भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

शास्त्रज्ञ अंतराळात लावणार छत्री, पण का?



ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ जगातील एक सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीच्या तापमानात दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. त्यातच आता त्यांनी यावर उपाय म्हणून पृथ्वीचे सूर्यापासून निघणाऱ्या सौर ज्वाळांपासून संरक्षण करण्यासाठी अंतराळात एक सुरक्षा छत्री लावण्याचा निर्धार केला आहे. जागतिक जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी अवकाश-आधारित सनशेड्सचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासगट तयार केला आहे. हा गट अंतराळात छत्री लावण्याच्या संकल्पनेवर गत अनेक वर्षांपासून उहापोह करत आहे. विशेषतः प्लॅनेटरी सनशेड फाउंडेशन ही संकल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहे.

या फाउंडेशनच्या मते, सौर किरणोत्सर्गाचे व्यवस्थापन हा ग्लोबल वॉर्मिंगवर सर्वोत्तम उपाय ठरेल. जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे उत्सर्जन कमी करणे, दुसरा कार्बन डायऑक्साइड काढून टाकणे व तिसरा म्हणते सौर किरणोत्सर्गाचे व्यवस्थापन करणे. जगाचे सरासरी तापमान सध्याच्या सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढण्यापासून रोखण्याच्या मुद्यावर एक करार झाला आहे. परंतु तापमान जेवढे कमी होईल तेवढे जागतिक तापमानवाढीचे परिणाम कमी होतील. संशोधकांनी पुढील दशकात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा दिला आहे. 



जागतिक तापमानवाढ कशी थांबवता येईल?

जागतिक तापमानवाढ समुद्राच्या पातळीत वाढ होणे, जंगलात वणवा भडकणे व बर्फ वितळण्यासारख्या अत्यंत टोकाच्या हवामानाच्या घटनांसाठी जबाबदार आहे. मॉर्गन गुडविन हे प्लॅनेटरी सनशेड फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत. अंतराळात सनशेड्स तयार करण्याच्या प्रकल्पावर ते म्हणतात, सध्या डीकार्बोनायझेशन धोरण आवश्यक आहे. त्यांच्या मते, जागतिक तापमानवाढीचे सर्वात वाईट परिणाम टाळण्यासाठी जगाने जीवाश्म इंधनाचा वापर झपाट्याने बंद केला पाहिजे. वातावरणातून गिगाटन कार्बन काढून टाकण्यासह सौर किर्णोत्सारही अत्यंत मर्यादित करण्याची गरज आहे.



काय आहे प्लॅन?

सूर्याचा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी अंतराळात एक मेगास्ट्रक्चर तयार केले जाईल. हे मेगास्ट्रक्चर सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान असणाऱ्या लँग्रेज-1 पॉइंटवर स्थापित केले जाईल. प्लॅन असा आहे की, हे मेगास्ट्रक्चर अंतराळात स्थापन केले जाईल तेव्हा ते बहुतांश सूर्यप्रकाश अंतराळात रिफ्लेक्ट अर्थात परावर्तित करेल. हे प्लॅनेटरी फाउंडेशन तयार करणे फारसे अवघड नाही. फाउंडेशनच्या मते, अंतराळ तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. विशेषतः आज अंतराळात माणूस व सामग्री पाठवण्याचा खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे ही संकल्पना मूर्त रूपात येणे सहज शक्य आहे. 

आता अनेकांना प्रश्न पडेल की, ही सूर्यछत्री अर्थात सनशेड सूर्याच्या उष्णतेमुळे जळून जाणार नाही का? तर याचे उत्तर 'नाही' असे आहे. 



काय आहे लँग्रेज-1 पॉइंट? 

सूर्य व पृथ्वी या दोन्हींच्या आत गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण एका विशिष्ट टप्प्यावर या दोन्हीमधील गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते. याचा अर्थ असा की, या पॉइंटमधून जाणाऱ्या कक्षेत एखादा उपग्रह ठेवला तर तो सूर्य किंवा पृथ्वी या दोघांकडेही खेचला जाणार नाही. सूर्य व पृथ्वी यांत्यातील सरळ रेषेत असेच 5 पॉइंट निश्चित करण्यात आलेत. 



त्याला विख्यात गणितज्ज्ञ जोसेफ -लुई लँग्रेज यांच्या नावावरून लँग्रेस पॉइंट्स असे नाव देण्यात आले आहे. त्यापैकी लँग्रेज-1 हा एक असाच पॉइंट आहे. हा लँग्रेज-1 बिंदू पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी व सूर्य यांच्यातील 100 वा भाग आहे. लँग्रेज-1 चा फायदा असा आहे की, त्यातून जाणाऱ्या कक्षेत फिरणारी वस्तू (ज्याला आपण हॅलो ऑर्बिट म्हणतो) सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणात लपत नाही. अशा या जादुई ठिकाणी अंतराळ छत्री स्थापन करून पृथ्वीचे संरक्षण करण्याचा संशोधकांचा मानस आहे. 

आशा आहे की, आजचा ब्लॉगही तुम्हाला आवडला असेल. खाली तुम्ही तुमच्या प्रतिक्रियाही नोंदवू शकता किंवा एखाद्या विषयाची विस्तृत माहिती हवी असेल, तर त्याचीही मागणी करू शकता.

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा