२०२५ च्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाने अवघे जग थरारले. काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कारवाई केली. यामुळे या दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांत अणुयुद्धाची भीती निर्माण झाली. या निमित्ताने माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. पाकने मुंबईसारख्या महानगरावर अणुबॉम्ब टाकला तर?
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. तिथे २ कोटींहून अधिक लोक राहतात. अशा महानगरात अणुबॉम्ब टाकला तर काय होईल? या लेखाद्वारे आपण या काल्पनिक परंतु वास्तविक धोक्याची चर्चा करूया...
भारत-पाक तणावाची पार्श्वभूमी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व १९४७ पासून चालू आहे, पण १९९८ च्या अणु चाचणीनंतर ते अधिक घातक झाले. दोन्ही देशांकडे सध्या १७०-१८० हून अधिक अणुबॉम्ब आहेत. २०२५ पर्यंत हा आकडा २५० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मे २०२५ च्या संघर्षात, पाकने भारताच्या ब्रह्मोस साठ्यावर हल्ला केल्याचा दावा केला. त्यानंतर भारताने रावळपिंडी लगतच्या न्यूक्लिअर साइट्सवर ड्रोन हल्ले केले. दोन्ही देशांतील हे "पहिले ड्रोन युद्ध" होते.
अमेरिकन इंटेलिजन्सनुसार, काश्मीरसारखे फ्लॅशपॉइंट्स युद्धाला न्यूक्लिअर पातळीपर्यंत नेऊ शकतात.
पाकिस्तानचे "फर्स्ट यूज" धोरण आणि भारताची "नो फर्स्ट यूज" पॉलिसी असूनही, चूक किंवा अतिआक्रमकतेमुळे एस्कलेशन होऊ शकते. २०२२ मध्ये भारताने पाकमध्ये चुकून मिसाइल डागले होते. त्यामुळेही मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यातून युद्धाची एखादी ठिणगी पडली तर मुंबईसारखे महानगर पाकसाठी सहजसोपे लक्ष्य ठरू शकते. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मुंबईत असल्याने, ते न्यूक्लिअर स्ट्रॅटेजीमध्ये पहिल्या क्रमांकाचे लक्ष्य ठरू शकते. त्यामुळे भारत-पाकमधील तणाव केवळ सीमेपुरता मर्यादित नाही; तो जागतिक अस्थिरतेला आमंत्रण देऊ शकतो.
मुंबईवर अणुबॉम्ब पडला तर...
मुंबईवर अणुबॉम्ब फुटला आणि तो हिरोशिमा-सारखा (१५ किलोटन) असल्यास, मुंबईचे हृदयस्थान म्हणजे दादर, बांद्रा किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) – पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. NUKEMAP सिम्युलेशननुसार, १५ किलोटन बॉम्बचा ब्लास्ट रेडियस १.७ किमी पर्यंत असतो. त्यात ५००,००० हून अधिक लोक तात्काळ मृत्यू पावतील.
स्फोटाच्या केंद्रापासून (ग्राउंड झीरो) ०.५ किमी आत सर्व इमारती कोसळतील. ५ पाउंड्स प्रति स्क्वेअर इंच (psi) दाबामुळे फुटणाऱ्या काचांच्या तुकड्यांमुळे हजारो जखमी होतील.
मुंबईची घनदाट वस्ती (३०,००० लोक प्रति चौरस किमी) या विनाशाला अधिक घातक बनवेल. थर्मल रेडिएशनमुळे ३ किमी पर्यंत अग्नीप्रवण इमारती (जसे की बाजारपेठा) फायरस्टॉर्म निर्माण करतील. यामुळे ऑक्सिजन संपून श्वास घेणे अशक्य होईल.
लोकल ट्रेन्स, मेट्रो आणि हार्बर या मुंबईच्या रक्तवाहिन्या समजल्या जाणाऱ्या रेल्वे वाहिन्या पूर्णपणे बंद पडतील. GT हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल सारख्या रुग्णालयांचा स्टाफ स्वतः जखमी होईल किंवा मृत्यू पावेल. यामुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवणे अशक्य होईल.
पहिल्या तासात १० लाख लोक मृत्यू किंवा जखमी होतील. रेडिएशनमुळे कर्करोग, अंधत्व आणि जनुकीय दोषांची लाट येईल. हिरोशिमामध्ये ७०,००० लोक मृत्यू पावले होते; मुंबईत हे प्रमाण दहापट वाढेल.
दीर्घकालीन आणि जागतिक परिणाम
या विध्वंसानंतर न्यूक्लिअर विंटर सुरू होईल. पाकने मुंबईवर हल्ला केला आणि त्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले, तर दोन्ही देशांत किमान १००-१५० अणुबॉम्बचा वापर होईल. यामुळे दक्षिण आशियात ५०-१२५ दशलक्ष तात्काळ मृत्यू होतील.
मुंबईत रेडिओअॅक्टिव्ह फॉलआऊटमुळे पाणी, हवा आणि माती दूषित होईल. आर्थिक आघाडीवर मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि बंदर नष्ट झाल्यामुळे भारताचा GDP ३०% ने खाली येईल, आणि जागतिक व्यापार प्रभावित होईल. संपूर्ण शहराची राख झाल्यामुळे १६-३६ टेराग्रॅम्स ब्लॅक कार्बन वातावरणात मिसळेल. यामुळे सूर्यप्रकाश अडून तापमान २-५° सेल्सिअसने घसरेल.
पावसाचा तुटवडा निर्माण होईल. कृषी उत्पादन २०-३०% ने घसरेल. २०-५० दशलक्ष लोक उपासमारीने मरतील.
मुंबईसारखे शहर उद्ध्वस्त झाल्यास, शरणार्थींची लाट येईल. महाराष्ट्रात अराजकता पसरेल. आरोग्य व्यवस्था कोलमडेल. कर्करोग-जनुकीय विकृतींची साथ येईल. तज्ज्ञांच्या मते, २०२५ च्या संकटाने न्यूक्लिअर थ्रेशोल्ड ओलांडण्याची शक्यता वाढवली आहे.
पाकची टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स आणि भारताची मिसाइल क्षमता एस्कलेशनला प्रोत्साहन देईल. पण हे टाळता येईल. कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स (CBMs) जसे की न्यूक्लिअर साइट्सची यादी देवाणघेवाण तथा थर्ड पार्टी मध्यस्थी (अमेरिका, चीन) या प्रकरणी महत्त्वाची ठरेल.
भारताने "सर्जिकल स्ट्राईक्स" सारख्या मर्यादित कारवाया केल्या. त्यामुळे युद्ध टळले गेले. आता गरज आहे जम्मू काश्मीर व दहशतवादासह सर्वच द्विपक्षीय मुद्यांवर प्रत्यक्ष संवाद सुरू करण्याची. UN व IAEA सारख्या संस्थांनीही निरीक्षण वाढवावे. न्यूक्लिअर डिसआर्मामेंट हा एकमेव उपाय आहे. अन्यथा, मुंबईसारखे शहर इतिहासातील पान बनेल.
थोडक्यात, मुंबईवर अणुबॉम्ब पडला तर लाखो जीव जातील. अर्थव्यवस्था कोलमडेल. जगाला न्यूक्लिअर विंटरचा सामना करावा लागेल. २०२५ च्या तणावाने हे धोके थोडक्यात हुकले. पण आपण त्यातून धडा घेतला पाहिजे. भारत - पाकने शत्रुत्व सोडून शांततेचा मार्ग निवडावा. कारण, युद्धाने कुणाचेच भले होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा