शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

बसव प्रेमानंद- अंधश्रद्धेच्या खाटेवर झोपलेल्या समाजाला लाथ घालणारा दार्शनिक


अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांपुढे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व श्याम मानव या दोघांचे चेहरे येतात. पण या दोघांपूर्वी केरळच्या बी प्रेमानंद अर्थात बसव प्रेमानंद नामक एका अवलियाने या क्षेत्रात भरपूर काम केले. प्रेमानंद यांनीच दाभोळकरांना अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला बरे करण्यासाठी प्रेरित केले असे मानले जाते. आजच्या धर्मांधतेच्या वातावरणात वेगवेगळ्या अफवांचा पसरणारा बाजार पाहता अशा अवलियांची उणीव प्रकर्षाने भासते. B Premanand

चला तर मग पाहूया बुवाबाजी उघड करण्याचा ध्यास घेतलेल्या तथा देशभर फिरून विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणाऱ्या बी प्रेमानंद यांचा जीवनपट... 

B Premanand

21 सप्टेंबर 1995 रोजी गणपती दूध पित असल्याच्या चमत्काराची अफवा देशभर पसरली. अवघा देश या अफवेत आकंठ बुडालेला होता. त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन या चमत्कारामागील विज्ञान समजावून सांगत लोकांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेतील वास्तव समजल्यानंतर यथावकाश या चमत्काराची हवा निघून गेली.

भारताला असे चमत्कार व त्यातून होणारे शोषण, पिळवणूक, फसवणूक आदी प्रकार नवे नाहीत. बी प्रेमानंद यांनी काही दशकांपूर्वी आपल्या शिस्तबद्ध, विवेकी पद्धतीने त्याचा यशस्वी सामना केला. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील कोणताही विषय पूर्ण होऊ शकत नाही. Basava Premanand Biography



ईश्वराच्या शोधात बालपणी सोडले घर

बसव प्रेमानंद यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1930 रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात झाला. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. तिथेच त्यांच्या शालेय शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. त्यांनी घरीच शिक्षण घेतले. प्रेमानंद यांचे पालक थिओसॉफिकल (ब्रह्मविद्या) सोसायटीचे अनुयायी होते. या सोसायटीच्या संस्थापक हेलेना ब्लावस्की यांच्या विचारांचा प्रेमानंद यांच्यावर भारी पगडा होता. त्यातून त्यांना गूढ विद्या व योग यामध्ये आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी ईश्वराचा शोध घेण्यासाठी घर-दार सोडले.

B Premanand

पुढल्या प्रवासात त्यांना अनेक बुवा, बाबा, साधू भेटले. पण अत्यंत चौकस व चिकित्सक वृत्तीमुळे ते या साधूंना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे या बाबा लोकांना फार अवघड जात असे.

यातील एक किस्सा फारच रंजक आहे. तो असा की,

कुंडलिनी शक्ती जागृत करून चांगल्या आरोग्याची हमी देणारे एक महाराज स्वतः मात्र मधुमेह व अन्य जुनाट रोगांनी त्रस्त होते. हे बी प्रेमानंद यांना माहिती झाले. त्यांनी त्याची विचारणा सदर महाराजांकडे केली. त्यावर त्या महाराजांनी हे आपल्या पूर्वजन्माचे कृत्य असल्याचे उत्तर दिले. पण त्यांचे हे उत्तर प्रेमानंद यांना पटले नाही. अखेर ईश्वराच्या शोधात निघालेल्या प्रेमानंद यांची जीवनयात्रा येथूनच नास्तिकतेकडे झुकण्यास सुरुवात झाली. तिथे त्यांना हळूहळू सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळू लागली.



अब्राहम कोवूर यांच्या भेटीमुळे जीवनात बदल

अब्राहम कोवूर (Abraham Kovoor) यांची 1969 मध्ये भारतात बुवाबाजीविरोधात एक मोहीम सुरू झाली. प्रेमानंद त्यांना भेटले. तेव्हापासून त्यांनी बुद्धिवादाचा मार्ग अवलंबला. ते डॉक्टर कोवूर यांच्या चमत्कारांचा पर्दाफाश करण्याच्या मोहिमेत सामील झाले. 1978 साली कोवूर यांचे निधन झाले. त्यानंतर बी प्रेमानंद यांनी त्यांचा वारसा समर्थपणे चालवला. त्यांनी बुवाबाजी विरोधात काम करणाऱ्या देशभरातील संघटना फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनालिस्ट असोसिएशन्सच्या (फिरा) छत्राखाली एकत्र आणल्या. Anti Superstition Movement India

श्रीलंकेच्या कथित सिद्धपुरुषाला शिकवला धडा

B Premanand and miracle exposure

1980 साली स्वतःला जपानी म्हणून सांगणारा एक कथित सिद्धपुरुष श्रीलंकेतून आला. त्याने दावा केला की, देवी आशीर्वादामुळे तो डोक्यावर 100 नारळ फोडू शकतो. प्रेमानंद यांनी त्यांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण केले. तेव्हा तो फक्त कोवळे व मऊ नारळच फोडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. हे नारळ कोणताही सर्वसाधारण माणूस फोडू शकतो. 

त्यानंतर प्रेमानंद यांनी त्या सिद्धपुरुषाची नारळाची पिशवी बदलली. त्यात त्यांनी कडक नारळे ठेवले. त्यानंतर त्या सिद्धपुरुषाने ते नारळ डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. पण ते काही केल्या फुटेनात. अखेर त्याने आपली चलाखी लपवण्यासाठी एक मखलाशी केली. तो म्हणाला की, मी सकाळी एका महिलेला आंघोळ करताना पाहिले होते. त्यामुळे तो विचलित झाला होता. पण तोवर त्याची ही चलाखी लोकांच्या लक्षात आली होती. अशा प्रकारे बी प्रेमानंद यांनी या सिद्धपुरुषाचे ढोंग उघड केले होते.

सत्य साईबाबांच्या दैवी चमत्कारांना आव्हान

Sathya Sai Baba

बसव प्रेमानंद यांनी 1976 मध्ये सत्य साईबाबा यांच्या दैवी चमत्कारांना आव्हान दिले. सत्य साईबाबा हे हवेतून सोन्याचे दागिने काढवून दाखवत असत. त्यांच्या अनुयायांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून पंतप्रधान व राष्ट्रपतीपर्यंतचे सर्वच नेते होते. त्यामुळे त्यांना राजाश्रय व पैशांचे पाठबळ लाभले. त्यांचे हवेतून सोनसाखळ्या काढण्याचे कथित चमत्कार पाहून त्यांचे भक्त आश्चर्यचकित होत असत. Sathya Sai Baba Miracles

पण प्रेमानंद यांनी त्यांच्या या चमत्काराला आव्हान दिले. त्यांनी हवेतून सोने काढण्याचे कथित कृत्य 'सुवर्ण नियंत्रण कायदा -1968' अंतर्गत गु्न्हा असल्याचा आरोप केला. तसेच सत्य साईबाबांविरोधात कारवाई करण्यासाठी संबंधित सरकारी विभागाकडे 1981 पासून पत्रव्यवहार सुरू केला. त्यानंतर 1986 मध्ये आपल्या सहकाऱ्यांसह ते सत्य साईबाबा यांच्या पुट्टपर्थी आश्रमाकडे निघाले. पण रस्त्यातच त्यांना अटक झाली.

सत्य साईबाबा हे बी प्रेमानंद यांच्या रागाचे एक प्रमुख कारण होते. प्रेमानंद एकदा म्हणाले होते, सत्य साईबाबा एक माफिया आहेत. त्याशिवाय ते दुसरे काहीही नाहीत. ते लोकांची फसवणूक करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. Anti Superstition Activist



सत्यसाईंना चक्क हायकोर्टात खेचले

बसव प्रेमानंद यांनी 1986 सालीच आंध्र प्रदेश हायकोर्टात सत्य साईबाबा व केंद्र सरकारच्या संबंधित खात्याविरोधात एक रिट पिटिशन दाखल केली. ते आपल्या याचिकेत म्हणाले, सत्य साईबाबा हवेतून सोने काढतात. यामुळे सोने निर्माण करण्यासंबंधी सुवर्ण नियंत्रण कायद्यात असणाऱ्या तरतुदींचा भंग होतो. ही बाब आम्ही 1981 पासून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली. पण त्यानंतरही या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही.

Sai Baba

हवेतून निर्माण केले जाणारे दागिने सत्य साईबाबांच्या ट्रस्टच्या मालकीचे असू शकतात आणि ट्रस्टच्या लोकांनी प्रत्यक्ष चमत्कारापूर्वी त्याच्याकडे पोहोचवलेले असू शकतात, असा दावाही प्रेमानंद यांनी आपल्या अर्जात केला होता. पण हायकोर्टाने सत्य साईबाबा यांचे कृत्य कायद्याचे उल्लंघन करणारे नसल्याचे नमूद करत त्यांचा दावा धुडकावून लावला. त्यांची रिट याचिका निकाली काढली.

हा खटला प्रेमानंद हरले. पण या प्रकरणामुळे सत्य साईबाबा यांच्या कथित चमत्कारांविषयी सर्वसामान्य माणसांत आवश्यक ती चर्चा सुरू झाली होती. या खटल्यामुळे चमत्कारी बाबा व त्यांच्या चमत्कारांविषयी समाजात संशय निर्माण करण्यात प्रेमानंद कमालीचे यशस्वी ठरले होते.


स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात विचारांचे जागरण थांबले

Scientific temper and anti superstition movement

अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर एकेठिकाणी बी प्रेमानंद यांच्याविषयी म्हणाले होते, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार महाराष्ट्राला नवा नाही. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा फार बळकट पाठिंबा या विचारामागे आहे. पण स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात या विचाराचे जागरण थांबले. 'किर्लोस्कर'सारख्या मासिकाने 1935 ते 45 च्या कालावनधीत बुवाबाजी सारख्या घटना आणि दुसऱ्या बाजूला देव-धर्म या कल्पना याबाबत केवढी तरी प्रभावी मोहीम चालवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माला सतत तपासत होते. संत गाडगेबाबा लक्षावधींच्या जनसमुदायांशी विचारपरिवर्तनाचा जो संवाद करत होते, त्यात अंधश्रद्धा हा एक महत्त्वाचा विषय होता. पण हे साधारणतः 1956 च्या दरम्यान थंडावले. Narendra Dabholkar, Shyam Manav

कदाचित स्वातंत्र्यात मिळणारे शिक्षण, विज्ञानाचा प्रसार आणि आधुनिकता यांनी अंधश्रद्धांचे निर्मूलन आपोआप होईल, असे जनमानसाला वाटत असावे. पण प्रत्यक्षात त्याची विरोधी बाजू हळूहळू जोर पकडत होती. 70 ते 80 च्या दशकात मराठीत 'श्री' साप्ताहिकाचा खप लाखाच्या घरात पोचला होता. त्यामध्ये भुताचे खरेखुरे(!) फोटो - रोज थोडे सोने देणारा चिंतामणी... अशा वेगवेगळ्या बाबी तिखट-मीठ लावून छापल्या जात होत्या आणि चर्चा-विषय बनत होत्या. या वातावरणात केरळचे विख्यात बुद्धिप्रामाण्यवादी बी. प्रेमानंद यांचा महाराष्ट्र दौरा झाला. त्यांनी जिभेतून त्रिशूळ आरपार काढले. मंत्राने अग्नी पेटवणे, गाडग्यात भूत बंद करणे, रिकाम्या हातातून सोन्याची साखळी काढणे असे अनेक चमत्कार दाखवले. चमत्कार पाहण्याचे आकर्षण जनमानसात आजही टिकून आहे.



येथे एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की, चमत्कारांचे सादरीकरण म्हणजे जादूचे प्रयोग नव्हेत. जादूगार साधन-सामग्री घेऊन येतो आणि जादूचे प्रयोग करतो. कोणताही बाबा असे करत नाही. भाविकांच्याच घरातील कुंकू घेऊन ते त्याचा बुक्का बनवितात आणि हळद घेऊन त्याचे कुंकू बनवतात. कलेचा अविष्कार जादूगार करत असतो. महाराज दैवीशक्तीचा साक्षात्कार घडवत असतात. चमत्काराचे आकर्षण ही बाब संघटना बांधणीला अनुकूलता निर्माण करते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन याचा संबंध केवळ चमत्काराशी न ठेवण्याची खबरदारी आम्ही पहिल्यापासून घेतली. चमत्कार सादरीकरण हे समितीचे सामर्थ्य केंद्र होते आणि आहे, परंतु अंधश्रद्धांचे सर्व प्रकार हे समितीने आपला अभ्यासविषय व कार्यविषय बनवले.

वस्तू अचानकपणे जागेवरून हलवणे, कपडे आपोआप जळणे आणि फाटणे, अंगावर बिब्याच्या फुल्या उठणे - असे भानामतीचे प्रकार घडतात कसे, याचा शास्त्रीय उलगडा समितीने केला. बाईच्या अंगात देवीचा संचार होतो कसा, एखाद्याला भूत झपाटते म्हणजे काय, याची मानसशास्त्रीय मीमांसा केली. फलज्योतिष हे विज्ञानाच्या निकषांवर शास्त्र म्हणून कसे टिकू शकत नाही, याची सप्रमाण मांडणी केली. बुवाबाजीचे विविध प्रकार आणि त्यामागची समाजशास्त्रीय चिकित्सा उलगडून दाखविली. या स्वरूपाच्या सर्व प्रकारांबाबत जे अमाप कुतूहल लोकांच्यात असते, त्यामुळे चळवळ जनमानसात प्रवेश करू शकली. परंतु समितीचे वैचारिक काम त्याच्या किती तरी पुढे जाणीवपूर्वक नेण्यात आले.

प्रेमानंद यांचे आव्हान अजून कायम

प्रेमानंद यांचा वारसा अत्यंत रंजक आहे. त्यांनी एकदा हस्तरेखाशास्त्रज्ञ, ज्योतिषी व बुवाबाजी करणाऱ्यांना फसवणूकमुक्त परिस्थितीत त्यांची शक्ती सिद्ध करण्याचे व 1 लाख रुपये घेऊन जाण्याचे आव्हान दिले होते. त्यांचे हे आव्हान अजूनही तसेच आहे. ते अजूनही अपराजित आहेत.



2009 मध्ये तामिळनाडूत निधन

प्रेमानंद यांना 2006 मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर 4 ऑक्टोबर 2009 रोजी पोदानूर, तामिळनाडू येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांचे शरीर स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात दान करण्यात आले. अशा पद्धतीने अवघ्या भारताला तिमिरातुनी तेजाकडे नेण्याचा प्रयत्न करणारा एक थोर बुद्धिवादी, विज्ञानवादी समाजसुधारक कायमचा शांत झाला. बसव प्रेमानंद यांच्यानंतर नरेंद्र नायक यांनी त्यांचा पदभार स्वीकारला. त्यांची मालमत्ता आणि त्यांच्या 26 पुस्तकांचे अधिकार फेडरेशन फॉर इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशनला देण्यात आलेत.

By- Bhagyadarshi Lokhande, भाग्यदर्शी लोखंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा