भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, २० जुलै, २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर | जीवन, विचार आणि ऐतिहासिक योगदान

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासातील एक तेजस्वी तारा, दलित उद्धाराचे प्रणेते व सामाजिक समतेचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या जीवनातून सामाजिक समतेची अमर ज्योत प्रज्वलित केली. अस्पृश्यतेच्या काळोखातून बाहेर पडत शिक्षणाच्या तेजाने व अटळ संकल्पाने समाजातील उपेक्षितांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. जातीभेदाच्या बेड्या तोडून, अन्यायाला आव्हान देत मनुष्याच्या मनात स्वातंत्र्य व समतेची स्वप्ने रुजवली. विशेषतः संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी न्याय व बंधुत्वाचा अढळ पाया घातला.

चला तर मग उद्याच्या 134 व्या 'भीम जयंती'निमित्त पाहूया भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवघ्या जगाला थक्क करणारा जीवन प्रवास...


सुरुवातीला जन्म व शिक्षण थोडक्यात...

बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटीश सैन्यात सुभेदार होते, तर आई भीमाबाई या गृहिणी होत्या. भीमराव हे त्यांच्या कुटुंबातील 14 वे व शेवटच्या अपत्य होते. त्यांचा जन्म सामाजिक उतरंडीतील सर्वात तळाला असणाऱ्या महार जातीत झाला. त्या काळी ही जात अस्पृश्य मानली जात होती. त्यामुळे कोवळ्या वयापासूनच आंबेडकरांना पदोपदी सामाजिक भेदभाव व अपमानाला सामोरे जावे लागले.

रामजी सुभेदारांना शिक्षणाविषयीची प्रचंड आस्था होती. त्यामुळे त्यांनी भिवाला शाळेत घातले. पण शाळेतही त्याचे हाल झाले. त्यांना वर्गाबाहेर बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागले. एवढे कमी होते म्हणून की काय त्यांना शाळेतील पाण्याच्या हंड्यालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. पण या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.


बाबासाहेबांनी मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 1907 मध्ये ते मॅट्रिक पास झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1912 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यांच्या शिक्षणातील ही यशस्वी पायरी त्याकाळच्या अस्पृश्य समाजासाठी एक मोठा टप्पा ठरली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने त्यांनी पुढील उच्चशिक्षण घेतले.

आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांनी 1915 मध्ये एम.ए. आणि 1916 मध्ये पीएच.डी. मिळवली. 1923 मध्ये ते बॅरिस्टर झाले. बाबासाहेबांचे हे शिक्षण त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचा पाया ठरले.

रमाबाईंशी विवाह

बाबासाहेबांचा 1906 मध्ये रमाबाईंशी विवाह झाला. त्यावेळी बाबासाहेब 15, तर रमाबाई अवघ्या 9 वर्षांच्या होत्या. हा विवाह तत्कालीन प्रथेनुसार बालवयातच पार पडला. रमाबाई या साध्या, सरळ आणि समजूतदार स्वभावाच्या होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षण आणि सामाजिक कार्यात हिमालयासारखी मजबूत साथ दिली. बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेले, तेव्हा रमाबाई यांनी समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या संसारवेलीवर यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू व राजरत्न ही 5 फुले उमलली. पण यापैकी केवळ यशवंत हेच फुल तगले. इतर फुले लहान वयातच गळून पडली.

रमाबाईंचे मातृत्व केवळ त्यांच्या मुलांपुरते मर्यादित नव्हते. बाबासाहेब जेव्हा सामाजिक कार्यात व्यस्त असायचे, तेव्हा रमाबाई त्यांच्या अनुयायांना आणि कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळायच्या. त्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या प्रेमाने आणि आदराने वागवायच्या. यामुळे बाबासाहेबांच्या कार्याला एक प्रकारचा मोठा कौटुंबिक आधार मिळाला. रमाबाईंचे 1935 मध्ये आजारपणामुळे निधन झाले. त्याचा बाबासाहेबांना मोठा धक्का होता. रमाबाईंची साथ आणि त्याग यामुळेच बाबासाहेब घडले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

समता, शिक्षण अन् राजकीय सक्षमीकरणावर भर

बाबासाहेबांचे जीवन म्हणजे सामाजिक अन्यायाविरोधातील एक शाश्वत लढा होता. त्यांनी अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार व राजकीय सक्षमीकरण या 3 प्रमुख मुद्यांवर त्यांचे कार्य विस्तारलेले आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरोधात मोठ्या ताकदीने आवाज उठवला. त्यांनी सामाजिक उतरंडीतील तळाला असणाऱ्या लोकांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्यासाठी ते आयुष्यभर झगडले. 1927 साली त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या माध्यमातून त्यांनी अस्पश्य समाजाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. 1930 साली त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. या माध्यमातून त्यांनी दलितांसाठी मंदिराची दारे उघडी केली. या आंदोलनांनी सवर्ण समाजात मोठी खळबळ माजली. पण बाबासाहेब नमले नाहीत.

आंबेडकरांचा शिक्षणावर दृढ विश्वास होता. त्यांचे म्हणणे होते की, शिक्षण हेच स्वातंत्र्याचे आणि प्रगतीचे साधन आहे. त्यांनी अस्पृश्य व मागासवर्गीयांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. 1924 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. याद्वारे त्यांनी दलित समाजाला शिक्षण, रोजगार व सामाजिक सन्मान मिळवून दिला. दलितांच्या मुलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. बाबासाहेब एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी दलितांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक पाऊले उचलली. त्यांनी अस्पृश्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी ब्रिटिश सरकारशी संवाद साधला. 1932 सालचा 'पुणे करार' त्यांच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरला.

तू चवदार तळे आणलेस ताळ्यावर

बाबासाहेब आंबेडकर जन्मतःच चंद्र-सूर्याचे तेज घेऊन जन्मले होते. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह त्यांच्या आयुष्यातीलच नव्हे तर जातीपातीने बरबटलेल्या भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग होता. त्या काळी अस्पृश्यांना या तळ्याचे पाणी भरण्यास मनाई होती. हे मानवतेला धरून नव्हते. त्यामुळे बाबासाहेबांनी हे तळे खुले करण्यासाठी प्रस्थापितांविरोधात दंड थोपटले. त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. खरे तर महाडचा लढा हा पाणी प्राशन करण्याचा किंवा त्याला स्पर्श करण्याचा नव्हता. तर तो अस्पृश्यता निवारण्याचा संघर्ष होता. आपली समग्र अस्मिता जागृत करण्यासाठीचा लढा होता.

बाबासाहेबांनी केलेल्या या दिव्य कार्याबद्दल कवी मनोहर म्हणतात,

तू चवदार तळे आणलेस ताळ्यावर

त्यातील पाण्याला शिकवलीस तू माणुसकीची बाराखडी

आणि सोडवलेस तू पाण्याला जातीयतेच्या शापातून

आता चवदार तळ्याचे पाणी

गात आहे तुझ्या थोरवीची गाणी.


चवदार तळ्याच्या मुद्यावर बाबासाहेबांचे 4 कळीचे प्रश्न?

चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी बाबासाहेबांनी खालील 4 कळीचे प्रश्न उपस्थित केले.

मी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले. या तळ्यात सगळ्यांना पाणी पिण्याचा अधिकार आहे, पण तो आम्हाला का नाही?

तळ्याकाठी राहणाऱ्या लोकांच्या घरातील गाई, म्हशी, कुत्रे, मांजर, शेळी, घोडा या सर्व प्राण्यांना या तळ्याचे पाणी पिण्याची परवानगी आहे. मग आम्हाला का नाही?

या तळ्याच्या बाजूला दलितांची वस्ती आहे. त्यांच्या घरातील प्राणी या तळ्याचे पाणी प्यालेले चालतात, मग आम्हाला बंदी का?

मी स्पर्श केलेले पाणी अपवित्र झाले म्हणून तुम्ही गोमूत्र आणून पाण्यात टाकले, तर ते पवित्र होईल का?

बाबासाहेबांच्या या चारही प्रश्नांची उत्तरे सनातन्यांकडे नव्हती. त्यामु्ळे त्यांनी 20 मार्च 1927 च्या चवदार तळ्याचा सत्याग्रहापासून पुढील 3 दशके बाबासाहेबांच्या किर्तीच्या लाटा एकामागून एक अशा सर्व देशभर पसरल्या.

मनुस्मृतीचे दहन करून कुप्रथांवर लत्ताप्रहार

मनुस्मृती दहन हा बाबासाहेबांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा क्षण होता. मनुस्मृती हा समग्र मानव जातींमध्ये भेदाभेद करणारा, मानवी समाजाला वर्ग, वर्ण व जाती भेदांमध्ये विभागणारा, दलितांवर अन्याय करण्याची परवानगी देणारा ग्रंथ होता. त्यामुळे बाबासाहेबांनी संबंध मानवी जीवन बंधमुक्त करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन केले. त्याद्वारे त्यांनी दलितांसाठी मानवी कल्याण व सर्वांगीण विकासाचा नवा मार्ग खुला केला.

याविषयी कवी मनोहर म्हणतात,

मनुस्मृतीच्या थडग्यावर उभारलास तू,

नव्या मानवी भारताचा विजयस्तंभ,

तुझ्या मशालींच्या झंझावातात पेटू लागला,

वयस्कर वर्णसंस्थेचा अन्याय महाल.


काळाराम मंदिर सत्याग्रह

नाशिकमधील काळाराम मंदिर हे पंचवटी परिसरात असलेले एक प्राचीन आणि सुप्रसिद्ध मंदिर आहे. तिथे काळ्या दगडातील श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या विलक्षण मूर्ती आहेत. त्या काळी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जायचा. समाजाला धार्मिक आणि सामाजिक स्तरावर उपेक्षित ठेवले जायचे. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या या जाचक प्रथेला आव्हान देण्यासाठी काळाराम मंदिर सत्याग्रहाची निवड केली. त्यानुसार 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर सत्याग्राची सुरुवात झाली.

बाबासाहेबांनी यासाठी व्यापक तयारी केली होती. त्यांनी नाशिक येथे मोठी परिषद आयोजित केली, ज्यामध्ये हजारो अस्पृश्यांनी भाग घेतला. या परिषदेत मंदिराच्या दिशेने शांततापूर्ण मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ठरल्याप्रमाणे, दुपारी 3 वाजता हजारो सत्याग्रही एकत्र जमले. त्यांनी शिस्तबद्ध रीतीने मंदिराच्या दिशेने मिरवणूक काढली. ही मिरवणूक इतिहासातील एक अभूतपूर्व घटना होती, असे बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी नमूद केले आहे.

सत्याग्रहापूर्वी बाबासाहेबांनी मंदिर व्यवस्थापकांना लेखी सूचना दिली होती की, जर अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला, तर ते सत्याग्रह करतील. मात्र, मंदिर प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला, आणि यामुळे सत्याग्रहाला अधिक बळ मिळाले. बाबासाहेबांनी हा लढा अहिंसक मार्गाने पुढे नेण्याचा आग्रह धरला. त्यानुसार सत्याग्रहींनी मिरवणुकीत शिस्त व संयम राखला. यामुळे या आंदोलनाला अधिक नैतिक बळ मिळाले. भाऊराव गायकवाड, अमृतराव रानखांब आणि पी. एन. राजभोज आदी बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.

हिंदू समाजाला आव्हान

बाबासाहेब 2 मार्च 1930 रोजीच्या आपल्या भाषणात म्हणाले, "काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला दिलेले आव्हान आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आम्हाला पिढ्यानपिढ्या हक्कांपासून वंचित ठेवले. आता हिंदू मन आम्हाला मानव म्हणून स्वीकारायला तयार आहे की नाही, याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."

या सत्याग्रहावेळी सवर्ण व अस्पृश्यांमध्ये रामनवमीला रामाचा रथ दोन्ही समाजांनी एकत्र ओढण्याचा समझोता झाला. बाबासाहेब आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. मात्र, पूर्वनियोजित कटानुसार सवर्णांनी अस्पृश्यांना रथाला हात लावण्यापूर्वीच रथ पळवला. यामुळे बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला, आणि सवर्णांचा खोटा समझोता उघड झाला. यावेळी झालेल्या दंगलीत अनेकजण जखमी झाले.

काळाराम सत्याग्रह 1930 ते 1935 पर्यंत चालला. या काळात बाबासाहेब गोलमेज परिषदेसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने प्रत्येक टप्प्यावर उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या सहकाऱ्यांनी हा लढा नेटाने पुढे नेला. महात्मा गांधी यांनी आपल्या यंग इंडिया वृत्तपत्रात या सत्याग्रहाचा उल्लेख केला. त्यात त्यांनी सवर्णांना अस्पृश्यांना प्रवेश देण्याचे आवाहन करण्याऐवजी आंदोलन थांबवण्याचा सल्ला दिला. यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्याशी प्रचंड मतभेद झाल्याचा उल्लेख आहे.

सत्याग्रहाचा सामाजिक प्रभाव

मंदिर प्रवेश हा केवळ धार्मिक मुद्दा नसून, सामाजिक समतेचा प्रश्न होता. त्यामुळे काळाराम मंदिर सत्याग्रहाने दलित समाजामध्ये प्रचंड जनजागृती झाली. अस्पृश्यांना आपल्या हक्कांसाठी एकत्र येण्याचे बळ मिळाले. एवढेच नाही तर हिंदू समाजालाही अस्पृश्यतेच्या प्रश्नावर आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले. या आंदोलनाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीला नवी दिशा मिळाली. हा सत्याग्रह तात्काळ मंदिर प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला नाही. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व मंदिरे सर्वांसाठी खुली झाली. त्यात काळाराम मंदिराचाही समावेश होता.

बाबासाहेबांनी 1935 साली काळाराम सत्याग्रह स्थगित केला. कारण त्यांना असे वाटले की मंदिर प्रवेशापेक्षा दलित समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांचे निराकरण अधिक महत्त्वाचे आहे. ते अमरावती येथील एका सभेत त्यांनी समाजाला "तुमची रामावर खरी भक्ती असेल, तर तुम्हाला मंदिरातच प्रवेश का हवा?" हा प्रश्न विचारला. त्यानंतर समाज त्यांच्या पाठिशी अधिक ठामपणे उभा राहिला.

गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,

कवी वामनदादा कर्डक यांनी चवदार तळे आणि काळा राम मंदिराचा संघर्ष आपल्या लेखनीतून फार मार्मिकपणे विषद केला आहे. ते म्हणतात,

गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,

उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,

आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही।।

आघाडीवर होता जरी नव कोटीचा राजा,

उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

माणसास पाणी पाजा, माणसास पाणी,

निनादत होती सारी भिमाचीच वाणी।।

इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,

उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।


महात्मा गांधींसोबत पुणे करार

पुणे करार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील एक ऐतिहासिक करार होता. तो दलित समाजाच्या राजकीय हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. 1932 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेत ब्रिटिश सरकारने कम्युनल अवॉर्ड जाहीर केला. त्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव होता. याला गांधीजींनी कडाडून विरोध केला. त्यांनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले.

बाबासाहेबांना दलितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ हवे होते. पण गांधीजींच्या उपोषणामुळे त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. त्यांच्यावर मोठा दबाव आला. त्यामुळे दलित समाजाच्या व्यापक हितासाठी बाबासाहेबांनी समझोता केला. 24 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा तुरुंगात पुणे करार झाला. त्यायानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघात 148 जागा देण्यात आल्या. दलितांना विधानसभांमध्ये प्रतिनिधित्व आणि शिक्षण-रोजगारात विशेष तरतुदी मिळाल्या.

या कराराने दलितांना राजकीय सक्षमीकरणाची संधी मिळाली, परंतु स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाल्याने बाबासाहेब पूर्णपणे समाधानी नव्हते. तरीही, गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी आणि समाजाच्या एकतेसाठी त्यांनी हा करार स्वीकारला. पुणे कराराने दलित चळवळीला नवीन दिशा दिली आणि सामाजिक-राजकीय जागृतीला चालना दिली. या करारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "येरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.

बाबासाहेब आणि शेतकऱ्यांच्या समस्या

बाबासाहेब आंबेडकर केवळ 20 व्या शतकातील एक महान व्यक्तिमत्त्वच नव्हते, तर समाज क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी एक विराट शक्ती होते. आपल्या तत्त्वज्ञानातून त्यांनी दीन, दलित, शोषित, कष्टकरी समाजाला क्रांतीची नवी दिशा दिली. म्हणून त्यांना एक प्रखर बुद्धी प्रामाण्यवादी व कृतीशील विचारवंतही म्हणतात. बाबासाहेब केवळ घटनाकार, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, प्रखर देशभक्त, कायदेपंडीत, प्राध्यापक व वकीलच नव्हते. तर ते जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे थोर क्रांतिकारकही होते.

बाबासाहेबांनी शेतीसंबंधी प्रश्नांचा चिकित्सक अभ्यास केला. त्यावर अनेक शोधनिबंध लिहिले. लोकसंख्या वाढीमुळे जमिनीचे किंवा शेतीचे तुकडीकरण होऊन धारणक्षेत्र लहान झाल्यामुळे जमिनी पडीक बनल्या. त्याचा परिणाम म्हणून भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. अन्न-धान्याचे उत्पादन घटले. पर्यायाने उपासमारीचे प्रमाण वाढले. अशा तुकडीकरणावर डॉक्टर बाबासाहेब उपाय सांगतात. ते म्हणतात, शेतकऱ्यांनी आल्या मुलांना शेतीऐवजी इतर छोट्या-मोठ्या उद्योग धंद्याकडे वळवले पाहिजे. त्यामुळे शेतीवरचा बोजा कमी होईल. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर जमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणे गरजेचे आहे.

संविधान निर्मितीचे 8 रंजक किस्से

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीतील योगदान केवळ त्यांच्या बौद्धिक प्रभुत्वाचे आणि सामाजिक न्यायावरील निष्ठेचे प्रतीक नाही, तर त्यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी आणि मानवीय प्रसंगांचा संगम आहे. संविधान समितीचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे नेतृत्व करताना त्यांच्या कार्याशी निगडित अनेक किस्से त्यांचे समर्पण, धैर्य आणि दूरदृष्टी दर्शवतात. खाली वाचूया बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीशी संबंधित काही उल्लेखनीय किस्से...

1. "मी एका हाताने संविधान लिहितोय, दुसऱ्या हाताने मृत्यूशी लढतोय"

संविधान निर्मितीच्या काळात बाबासाहेब मधुमेह आणि उच्च रक्तदाब आदी गंभीर आजारांनी त्रस्त होते. त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी मसुदा समितीचे काम थांबवले नाही. एकदा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, “मी एका हाताने संविधान लिहित आहे आणि दुसऱ्या हाताने मृत्यूशी लढत आहे.” हा प्रसंग त्यांच्या अथक समर्पणाचे आणि संविधानाप्रती असलेल्या जबाबदारीचे द्योतक आहे. रात्री उशिरापर्यंत ते मसुद्यावर काम करायचे, आणि त्यांच्या या मेहनतीमुळे संविधानाचा भक्कम पाया तयार झाला.

2. 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास

बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार करण्यापूर्वी जगभरातील सुमारे 60 देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास केला. एकदा संविधान सभेतील चर्चेत काही सदस्यांनी त्यांच्या मसुद्यावर प्रश्न उपस्थित केले. तेव्हा बाबासाहेबांनी शांतपणे उत्तर दिले, “मी अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांच्या संविधानांचा अभ्यास केला आहे. पण मी भारताच्या मातीतील गरजा आणि येथील लोकांचे दुख लक्षात घेऊन हा मसुदा तयार केला आहे.” हा किस्सा त्यांच्या बौद्धिक प्रभुत्व आणि भारताच्या सामाजिक वास्तवाशी असलेल्या नात्याचे दर्शन घडवतो.

3. अस्पृश्यता नष्ट करण्याची ऐतिहासिक तरतूद

संविधानातील कलम 17, ज्याने अस्पृश्यता नष्ट केली, हे बाबासाहेबांचे वैयक्तिक आणि सामाजिक लढ्याचे फलित आहे. एकदा मसुदा समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी या तरतुदीवर प्रश्न उपस्थित केले, कारण त्यांना वाटत होते की यामुळे हिंदू समाजात असंतोष पसरेल. बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले, “जो समाज एका मोठ्या वर्गाला माणूस म्हणून वागवत नाही, तो समाज प्रगती करू शकत नाही. अस्पृश्यता नष्ट करणे हा माझा लढा आहे, आणि संविधानात ही तरतूद असेलच.” हा प्रसंग त्यांच्या सामाजिक न्यायावरील अटळ बांधिलकी दर्शवतो.

4. महिलांच्या हक्कांसाठीचा आग्रह

बाबासाहेबांनी संविधानात महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी विशेष प्रयत्न केले. एकदा संविधान सभेत कलम 14 (समानतेचा हक्क) आणि कलम 15 (भेदभाव निषेध) यांच्या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी लिंगभेदाच्या मुद्द्यावर सौम्य दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले, “जर आपण महिलांना समान हक्क देऊ शकत नाही, तर आपण खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन करू शकणार नाही.” त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे संविधानात महिलांसाठी क्रांतिकारी तरतुदी समाविष्ट झाल्या. हा किस्सा त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.

5. "संविधान यशस्वी होण्यासाठी नैतिकता हवी"

26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत अंतिम भाषण करताना बाबासाहेबांनी एक गहन विचार मांडला. तो आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितले, “संविधान कितीही चांगले असले, तरी ते यशस्वी होण्यासाठी लोकांचे नैतिक मूल्य आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे.” एकदा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना खासगीत सांगितले, “मी संविधान लिहिताना प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांचा विचार केला, पण त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे.” हा प्रसंग त्यांच्या संविधानाविषयीच्या गहन दृष्टिकोनाचे आणि जबाबदारीचे दर्शन घडवतो.

6. आरक्षणावरील चर्चेतील निर्भयता

दलित आणि मागासवर्गीयांसाठी कलम 15(4) आणि 16(4) मधील आरक्षणाच्या तरतुदींवर संविधान सभेत तीव्र विरोध झाला. काही सदस्यांनी याला "भेदभाव" ठरवले. बाबासाहेबांनी निर्भयपणे उत्तर दिले, “ज्या समाजाने पिढ्यानपिढ्या एका वर्गाला शिक्षण आणि संधीपासून वंचित ठेवले, त्या समाजाला समता आणण्यासाठी विशेष तरतुदी आवश्यक आहेत. आरक्षण हा भेदभाव नाही, तर समतेचा मार्ग आहे.” या प्रसंगातून त्यांचा तर्कशुद्ध आणि सामाजिक न्यायावरील दृढ विश्वास दिसून येतो.

7. रात्री उशिरापर्यंत काम

बाबासाहेब संविधानाचा मसुदा तयार करताना रात्री उशिरापर्यंत काम करायचे. एकदा त्यांचे सहकारी टी. टी. कृष्णमचारी यांनी त्यांना विचारले, “डॉ. साहेब, तुम्ही इतके तास का काम करता?” बाबासाहेब हसत म्हणाले, “हा मसुदा फक्त कागदावरचे शब्द नाहीत, हा भारताच्या कोट्यवधी लोकांचा भविष्याचा पाया आहे. त्यात चूक होता कामा नये.” हा किस्सा त्यांच्या संपूर्ण समर्पणाचे आणि तपशीलाकडे लक्ष देण्याच्या वृत्तीचे द्योतक आहे.

8. मी हॅकनीचा घोडा आहे

संविधान सभेत एकदा काही सदस्यांनी बाबासाहेबांच्या मसुद्यावर टीका केली. त्यांच्यावर काँग्रेसच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. यावर बाबासाहेबांनी ठामपणे उत्तर दिले, “मी कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. मी हॅकनीचा घोडा आहे, जो मालकाच्या इच्छेनुसार चालत नाही, तर स्वतःच्या मार्गाने ध्येय गाठतो.” हा प्रसंग त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे आणि दबावापुढे न झुकण्याच्या स्वभावाचे उदाहरण आहे.

14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वीकारला बौद्ध धम्म

बाबासाहेबांनी ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथील एका परिषदेत मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही, असे घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या 3 लाख अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. कुशीनारा येथील महास्थवीर चंद्रमणी यांनी त्यांना दीक्षा दिली.

बाबासाहेब याविषयी एकेठिकाणी म्हणतात, मला बौद्ध धम्म आवडतो, कारण, कोणत्याही धर्मात जी 3 तत्त्वे सापडत नाहीत, ती मला या धम्मात सापडतात. बौद्ध धम्म हा नीतीवर आधारित आहे. तो मला प्रज्ञा, शील व करुणा ही 3 तत्त्वे शिकवतो. मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही. त्याला मन आहे. त्या मनाला विचारांचे खाद्य पाहिजे. धर्म मनुष्याच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. हिंद धर्माने पददलितांच्या उत्साहावर पाणी ओतले. त्याच्या मनावर आघात केला. म्हणून मला धर्मांतर करण्याची गरज वाटली.

बौद्ध धम्म स्वीकारताना बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांस निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, बौद्ध धम्माची प्रतिष्ठा सांभाळण्याची मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर पडली आहे. तु्म्ही कडकपणे आणि उदात्तपणे तत्त्वे पाळली नाहीत, तर महारांनी बौद्ध धर्माचे वाटोळे केले असे जग म्हणेल.

आता पाहू बाबासाहेबांचे अखेरचे 24 तास

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम डॉ. सविता भीमराव आंबेडकर अर्थात माईसाहेबांनी (बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी) आपल्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या पुस्तकात नमूद केला आहे. त्यानुसार, बाबासाहेब 5 डिसेंबर रोजी म्हणजे आपल्या निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी 8.30 च्या सुमारास उठले

माईसाहेबांनी त्यांना चहासाठी उठवले. तिथेच दोघांनी चहा घेतला. तेवढ्यात नानकचंद रट्टू (स्वीय सहाय्यक) तिथे धडकले. त्यांनीही चहा घेतला. त्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब व डॉक्टर मालवणकर या तिघांनी एकत्र न्याहारी केली. त्यानंतर बाबासाहेबांनी वर्तमानपत्रांवर नजर टाकली. त्यानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांना औषधी दिली. त्यानंतर त्या स्वयंपाकघराच्या दिशेने गेल्या. तिकडे बाबासाहेब व मालवणकर बराचवेळ गप्पा मारत बसले होते.

5 डिसेंबर दुपारी 12.30 वा.

दुपारी 12.30 च्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावण्यास गेल्या. तेव्हा बाबा लायब्ररीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावणा लेखण करत होते. माईसाहेब त्यांना जेवण्यासाठी घेऊन आल्या. जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी आराम केला. त्यानंतर माईसाहेब खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबर रोजी रात्री विमानाने मुंबईला जाणार होते. त्यांच्यासोबत मालवणकर होते. दुपारी 2.30 च्या सुमारास माईसाहेब घरी परतल्या. त्यानंतर 5.30 च्या सुमारास मालवणकर आले. त्यावेळी बाबासाहेब रागात होते.

5 डिसेंबर रोजी रात्री 8 वा.

5 डिसेंबर रोजी रात्री 8 वा. बाबासाहेबांची जैन धर्मगुरू व त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांशी पूर्वनियोजित भेट होती. बाबासाहेब या शिष्टमंडळासोबत चर्चा करत होते. 6 डिसेंबर रोजी जैनांचे संमेलन भरणार होते. त्यात जैन मुनींशी चर्चा करन जैन व बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घ्यावा असा आग्रह जैन शिष्टमंडळाने धरला होता. ही चर्चा सुरू असताना मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. नंतर जैन धर्मिय शिष्टमंडळही निघून गेले. तत्पूर्वी त्यांनी त्या शिष्टमंडळाला दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चर्चेस येण्याचे निमंत्रण दिले. नंतर त्यांनी शांतपणे बुद्धवंदना म्हटली.

बाबासाहेबांनी रात्री थोडेसेच जेवण केले. ते माईसाहेबांचे जेवण होईपर्यंत तिथेच बसले. त्यावेळी ते चलो कबीर तेरा भवसगर डेरा, हा दोहा गुणगणत होते. त्यानंतर काठीच्या मदतीने ते आपल्या बेडरुमकडे गेले. त्यावेळी त्यांच्या हातात काही ग्रंथ होते. जाताना त्यांनी नानकचंद रट्टू यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेची प्रत व एस एम जोशी, आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. हे काम करून रट्टू आपल्या घरी गेले.

रात्री 11.30 च्या सुमारास झोपी गेले

माईसाहेब आपल्या पुस्तकात लिहितात, बाबासाहेब 5 डिसेंबर रोजी रात्री बराचवेळ लिहित व वाचत बसले होते. त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत अखेरची सुधारणाही केली. त्यानंतर 11.30 च्या सुमारास ते झोपी गेले. ही रात्र त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली.

मी हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण...

6 डिसेंबर 1956 रोजी रोजी माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून बाबासाहेबांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेल्या. तेव्हा घड्याळात 7 - साडेसात वाजले असतील. माईसाहेब लिहितात, खोलीत गेल्यानंतर पाहिले की, साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी त्यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. पण त्यांची काहीच हालचाल दिसली नाही. मला वाटले, त्यांना गाढ झोप लागली असेल. नंतर मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलेच नाही... बाबासाहेबांचे झोपेतच महापरिनिर्वाण झाले होते.


0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा