भारताच्या गौरवशाली इतिहासात अनेक वीरांगणांनी आपले दुर्दम्य साहस, प्रखर बुद्धिमत्ता व स्वातंत्र्याच्या अथक संकल्पाने काळाच्या पडद्यावर अमर कहाण्या रचल्या. या धाडसी स्त्रियांनी परकीय आक्रमकांच्या अन्यायी सत्तेला केवळ ललकारलेच नाही, तर आपल्या कर्तृत्वाने स्वातंत्र्याच्या लढ्याला एक नवी चेतना दिली. आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली अमिट छाप सोडली.
अशा महिलांच्या शौर्याच्या व बलिदानाच्या गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेरणेचा अखंड झरा म्हणून वाहतात. चला तर मग आज पाहूया शिवगंगाची राणी वेलू नाचियार या अशाच एका तेजस्वी वीरांगणेचा इतिहास...
विजयादशमी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. किल्ल्यातील मंदिरात आसपासच्या गावातील महिला येतील. आपण त्यांच्यात मिसळून किल्ल्यात प्रवेश करू शकतो. कायिलीचे हे शब्द ऐकताच राणी वेलू नाचियार यांचे डोळे चमकले. त्यांनी किल्ल्याकडे एक कटाक्ष टाकला. त्यांचे डोळे सूडाच्या भावनेने लालबुंद झाले होते. खूप वर्षांपूर्वी हा किल्ला त्यांचा होता, पण आता तो इंग्रजांच्या ताब्यात होता. शिवगंगा राज्याची राणी, जिचे पती मुथु वदुगनाथ थेवर तिथे राज्य करत होते.
राणी वेलू नाचियार यांचा जन्म 3 जानेवारी 1730 रोजी झाला. तिच्या वडिलांचे नाव चेल्लमुत्थु विजयराघुनाथ सेतुपती असे होते. ते रामनाथपुरमचे राजे होते. सध्या हे क्षेत्र तामिळनाडूत येते. वेलू ही सेतुपती यांची एकुलती एक कन्या होती. त्यामुळे वेलूचे पालन - पोषण एखाद्या राजपुत्राला शोभेल असे झाले. वेलू सर्व शस्त्रास्त्रांत पारंगत होती. सिलंबम (एक शस्त्राधारित मार्शल आर्ट), कुस्ती, घोडेस्वारी, धनुर्विद्या आदी सर्वच संरक्षण क्रीडा प्रकारांची तिला बालपणीच ट्रेनिंग मिळाली होती. राणी वेलू बहुभाषिक होती. तिला केवळ हिंदीच नव्हे तर तामिळ, इंग्रजी, फ्रेन्च व उर्दु सारख्या विविध भाषांचे ज्ञान होते.
शिवगंगाच्या राजकुमाराशी झाले लग्न
वेलूचे वयाच्या 16 व्या वर्षी शिवगंगाच्या राजकुमाराशी लग्न झाले. या दाम्पत्याने 1750 ते 1772 पर्यंत म्हणजे 2 दशकांहून अधिक काळ शिवगंगावर राज्य केले. पण 1772 साली आर्काटच्या नवाबाने इंग्रजांशी संधान साधून अचानक शिवगंगावर हल्ला केला. त्याने वेलू नाचियार यांचे पती मुथु वदुगननाथ पेरिया उदैया थेवर यांची हत्या केली. हा हल्ला झाला त्यावेळी राणी वेलू व त्यांची चिमुकली कन्या वेल्लाची ह्या जवळच्या मंदिरात गेल्या होत्या. त्यामुळे त्या बचावल्या. थेवर यांच्यासोबत लढणारे निष्ठावंत मारुथु बंधू, वेल्लई व चित्रा यांनी त्यांना तेथून एका सुरक्षित निर्जन स्थळी हलवले. अखेरच्या क्षणी वेलू यांना आपल्या पतीचा चेहराही पाहता आला नाही.
इतिहास तज्ज्ञ शुबेंद्र या घटनेविषयी आपल्या पुस्तकात सांगतात, राणी वेलूच्या सुरक्षेसाठी त्यांची विश्वासू महिला अंगरक्षक उदयाल व इतर महिला सैनिकांना तैनात करण्यात आले. काही ठिकाणी उदयाल ही राणीची दत्तक कन्या असल्याचाही दावा केला जातो.
नवाबाच्या सैनिकांनी उदयालला अटक केली. त्यांनी त्यांचा अतोनात छळ केला. पण तिने राणीचा ठावठिकाणा सांगितला नाही. अखेरीस तिचा शिरच्छेद करण्यात आला. तब्बल 8 वर्षे जंगल आणि गावोगावी रानोमाळ भटकणारी राणी वेलू नाचियार यांनी शिवगंगा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्याचा निर्धार केला. पण यासाठी तिला एका फौजेची गरज होती. त्यानुसार त्यांनी मारुथु बंधूंच्या मदतीने आपल्या निष्ठावंत महिलांची एक फौज उभी केली. या फौजेला 'उदयाल' असे नाव दिले. पण बलाढ्य इंग्रजांचा सामना करण्यासाठी ही फौज पुरेशी नव्हती.
म्हैसूरच्या सुलतान हैदर अलीशी केली आघाडी
म्हैसूरचा सुलतान हैदर अली यांचे इंग्रजच नव्हे तर आर्काटच्या नवाबाशीही चांगले संबंध नव्हते. त्यामुळे राणी वेलू यांनी शत्रूचा शत्रू आपला मित्र या धोरणाने हैदर अली यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हैसूरपर्यंतचा धोकादायक प्रवास केला. वेलू नाचियार व हैदरलीची भेट शिवगंगाहून जवळपास 100 किलोमीटर दूर असणाऱ्या डिंडीगुल येथे झाली. त्यांनी हैदर अलीशी उर्दूत संवाद साधला. आपली हिंमत व दृढनिश्चयाने त्यांचे मन जिंकले. त्यामुळे म्हैसूरच्या सुलतानाने वेलूला आपल्या डिंडीगुलच्या किल्ल्यात राहण्याचे निमंत्रण दिले. तिथे त्यांचा मानसन्मान एखाद्या राणीसारखा ठेवला गेला. हैदर अलीने आपल्या मैत्रीचे प्रतीक म्हणून वेलू यांच्यासाठी आपल्या महालात एक मंदिरही बांधले.
हैदर अली - वेलू यांची परस्पर गरजेची आघाडी
इतिहासकार आर. मणिकंदन यांच्या मते, हैदर अली व वेलू नाचियार यांची आघाडी परस्पर गरजेतून निर्माण झाली होती. वेलूला स्वतःचे राज्य परत मिळवण्यासाठी लष्करी गरज हवी होती, तर हैदर अली यांना या भागातील ब्रिटिशांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान द्यायचे होते. हैदर अलीने इंग्रजांविरोधातील युद्धात भागीदार बनण्याचा संकल्प केला. त्यांनी वेलू यांना मासिक 400 पाऊंड व शस्त्रास्त्रांसह सय्यद करकी याच्या नेतृत्वात 5 हजार सैनिक व घोडेस्वारांची रसद पुरवली.
शुभेंद्र लिहितात, या फौजेच्या बळावर राणी वेलू यांनी शिवगंगा साम्राज्याचे विविध प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. त्या 1781 पर्यंत तिरुचिरापल्ली किल्ल्यापर्यंत पोहोचल्या. हा किल्ला तेव्हा इंग्रजांच्या तावडीत होता. हैदर अलीने ब्रिटिशांना मिळणारी रसद रोखली. पण राणी वेलूकडे किल्ल्यात प्रवेश करण्याचे कोणतेही साधन नव्हते.
कुयिलीच्या नेतृत्वात महिला सैन्याची निर्मिती
राणी वेलूने उदयालच्या बलिदानाच्या स्मरणार्थ महिलांची एक फौज तयार केली होती. या सेनेची सेनापती असणाऱ्या कुयिलीने या किल्ल्याचे प्रवेशद्वार उघडण्यासाठी एक धाडसी योजना आखली. ती म्हणाली, राणी काळजी करू नको. सध्या नवरात्री सुरू आहे. विजयादशमीचा सण तोंडावरच आला आहे. त्या दिवशी आसपासच्या सर्वच गावातील महिला राजा राजेश्वीर अम्मनच्या मंदिरात पूजेसाठी जातील. आपण त्यांच्यात मिसळू. मी आपल्या उदयाल सेनेच्या मुलींच्या एका छोट्याशा तुकडीचे नेतृत्व करेन. शस्त्र लपवून किल्ल्यात शिरेन. त्यानंतर आम्ही शत्रूला पाणी पाजून आतून किल्ल्याचे प्रवेशद्वार उघडू. त्यानंतर तुम्ही नव्या दमाने किल्ल्यात प्रवेश करा.
कुयिलीची ही योजना ऐकताच राणी वेलूच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ती आनंदाच्या भरात म्हणाली, कुयिली तू नेहमीच कोणता न कोणता मार्ग काढतेस. तू नेहमीच उदयालचे नाव उज्ज्वल करतेस. त्यानंतर अखेर विजयादशमीचा दिवस उजाडला. आसपासच्या ग्रामीण महिलांसोबत कुइली व तिच्या सहकारी किल्ल्याच्या आत असणाऱ्या मंदिरात गेल्या. तिथे पूजाअर्चा सुरू झाली. तेवढ्यात ठरलेल्या वेळी कुयिलीने गर्जना केली, उठा माझ्या बहिणींनो! तिची ही भीमगर्जना ऐकताच उदयालच्या तरुणींनी तत्काळ आपल्या कपड्यात लपवलेल्या नंग्या तलवारी उपसल्या. त्यांनी काही कळण्याच्या आत पहाऱ्यावर उभ्या असणाऱ्या इंग्रजी सैनिकांवर हल्ला चढवला.
..अन् कुयिलीने उडवला ब्रिटिशांचा दारूगोळा
या अनपेक्षित हल्ल्यामुळे ब्रिटिश सैनिकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांना काहीच कळेनासे झाले. काय झाले? हे लक्षात येण्याअगोदरच कुयिलीने चित्त्याच्या चपळाईने त्यांचा फडशा पाडला. त्यानंतर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने धाव घेतली. त्याचवेळी तिची नजर ब्रिटिशांच्या दारूगोळ्याच्या ढिगावर पडली. या दारूगोळ्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे तिच्या लक्षात आले. तिने काहीतरी मनाशी खूनगाठ बांधली आणि देवीच्या पुजेसाठी आणलेले तूप स्वतःच्या अंगावर ओतले. त्यानंतर प्रवेशद्वारावर ठेवलेली मशाल पेटवून स्वतःला आग लावली. जिवंत जळणाऱ्या कुयिलीने पुढच्याच क्षणाला दारूगोळ्याच्या त्या ढिगाऱ्यावर उडी घेतली. त्यानंतर लगेचच दारूगोळ्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला.
कुयिलीच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. तोपर्यंत तिच्या सहकाऱ्यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडला होता. त्यानंतर किल्ल्याबाहेर दबा धरून बसलेली राणी वेलू आपल्या सहकाऱ्यांसह त्वेषाने इंग्रजांवर तुटून पडली होती. त्यानंतर झालेल्या घनघोर युद्धात वेलूने शिवगंगाची राजधानी असणारा हा किल्ला सर केला. किल्ल्यात प्रवेश करताच राणी वेलूने कुयिली कुठे आहे? असा प्रश्न केला. पण सैनिकांनी ती शहीद झाल्याचे सांगताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.
कुयिली ही राणी वेलूसाठी मुलीसारखी होती. तिला अभिमानाने पहिली महिला आत्मघातकी हल्लेखोर मानले जाते.
आत्ता पाहु कोण होती कुयिली?
कुयिली ही राणी वेलू नाचियार यांची एक अंगरक्षिका होती. ती वेलू यांची दत्तकपुत्री उदयाल हिची मैत्रिण तथा महिला फौजेची सेनापती होती. इतिहासात तिला पहिली महिला आत्मघातकी हल्लेखोर म्हणूनही ओळखले जाते. 1780 साली तिने ब्रिटिशांवर आत्मघातकही हल्ला करून त्यांना हादरा दिला. यामुळे शिवगंगा किल्ल्यावरील युद्धात ब्रिटिशांना पराभवाची चव चाखावी लागली.
कुयिली एक बहाद्दर योद्धा होती. तिच्या वडिलांचे नाव पेरियमुथान, तर आईचे नाव राकू असे होते. हे शेतकरी दाम्पत्य होते. कुयिलीची आई आपल्या धाडसीपणाबद्दल ओळखली जात होती. तिचा जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पेरियमुथान आपली मुलगी कुयिलीसह शिवगंगाला गेले. तिथे त्यांनी चांभाराचे काम केले. त्यांनी कुयिलीला तिच्या आईच्या धाडसी कथा सांगितल्या. त्यातून कुयिलीची जडणघडण झाली.
कुयिलीने राणी वेलूच्या अंगावरील वार झेलला
एकदा एका हल्लेखोराने राणी वेलू यांची त्या झोपेत असताना हत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुयिली तिथेच बाजूला होती. तिने राणीवरील वार आपल्या अंगावर घेतला. तिने त्या हल्लेखोराशी दोनहात केले. त्याला ठार मारले. पण या घटनेत ती जबर जखमी झाले. हे पाहिल्यानंतर राणी वेलूने तत्काळ आपल्या साडीचा पदर फाडून तिच्या जखमांवर पट्टी बांधली.
प्रशिक्षक महिलेपासून वाचवले राणीचे प्राण
कुयिली बद्दर होती. तिला शस्त्रविद्येत मोठी रुची होती. राणीने तिच्या सैनिकी प्रशिक्षणाची विशेष सोय केली होती. कुयिलीला एकदा आपल्या सिलंबम (एक शस्त्राधारित मार्शल आर्ट) प्रशिक्षकाची हालचाल संशयास्पद वाटली. त्यामुळे तिने तिच्यावर नजर ठेवली. त्यात सदर प्रशिक्षक महिला ही इंग्रजांची हेर असल्याचे तिला आढळले. कुयिलीने संभाव्य धोका लक्षात घेऊन तत्काळ ही गोष्ट आपल्या राणीच्या कानावर घातली. त्यानंतर राणीने कारवाई करण्यापूर्वीच सदर हेराने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेमुळे कुयिली राणी वेलू यांच्या विश्वासास पात्र झाली. प्रशिक्षणानंतर राणीने कुयिली हिची आपल्या महिला सैन्याच्या कमांडरपदी नियुक्ती केली. कुयिलीने एकदाच नव्हे तर अनेकदा आपल्या राणीचे प्राण वाचवले.
1857 च्या बंडाला भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा मानला जातो. पण राणी वेलूने त्यापूर्वी इंग्रजांना धूळ चारली. पण तिचे हे शौर्य एवढे अज्ञात राहिले की, तिच्या मृत्यूची बातमीही कुणाला कळली नाही. वेलू भारतातील इंग्रजी वसाहतवादाविरोधात लढणारी पहिली वीरांगणा होती. राणी वेलूने केवळ धाडसी युद्धच लढले नाही, तर आपल्या भावी पिढ्यांपुढे संघर्षाचे एक असे उदाहरण ठेवले की, त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. भारताच्या महिला पदर खोचून रणांगणात उतरल्या तर कोणतीही ताकद त्यांना हरवू शकत नाही हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.
शिवगंगावर 10 वर्षे राज्य केले
लेखक सुरेश कुमार या लढाईविषयी सांगतात, 1781 साली वेलू नाचियार व हैदर अलीच्या संयुक्त लष्कराने किल्ल्याचे सुरक्षा कवच उद्ध्वस्त करून त्यावर कब्जा मिळवला. अशा प्रकारे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापूर्वी (1857 चे बंड) 77 वर्षे अगोदर ब्रिटीश वसाहतवादी शक्तींविरोधातील युद्ध जिंकणारी वेलू नाचियार ही भारताची पहिली राणी ठरली. वेलू आपल्या शत्रूंच्या दुबळेपणाचा फायदा घेण्यात माहीर होती. सैन्याचा कुठे व कसा वापर करायचा हे तिला चांगले ठावूक होते. या युद्ध कौशल्यामुळेच त्यांना शिवगंगाचा किल्ला पुन्हा हस्तगत करता आला.
विशेष म्हणजे एक शूरवीर योद्धा असूनही वेलू नाचियारला आपल्या प्रजेप्रती प्रचंड सहानुभूती होती. ती एक न्यायप्रिय शासक होती. शासक वर्गाने छळलेल्या दलितांना शरण देण्याच्या तिच्या निर्णयातून याची प्रचिती येते.
वेलूने हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टीपू सुलतानाशीही चांगले संबंध ठेवले. त्याच्यावर भावासारखे प्रेम केले. तिने त्यांना भेट म्हणून एक सोनेरी रंगाचा वाघही पाठवला. त्या मोबदल्यात टीपूने तिला एक तलवार पाठवली. या तलवारीचा वापर तिने अनेक युद्धांत केला.
वेलू नाचियारची कन्या वेल्लाचीने 1790 ते 1793 पर्यंत राज्य केले. वेलू नाचियार यांचे 25 डिसेंबर 1796 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी शिवगंगात निधन झाले. यासंबंधीच्या माहितीनुसार, राणीला आपल्या काही अखेरच्या वर्षात हृदयविकाराशी संबंधित काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांच्यावर अनेक उपचार सुरू होते. पण अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या कन्या व जावयाने अंत्यसंस्कार केले.
हमसाधवानी अलगारसामी लिहितात, वेलूला तामिळ संस्कृतीत वीर मंगई (वीर मंगलई) अर्थात बहाद्दर महिला म्हणून ओळखले जाते. भारत सरकारने 2008 मध्ये तिच्या स्मरणार्थ एक डाक तिकीट जारी केले. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी 2014 मध्ये शिवगंगा येथे वीरा मंगई वेलू नाचियारच्या स्मारकाचे उद्घाटन केले. तिथे राणीचा 6 फूट उंची कांस्याचा पूर्णाकृती पुतळा उभारला.
1790 साली मुलीचा केला राज्याभिषेक
शिवगंगा पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर राणी वेलू नाचियार यांनी जवळपास 10 वर्षे राज्य केले. त्यानंतर आपली कन्या वेल्लाची हिला आपल्या सिंहासनाचा उत्तराधिकारी घोषित केले. तिचा 1790 साली राज्याभिषेक केला. एवढेच नाही तर राज्य चालवण्यास मदत होईल यासाठी त्यांनी मारुथु बंधूंना काही विशेषाधिकार प्रदान केले. तसेच शिवगंगा किल्ल्यात एक मस्जिद व एक चर्च बांधून हैदर अलीने केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तत्पूर्वी, हैदर अलीने आपल्या महालात एक मंदिर बांधून राणी वेलू यांच्यासोबतच्या आपल्या मैत्रीचे प्रदर्शन केले होते.
राणी वेलू नाचियार हे नाव धैर्य, बुद्धिमत्ता व स्वातंत्र्याच्या ज्वलंत भावनेचे प्रतीक आहे. 18 व्या शतकातील तामिळनाडूच्या शिवगंगा साम्राज्याच्या या वीरमंगईने ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी सत्तेला थेट आव्हान दिले. पतीच्या मृत्यूनंतरही न डगमता जंगलात आश्रय घेऊन तथा एका असामान्य सैन्याची निर्मिती करून आपल्या कुशल युद्धनीतीच्या जोरावर स्वातंत्र्याच्या पहिली ठिणगी पेटवली. त्यांच्या शौर्याचे किस्से, ज्यात कुयिलीच्या बलिदानापासून ते हैदर अलीसोबत आघाडी करण्यापर्यंतच्या घटना सामावलेल्या आहेत, आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्वाभिमानाची ज्योत पेटवतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा