

एका वृद्धाने मला याविषयी विचारले, यामागील रहस्य काय आहे? हा व्यक्ती पूर्णपणे बदलला आहे काय?

मी उत्तर देताना एक घटना सांगितली.

एका लहान मुलाने एक रुपयाचे नाणे गिळले होते. ते काढण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्याची आई आपल्या नवऱ्याला सांगत होती, जा, लवकर डॉक्टरांना बोलवा. तिच्या नवऱ्याने एक-दोनदा ऐकले आणि पुन्हा नाणे काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तो म्हणाला, डॉक्टर? नाही. मला वाटते की, एखाद्या धर्मगुरूला बोलावले तर खूप चांगले होईल.

पत्नी थक्क झाली. म्हणाली, धर्मगुरू? माझे मूल वाचणार नाही म्हणून तुम्ही धर्मगुरूला बोलावणार आहात का?

नवरा म्हणाला, नाही. त्यासाठी नाही. पण धर्मगुरूपेक्षा कुणीही पैसे काढण्यात पटाईत नसते म्हणून.

नंतर मी म्हणालो, त्या व्यक्तीचा लोभ संपला असा विचार करू नका. त्याने मलाही विचारले की, मंदिर बांधल्यानंतर परलोकात कोणते फळ मिळते? हे सर्व दान - धर्मही त्याच्या लोभाचीच परिणती आहे. हा एखाद्याच्या पूर्वस्थितीचा विरोधाभास नाही, तर त्याचा विस्तार आहे. जेव्हा जीवन हातात असते, तेव्हा लोभ संपत्ती जमा करतो. आणि जेव्हा मृत्यू समिप असतो तेव्हा लोभ धर्म जवळ करतो. हे सर्व एकाच मनाचा खेळ आहे. धर्मगुरू लोभाला एक नवी दिशा देतात. ते धर्माच्या नाण्याचे आमिष उभे करतात.

आणि मरणारा माणूस काय करेल? आपला लोभ पूर्ण करण्याचा दुसरा कोणताही मार्ग न शोधता तो अदृश्य नाणी गोळा करायला लागतो. अर्थात, यासाठी धर्मगुरूंना दृश्यमान नाणी द्यावी लागतात. असे धर्मगुरू संपत्ती गोळा करतात आणि तथाकथित धार्मिक झालेला व्यक्ती धर्म गोळा करतो. कुणीही मृत्यू पाहून परत आला नसल्यामुळे हरवलेल्या दृश्यमान नाण्यांच्या बदल्यात अदृश्य नाणी सापडतील की नाही हे कुणालाच माहिती नाही.

आणि यामुळेच, धर्मगुरूंचा व्यवसाय अखंड सुरू राहतो. मृत्यू हा धर्मगुरूंचा एक मोठा मित्र असतो. तो त्यांच्या व्यवसायाचा पाया असतो. त्यांच्या सावलीत त्यांचे शोषण सुरूच राहते.

तो माणूस अजिबात बदलला नाही. फक्त त्याच्या हातून जीवन सुटले आहे. तो म्हातारा झाला आहे. त्याला आता मृत्यूची पाऊले त्याच्या दिशेने पडत असल्याची चाहूल लागली आहे. आणि हे सर्वश्रूत आहे की, जिथे मृत्यू आहे, तिथे धर्मगुरू आहेत. ते फक्त मृत्यूचे व्यापारी आहेत.

समाजात एवढा हिंसाचार का आहे?

ओशो आणखी एका ठिकाणी एक कथा सांगतात. ते म्हणतात, मला एका मित्राने विचारले, समाजात एवढा हिंसाचार का आहे?

हिंसेचे मूळ महत्त्वाकांक्षेत आहे. वस्तुतः महत्त्वाकांक्षा हीच हिंसा आहे. मानवी मन दोन प्रकारचे असू शकते. महत्त्वाकांक्षी व अमहत्त्वाकांक्षी. महत्त्वाकांक्षी मन राजकारणाला, तर अमहात्त्वाकांक्षी मन धर्माला जन्म देते. धार्मिक व राजकीय हे मनाचेच दोन रूप आहेत. किंवा आपण निरोगी व अस्वस्थ असे म्हणूया.

निरोगी मनात न्यूनगंड नसतो. जिथे न्यूनगंड नसतो, तिथे महत्वाकांक्षाही नसते. कारण महत्वाकांक्षा ही न्यूनगंडाची भावना पुसून टाकण्याच्या प्रयत्नाहून दुसरे काहीही नाही. पण न्यूनगंड अशा प्रकारे नाहीसा होत नाही आणि म्हणूनच, महत्वाकांक्षा कधीही संपत नाही. न्यूनगंड म्हणजे स्वतःची जाणीव नसणे. ती स्वतःला न ओळखल्याने उद्भवते.

स्वतःचे अज्ञान हा न्यूनगंड आहे. कारण, जो स्वतःला जाणतो तो सर्व प्रकारचा हिनपणा व महानतेपासून मुक्त होतो. अशी स्थितीच निरोगी स्थिती आहे. निरोगी म्हणजे आत्मस्थिर असणे आणि जो स्वतःमध्ये नाही तो अस्वस्थ असतो. जो स्वतःत नाही ते सतत स्वतःची इतरांशी तुलना करत असतो. इतरांशी तुलना केल्याने हीनभाव व नंतर महत्त्वाकांक्षा उत्पन्न होते. आणि महत्त्वाकांक्षा संघर्ष व हिंसेला जन्म देते. राजकारण हे त्याचे मूर्त स्वरूप आहे. म्हणूनच राजकारणाचा परिणाम विनाशात होतो.

निरोगी मनातून निर्मिती होते, तर अस्वस्थ मनातून विनाश. मानवतेची शोकांतिका अशी आहे की, आतापर्यंत तो राजकीय मनाच्या मर्यादेतच राहिला आहे. आपण धार्मिक मन तयारच करू शकलो नाही. धर्माच्या नावाखाली अनेक संघटना व पंथ आहेत. ते सर्व राजकीय आहेत. म्हणूनच इतका द्वेष, हिंसाचार आणि युद्ध आहे. यामुळेच जीवन इतके अस्वस्थ, अराजक आणि विक्षिप्त आहे.

डॉक्टर, इंजिनिअर अन् राजकारणी

एका छोट्याशा बोटीत 2 जण वादविवाद करत होते. त्यांच्या चर्चेचा विषय होता की, पृथ्वीवर सर्वात पहिल्यांदा त्यांच्यातीतल कुणाच्या व्यवसायाची सुरुवात झाली? त्यातील एक डॉक्टर होता. दुसरा इंजिनिअर व तिसरा राजकारणी. डॉक्टर म्हणाला, बायबल सांगते की, ईव्हची निर्मिती आदमची एक फासळी काढून करण्यात आली होती. यावरून वैद्यकीय व्यवसाय सर्वात जुना असल्याचे सिद्ध होत नाही काय?

त्यावर इंजिनिअर हसला अन् म्हणाला, साहेब असे नाही. त्यापूर्वी सर्वत्र अराजकता होती. त्या अराजकतेतच पृथ्वीची निर्मिती केवळ 6 दिवसांत झाली होती. हा चमत्कार केवळ अभियांत्रिकीचाच होता. आत्ता माझाच व्यवसाय सर्वात प्राचिन आहे यासाठी आणखी काही पुराव्यांची गरज आहे काय?

राजकारणी अजूनही शांत होता. तो हसला व म्हणाला, पण मित्र ही अराजकता कुणी निर्माण केली होती हे तर सांग?

ती अराजकता आजही आहे. आणि ते तयार करणारे मनही आहे. कदाचित ते मन आपल्या शिखरावर पोहोचलेही असेल. हे मन युद्धावर युद्ध करत आले आहे. असे म्हटले जाते की, मागील 3 हजार वर्षांत पृथ्वीवर त्याने जवळपास 15 हजार युद्ध लढलेत. आता ते अंतिम युद्धाची तयारी करत आहे. शेवटचे यासाठी नाही की, त्यानंतर माणूस लढणार नाही. ते यासाठी की त्यानंतर माणूसच अस्तित्वात राहण्याची शक्यता नाही.

पण मी विचारतो की, मानवतेला युद्धांपासून वाचवता येणार नाही का? जागतिक आत्महत्या अपरिहार्य आहे का?

नाही, मानवतेला नक्कीच वाचवता येईल. पण प्रश्न युद्धांचा नाही, तर राजकीय मनापासून मुक्त होण्याचा आहे. राजकीय मनापासून मुक्त झाल्याशिवाय मानवतेला या अस्वस्थ अवस्थेतून मुक्तता मिळू शकत नाही.

ओशोंच्या मृत्यूचे गूढ आजही कायम

अमेरिकेच्या तुरुंगात राहिल्यानंतर ओशोंची प्रकृती बिघडली. त्यांचे शरीर कमजोर झाले. त्यावेळी त्यांना थेलियम नावाचे स्लो पॉयझन देण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. 1989 मध्ये ओशो अचानक मौनात गेले. अशक्तपणामुळे त्यांनी प्रवचन देणे बंद केले होते. ते केवळ रात्री काहीवेळ आपल्या सहकाऱ्यांसोबत ध्यानात बसायचे. या रात्रीच्या सत्संगाला त्यांनी ओशो व्हाईट रॉब ब्रदरहूड असे नाव दिले होते.

त्यांनी 16 जानेवारी 1990 पर्यंत रात्रीच्या सत्संगात सहभाग घेतला. 17 जानेवारी रोजी ते नेहमीप्रमाणे सत्संगात आले. पण क्षणभरही थांबले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर स्वामी प्रेम अमृतो यांनी शरीरात प्रचंड वेदना होत असल्यामुळे ओशो आपल्यात येऊ शकणार नाहीत, पण ते 7 वा. आपल्यासोबत धान्याला बसतील अशी माहिती दिली. पण ते आले नाही. अखेर 19 जानेवारी 1990 रोजी पुण्यातील आश्रमातच त्यांचे निधन झाले.

ओशोंनी आपल्या मृत्यूनंतर कुणीही शोक करायचा नाही, आपला मृत्यू एक महोत्सव म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांचे पार्थिव बुद्ध ऑडिटोरियममध्ये 10 मिनिटांसाठी ठेवण्यात आले. तिथे त्यांच्या 10 हजार अनुयायांनी संगिताच्या तालावर नृत्य करत, काहींनी ध्यानसाधना करत, तर काहींनी मौन राहून ओशोंना अखेरचा निरोप दिला.

ओशोंच्या समाधीवर लिहिले आहे की, 'ना कधी जन्म घेतला, ना कधी मृत्यू झाला, फक्त 11 डिसेंबर 1931 ते 19 जानेवारी 1990 या कालावधीत पृथ्वी ग्रहावर प्रवास केला'. आपल्या आयुष्यात अनेक वादांमध्ये वेढलेल्या ओशांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्यात आले. पण अमेरिकेतील तुरुंगात विष दिल्यामुळे 'शरीरार राहणे म्हणजे नरक' झाले असल्याचे त्यांच्या आश्रमातून सांगण्यात आले. ओशोंचे अवशेष पुण्यातील ओशो आश्रमातील लाओ त्झू हाऊसमध्ये ठेवण्यात आले. तिथे एक समाधी बांधण्यात आली. पण अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू न शकल्यामुळे ओशोंचा मृत्यू हे गुढच राहिले आहे.

मृत्यूच्या दिवशी नेमके काय घडले?

ओशोच्या मृत्यूवर हू किल्ड ओशो नामक पुस्तक लिहिणारे अभय वैद्य बीबीसीशी बोलताना सांगतात, 19 जानेवारी 1990 रोजी ओशो आश्रमातून डॉक्टर गोकुळ गोकाणी यांना फोन आला. त्यांना ताबडतोब त्यांचे लेटरहेड व आपत्कालीन किट घेऊन येण्यास सांगितले. डॉक्टर गोकाणी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले, मी तिथे 2 च्या सुमारास पोहोचलो. त्यांच्या शिष्यांनी सांगितले की, ओशो आपला देह त्यागत आहेत. तुम्ही त्यांना वाचवा. पण मला त्यांच्याजवळ जाऊ दिले नाही. अनेक तास आश्रमात शतपावली केल्यानंतर मला त्यांच्या मृत्युची माहिती देण्यात आली. त्यानंतर मला त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यास सांगण्यात आले.

डॉक्टर गोकुळ ओशो यांच्या मृत्यूच्या वेळेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते म्हणतात, ओशोंच्या शिष्यांनी त्यांच्यावर त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यासाठी दबाव टाकला. ओशोच्या आश्रमात त्यांच्या एखाद्या अनुयायाचा मृत्यू झाला, तर तो एखाद्या उत्सवासारखा साजरा करण्याची परंपरा होती. पण जेव्हा स्वतः ओशो यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या घोषणेनंतर अवघ्या तासाभरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निर्वाणाचा उत्सवही फार संक्षिप्त ठेवण्यात आला.

ओशो यांची माताही त्यांच्यासोबत त्याच आश्रमात राहत होती. ओशो यांच्या सचिव म्हणून काम करणाऱ्या नीलम यांनी नंतर एका मुलाखतीत त्यांच्या मृत्यूच्या रहस्यांवर प्रकाश टाकताना सांगितले होते की, ओशो यांच्या निधनाची माहिती त्यांच्या आईलाही फार उशिराने देण्यात आली. नीलमने या मुलाखतीत दावा केला होता की, ओशो यांची आई प्रदिर्घ काळापर्यंत माझ्या मुलाला त्यांनी मारल्याचे सांगत होत्या.

शेवटी पाहूया प्रेम म्हणजे काय?

ओशो रजनीश यांच्या मते, प्रेम ही एक नैसर्गिक, मुक्त आणि अहंकाररहित अवस्था आहे, जी स्वतःला आणि इतरांना पूर्णपणे स्वीकारण्यातून निर्माण होते. प्रेम हे देण्याचा आनंद आहे. त्यात अहंकार नसतो. अपेक्षाही नसतात. ते फळांनी लगडलेल्या झाडासारखे स्वतः झुकते. इतरांना सावली देते. स्वतःच्या आनंदासाठी नव्हे, तर दुसऱ्याच्या सुखासाठी. थोडक्यात प्रेम हे नेहमीच झुकते, तर अहंकार झुकण्याचे नाव घेत नाही. प्रेम जेव्हा काही देऊ शकते तेव्हा ते आनंदी असते. प्रेम हे शारीरिक मर्यादांपलीकडे जाणारी, आत्म्याची नाळ जोडणारी एक शक्ती आहे. ती सामाजिक बंधने किंवा महत्त्वाकांक्षा यापासून मुक्त असते.

प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. ते बंधन घालत नाही. मुक्त करते. प्रेम म्हणजे सावली. ते संरक्षण करते. आधार देते. कोणत्याही अपेक्षेशिवाय. प्रेमाची फुले ज्याच्यावर बरसतात, तो सम्राट बनतो. प्रेमात माणूस स्वतःच्या अहंकारापासून मुक्त होऊन खऱ्या अर्थाने समृद्ध होतो, असे ओशो म्हणतात.


0+ WhatsApp Great

२ टिप्पण्या: