जगाच्या इतिहासात अनेक क्रांतिकारकांनी आपली धाडसी कृती व प्रखर विचारांनी स्वातंत्र्य, समता व न्यायाची मशाल पेटवली. त्यांचा लढा एका देशासाठी स्वाभिमान व प्रेरणेचा झरा बनला, तर दुसऱ्या देशासाठी शत्रूत्वाचे कारण ठरला. हे क्रांतिकारक आपल्या मातृभूमीत नायक म्हणून पूजले गेले. पण विरोधकांनी त्यांना खलनायक ठरवले. चे गेव्हारा हे असेच विरोधाभासांनी नटलेल्या एका गाथेचे नायक होते. त्यांचे नाव जगातील काही लोकांसाठी क्रांतीचे, तर काही लोकांसाठी दहशतीचे प्रतीक बनले.
चला तर मग आज पाहूया अर्जेंटिनाच्या एका अशा मुलाची कथा जो बालपणी अस्थमाचा रुग्ण होता, पण तरुणपणी अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनला. चला पाहूया गरिबांच्या हृदयात बदल अन् क्रांतीची ज्योत पेटवणारे कोण होते चे गेव्हारा?
प्रथम पाहू चे गेव्हारा यांच्या फोटोचा किस्सा
तरुणपणी चे गेव्हारा हे नाव जगातील काही लोकांसाठी क्रांतीचे, तर काही लोकांसाठी दहशतीचे प्रतिक बनले. ज्या लोकांनी हे नाव ऐकले नसेल, त्यांनी किमान त्यांचा एकतरी फोटो पाहिला असेल. डोक्यावर गोल चपटी टोपी, चेहरा किंचित झुकलेला व नजर क्षितिजाकडे असलेला चे गेव्हारा यांचा फोटो छापून जगात किती टी-शर्ट विकले गेले, खरेदी केले गेले किंवा घातले गेले याचे कोणतेही गणित नाही.
1960 साली क्युबाच्या क्रांतीला 1 वर्ष पूर्ण झाले होते. तेव्हा 4 मार्च रोजी एक दुर्घटना घडली. क्युबाच्या हवाना समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या फ्रेन्च 'ला कॉब्रा' या मालवाहू जहाजात स्फोट झाला. या दुर्घटनेत 100 च्या आसपास लोक मारले गेले. फिडेल व तत्कालीन सरकारने या घटनेमागे अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएचा हात असल्याचा आरोप केला.
या काळात चे गेव्हारा क्युबाचे उद्योगमंत्री होते. त्यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन स्थिती नियंत्रणात आणली. 5 मार्च रोजी फिडेल कॅस्ट्रो यांनी हवानात एक मोठा मोर्चा काढला. ज्या ठिकाणी मृतांना दफन करण्यात आले त्याच दफनभूमीवर त्यांनी पहिल्यांदा 'मातृभूमी किंवा मृत्यू' हे गाजलेले शब्द उच्चारले. या शोकसभेत फिडेल यांचा अल्बर्टो कोर्दा नामक फोटोग्राफर जमलेल्या मान्यवरांना आपल्या कॅमेऱ्यात टिपत होता.
अल्बर्टोची नजर चारही दिशांना फिरत एकेका व्यक्तीला टिपत होती. त्याचवेळी त्याला काही सेकंदासाठी चे गेव्हारा दिसला. चे गेव्हाराच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे भाव पाहून त्याने थोडाही वेळ न दवडता तो क्षण कॅमेऱ्यात टिपला. त्याने 2 फोटो काढले. एका फोटोत चे गेव्हारा यांच्या बाजूला एक व्यक्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला एक झाड दिसत आहे. दुसऱ्या फोटोत चे यांच्या मागे एक माणूस दिसत आहे.
अल्बर्टो यांच्या लक्षात आले की, आपण एक 'आयकॉनिक' फोटो टिपला आहे. त्याने पुढे चे यांचा पहिल्या फोटोतील अनावश्यक गोष्टी म्हणजे माणूस व झाड काढून टाकले. मूळ फोटोला काहीसे तिरके केले. त्यानंतर त्याने तो फोटो फ्रेम करून भिंतीवर लावले. हाच फोटो आज तुमच्या आमच्या टी-शर्ट व इतर गोष्टींवर झळकतो.
आईनेच पाजले सामाजिक न्यायाचे बाळकडू
चे गेव्हारा यांचे पूर्ण नाव अर्नेस्टो राफेल गेव्हारा दे ला सेर्ना असे होते. त्यांचा जन्म 14 जून 1928 रोजी अर्जेंटिनाच्या रोसारियो शहरात झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांच्यावर आयरिश व स्पॅनिश वंशाचा प्रभाव होता. त्यांचे वडील अर्नेस्ट गेव्हारा लिंच एक अभियंता होते, तर त्यांची आई सिलिया दे ला सेर्ना एक प्रगत विचासरणीच्या महिला होत्या. त्यांचे चे यांच्या वैचारिक विकासावर विशेषतः त्यांच्या सामाजिक न्याय व समानतेच्या विचारांवर मोठा प्रभाव पडला.
चे गेव्हारा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आल्टा ग्रेसिया व कॉर्डोबा येथे झाले. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांचे घर पुस्तकांनी भरलेले होते. त्यांनी मार्क्स, लेनिन यांच्या साहित्यासह तत्वज्ञान व इतिहास यासारख्या विषयांचा सखोल अभ्यास केला. 1947 साली त्यांनी ब्युनोस आयर्स विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर 1953 साली त्यांनी वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.
वैद्यकीय शिक्षण घेताना चे यांनी लॅटिन अमेरिकेतील विविध देशांत मोटारसायकलवरून प्रवास केला. त्याचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. या प्रवासात त्यांनी गरिबी, असमानता व साम्राज्यवादाचे परिणाम जवळून पाहिले. या अनुभवांनी त्यांच्यात सामाजिक सुधारणांची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा पाया रोवला गेला. त्यांचा हा दुचाकीवरील प्रवास द मोटारसायकल डायरीज या पुस्तकातून प्रसिद्ध झाला. हा प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
जिथे क्रांती तिथे चे गेव्हारा
फ्रान्सच्या 1968 सालच्या विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनात चे गेव्हारा यांचा चेहरा दिसला होता. डॅनियाल मार्क या विद्यार्थी सेनेच्या नेत्याने 'बोलिव्हियन डायरी'वर असलेल्या चे यांचा चेहरा वापरून तत्कालीन सरकारची झोप उडवली होती. यानंतरही अनेक चळवळी, मोर्चे आदींमध्ये चे यांचा चेहरा दिसला. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की, जिथे लोकांच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित होत असते तिथे चे गेव्हारा यांचे अस्तित्व मानले जाते.
आई हे जग तर्क अन् विवेकाने चालत नाही
चे गेव्हारा यांची जन्मभूमी अर्जेंटिना होती. पण आपण आपल्या स्टोरीची सुरुवात करू त्यांच्या कर्मभूमीतून म्हणजे रिपब्लिक ऑफ ग्वाटेमाला या मध्य अमेरिकेतील एका छोट्याशा देशातून... अमेरिकेला चिकटून असणाऱ्या या देशात 1954 साली सत्तांतर झाले. तेव्हा चे गेव्हारा अवघ्या 26 वर्षांचे होते. तेव्हा ते ग्वाटेमालातच क्रांतीचा शोध घेत फिरत होते. क्रांतीच्या या अनुभवाची त्यांच्या जीवनावर अशी छाप पडली की, त्यांनी आपल्या आईला पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले, 'आई, हे जग तर्क व विवेकाने चालत नाही याची मला आता पूर्ण खात्री झाली आहे.'
अमेरिकेने पाडले ग्वाटेमालाचे सरकार
ग्वाटेमालातील सत्तांतराचा अमेरिकेशी संबंध होता. अमेरिकन गुप्तहेर संघटनेने (सीआयए) ग्वाटेमालाचे सरकार पाडण्यासाठी एक गुप्त मोहीम राबवली होती. त्यावेळी ग्वाटेमालात युनायटेड फ्रूट नामक एक अमेरिकन कंपनी कार्यरत होती. केळीचा व्यापार करणाऱ्या या कंपनीने प्रथम होंडूरास व त्यानंतर ग्वाटेमालासह लॅटीन अमेरिकेच्या जवळपास एक डझन देशांना आपले गुलाम बनवले होते.
हुकूमशाही व भ्रष्ट सरकारच्या मदतीने या कंपनीने या देशांतील एका मोठ्या भूभागावर कब्जा मिळवला होता. त्यानंतर तिथे फळांची शेती सुरु केली होती. त्यातून या कंपनीचे स्वतःचे उखळ पांढरे होत होते, पण त्यामुळे सर्वसामान्य जनतेची उपासमार सुरू झाली होती. त्यांच्याकडे ना जमीन उरली होती ना शेतीचे हक्क... जवळपास 50 वर्षे सुरू असणाऱ्या या धंद्याला 1953 मध्ये चाप लागला.
ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष कर्नल हाकोबो अरबेन्झ गुझमॅन यांनी 1953 मध्ये देशात भूमी सुधारणा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला. यामुळे युनायटेड फ्रूट कंपनीचे साम्राज्य संकटात सापडले. यामुळे अमेरिकेने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि हाकोबो यांना सत्तेतून हटवले. त्यांच्या जागी अमेरिकेचे हितसंबंध जोपासणारे सरकार स्थापन केले.
चे गेव्हारा यांच्या मनात क्रांतीचे बिजारोपण कसे झाले?
ग्वाटेमालात हे जे काही घडले त्याचा चे गेव्हारा यांनी जवळून अभ्यास केला. त्यातून त्यांच्या मनात अमेरिकेविरोधात द्वेष निर्माण झाला. शस्त्र हाती घेतल्याशिवाय क्रांती निर्माण होऊ शकत नाही असे त्यांचे ठाम मत झाले. भविष्यात त्यांची भेट फिडेल कास्त्रो यांच्याशी झाली आणि त्यानंतर सशस्त्र क्रांतीचे एक मोठे युग सुरू झाले. चे गेव्हारा यांच्या मनात क्रांतीचे बिजारोपण कसे झाले याचा किस्साही फार रंजक आहे.
चे गेव्हारा लहान होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. ते जिथे राहत होते, तिथे फार गरीब लोक राहत होते. त्यात एक लंगडा व्यक्तीही राहत होता. तो कुत्र्यांनी ओढली जाणारी एक गाडी चालवत होता. एकेदिवशी कुत्री त्याची गाडी ओढत होते. तेवढ्यात काही मुलांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. ते त्याला दगड मारत होते. हे चित्र पाहून चे गेव्हारा यांना खूप राग आला. त्यांनी त्या मुलांना हुसकावून लावले.
पण ते पाहून त्या लंगड्या व्यक्तीला राग आला. त्याने चे यांना भरपूर शिवीगाळ केली. त्या दिवशी पहिल्यांदा चे गेव्हारा यांना वर्ग व्यवस्था म्हणजे काय ते समजले. चे सधन होते. पण तो लंगडा व्यक्ती व ती मुले एकाच वर्गाचे होते. तो वर्ग म्हणजे गरीब...
चे गेव्हारा यांना क्रांतीची विलक्षण ओढ होती. पण शस्त्रांशिवायची क्रांती त्यांना केव्हाच भावली नाही. कॉलेजमध्ये असताना काही मित्रांनी त्यांना आंदोलनात सोबत येण्याचा आग्रह धरला. पण चे गेव्हारा यांनी मी केवळ मार खाण्यासाठी मोर्चात येणार नाही असे त्यांना ठामपणे सांगितले. जिंकता येत नसेल, तर लढूच नका, हा त्यांचा सिद्धांत होता.'
गरीबी व गरिबांच्या वेदनांविरोधात लढा
चे गेव्हारा यांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले होते. ते डॉक्टर म्हणून एक सुखसंपन्न जीवन जगू शकले असते. पण, आजूबाजूच्या लोकांची गरिबी आणि शोषण पाहून त्यांनी मार्क्सवादाच्या क्रांतीचा खडतर मार्ग निवडला. महाविद्यालयीन जीवनात त्यांची मैत्री अल्बर्टो ग्रेनाडो यांच्याशी झाली. या दोघांनी मिळून एक नॉर्टन 500 सीसी मोटारसायकल विकत घेतली. या दुचाकीवरच त्यांनी चिली, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला आदी दक्षिण अमेरिकेतील संपूर्ण देश पायाखाली घातले. त्यांनी लोकांची गरिबी व हाल जवळून पाहिले. त्यातून सशस्त्र चळवळ हाच दक्षिण अमेरिका खंडातील समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे, असा त्यांचा ठाम समज झाला.
वेगवेगळ्या अनुभवांनी विचार प्रगल्भ झाले
चिलीमध्ये चुकिकिमाटा तांब्याच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांची विदारक परिस्थिती पाहून गेव्हारा संतापले होते. अटाकामा वाळवंटात एका छळलेल्या कम्युनिस्ट जोडप्याशी रात्री झालेल्या भेटीमुळेही ते संतापले. या जोडप्याकडे स्वतःची गोधडीही नव्हती. त्यांनी त्यांचे 'भांडवलशाही शोषणाचे थरथरणारे रक्तामांसाचे बळी' असे वर्णन केले. माचू पिच्चूला जाताना, दुर्गम ग्रामीण भागातील गरिबी पाहून ते थक्क झाले. तिथे शेतकरी श्रीमंत जमीनदारांच्या मालकीच्या जमिनीच्या छोट्या तुकड्यांवर जगत होते.
नंतरच्या प्रवासात, ग्वेरा कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या लोकांमधील सौहार्द पाहून विशेषतः प्रभावित झाले आणि म्हणाले, 'मानवी एकता आणि निष्ठेचे सर्वोच्च रूप अशा एकाकी आणि हताश लोकांमध्ये निर्माण होते.' चे गेव्हारा यांना या प्रवासात जग गरीब व श्रीमंत या 2 गटांत विभागले गेल्याची जाणीव झाली. गरीब प्रत्येक ठिकाणी भरडले जात होते. ते यासाठी अमेरिकन भांडवलदारांना जबाबदार मानत होते.
फिडेल कास्त्रो यांची भेट अन् सशस्त्र लढ्याला सुरूवात
चे गेव्हारा सर्वप्रथम ग्वाटेमालाला गेले. तिथे त्यांनी गरिबांच्या हक्कांसाठी लढा उभा केला. राष्ट्राध्यक्ष हाकोबो यांच्या सुधारणांमुळे गरिबांच्या स्थितीत सुधारणा होईल असा त्यांना विश्वास होता. पण अमेरिकेने त्यांचे सरकार पाडल्यामुळे या सुधारणांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. पण त्याचा फार फायदा झाला नाही. त्यामुळे चे यांना मेक्सिकोमध्ये पलायन करावे लागले. तिथे त्यांना काही क्युबन निर्वासित भेटले. त्यांच्या माध्यमातून ते फिडेल कास्त्रो यांच्या संपर्कात आले. ही भेट चे गेव्हारा यांच्यासाठी निर्णायक ठरली.
चे गेव्हारा व फिडेल कास्त्रो यांच्यात आकाश - पाताळाचे अंतर होते. चे गेव्हारा आग, तर फिडेल कास्त्रो शांत निथळ पाणी. पण या दोघांनाही क्रांतिची प्रचंड ओढ होती. फिडेल यांची क्युबात क्रांती करण्याची इच्छा होती. तेव्हा क्युबात बतिस्ताची हुकूमशाही होती. बतिस्ता यांना अमेरिकेचे समर्थन होते. फिडेल कास्त्रो यांना या हुकूमशहाची सत्ता उलथावून टाकायची होती.
फिडेल व चे गेव्हारा यांनी संयुक्तपणे क्युबन क्रांतीची पायाभरणी केली. दोघांनी एक सशस्त्र दल उभे केले. या दलाने बतिस्ताच्या नाकीनऊ आणले. हळू-हळू ही क्रांती एवढी मोठी झाली की, राष्ट्राध्यक्ष बतिस्ता यांना देश सोडून पळून जावे लागले. अशा प्रकारे क्युबात कास्त्रो यांचे कम्युनिस्ट अर्थात साम्यवादी शासन उभे झाले. त्यानंतर त्यांनी चे गेव्हारा यांच्या खांद्यावर बतिस्ता समर्थकांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी टाकली. या क्रांतीनंतर फिडेल यांनी या सर्वांना जेरबंद केले.
बतिस्ता समर्थकांना मृत्यूदंड
क्युबात एक प्राचीन किल्ला होता. ला कबाना असे त्याचे नाव होते. या किल्ल्याचा वापर तुरुंगासारखा केला जात होता. फिडेल कास्त्रो यांनी या किल्ल्याच्या कमांडरपदी चे गेव्हारा यांची नियुक्ती केली. त्यानंतर गेव्हारा यांनी एक युद्ध लवाद स्थापन केला. या लवादाने हजारो बतिस्ता समर्थकांना मृत्युदंड ठोठावला. या शिक्षेला आव्हान देता येत होते, पण स्वतः गेव्हारा या याचिकांवर फेरविचार करत होते. त्यामुळे शिक्षेला आव्हान देऊनही वेगळे असे काहीच होत नव्हते. त्यामुळे चे गेव्हारा यांचे विरोधक त्यांच्यावर हजारो लोकांचा बळी घेतल्याचा आरोप करतात.
चे गेव्हारा यांच्या दहशतीमुळे अनेकांनी क्युबाला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी काही जण अमेरिकेत स्थायिक झाले. या सर्वांनी गेव्हारा यांच्यावर क्युबात नरसंहार केल्याचा आरोप केला. पण क्युबन सरकारचा यासंबंधी स्वतःचा एक युक्तिवाद होता. त्यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर नाझींना शिक्षा देण्यासाठी न्यूरमबर्ग ट्रायल्समध्ये जी पद्धती वापरली गेली, तीच पद्धती या लोकांना शिक्षा देण्यासाठी वापरण्यात आली. कास्त्रो व गेव्हारा यांचा दावा होता की, ही जनतेची मागणी होती.
सत्य काहीही असले तरी चे गेव्हारा यांच्यावर लिहिण्यात आलेल्या अनेक पुस्तकांत, क्युबन क्रांतीने चे गेव्हारा यांना अत्यंत कठोर बनवल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः ते क्रांतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी कोणताही मार्ग न्यायोचित असल्याचे मानत होते. क्युबन क्रांती यशस्वी झाल्यानंतर चे यांनी मंत्री म्हणून काही वर्षे सरकारमध्ये काम केले. पण ते त्यात रमले नाही.
क्युबन क्रांतीनंतर भारतात आले?
फिडेल कास्त्रो यांनी चे गेव्हारा यांना आपल्या सरकारमध्ये उद्योग मंत्री केले. तसेच बँक ऑफ क्युबाच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती केली. 1959 मध्ये कास्त्रो यांनी त्यांना परदेश दौऱ्यावर पाठवले. ते भारतातही आले. येथे त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली. त्यावेळी नेहरूंनी त्यांना एक 'खुकरी' (चाकू) भेट म्हणून दिली. त्यानंतर ते जपानला गेले. तिथे अधिकाऱ्यांनी त्यांना एका युद्ध स्मारकाला भेट देण्याचा आग्रह धरला. पण त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, 'मी हिरोशिमाला जाईन, जिथे अमेरिकेने तब्बल 1 लाख निष्पाप जपानींची हत्या केली होती.'
या दौऱ्यानंतर चे गेव्हारा क्युबाला परतले. त्यांनी भूमी सुधार कायदा लागू केला. जमीनदारांच्या जमिनी छोट्या शेतकऱ्यांना वाटल्या. नव्या उद्योगधंद्यांची पायाभरणी केली. शिक्षण व आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले. पण त्यानंतरही क्युबन अर्थव्यवस्था रुळावर आली नाही. यासाठी काही जण कास्त्रो सरकारच्या धोरणांना दोष देतात. तर काही जण त्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरतात.
क्युबा सोव्हियत संघाकडे ओढला गेला
ते दिवस शितयुद्धाचे होते. अमेरिका साम्यवादी देशांना आपला शत्रू मानत होती. त्यामुळे क्युबा आपसूकच सोव्हियत संघाकडे झुकला गेला. सोव्हियत संघाने क्युबात आपली क्षेपणास्त्रे तैनात केली. हे अमेरिकेला सहन झाले नाही. त्यामुळे अमेरिकन सैनिकांनी क्युबावर हल्लाबोल करत कास्त्रो सरकार उलथावून टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. क्युबाचे क्षेपणास्त्र संकट काही वर्षांनी संपले. पण क्युबा अमेरिकेचा कायमस्वरुपी शत्रू बनला. क्युबावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले गेले. त्याचा फटका तेथील अर्थव्यवस्थेला बसला.
चे गेव्हारा क्युबा सोडून कांगोला गेले
काही वर्षांनी चे गेव्हारा यांनाही सरकारच्या कामकाजाचा उब आला. त्यांनी क्युबा सोडून कांगोला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढील काही वर्षे चे गेव्हारा जगाच्या पटलावरून अक्षरशः गायब झाले. त्यांनी आपली चिरपरिचित दाढी व केस कापले. स्वतःचा चेहरा - मोहरा बदलला. हे सर्वकाही अमेरिकेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केले गेले. कारण, चे गेव्हारा अमेरिकेसाठी एक अतिरेकी होते. त्यामुळे ते जिथे जातील तिथे अमेरिका त्यांचा पाठलाग करत होती.
अखेर बोलिव्हियन सैनिकांनी घेरले
चे गेव्हारा यांचा कांगोत क्रांती करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर ते दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हियाला गेले. बोलिव्हियात क्रांती झाली तर तिचे लोन आसपासच्या देशांतही पसरेल असा त्यांचा मानस होता. पण बोलिव्हियातही त्यांना फारसे समर्थन मिळाले नाही. बोलिव्हियाच्या साम्यवादी सरकारनेच नव्हे तर तेथील कामगार वर्गानेही त्यांची साथ दिली नाही. त्यानंतरही चे यांनी एक सशस्त्र दल तयार करून लष्कराविरोधात संघर्ष सुरू केला. त्यातच अमेरिकन गुप्तहेर संघटनेला (सीआयए) चे गेव्हारा बोलिव्हियात असल्याची खबर मिळाली. त्यांनी आपली एक टीम बोलिव्हियाला पाठवली. तिथे त्यांनी लष्कराला मदत करणे सुरू केले.
8 ऑक्टोबर 1967 रोजी बोलिव्हियन फौजेने चे गेव्हारा यांना चारही बाजूंनी घेरले. त्यामुळे चे यांच्यापुढे शरण जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. जॉन ली अँडरसन यांच्या पुस्तकात नमूद माहितीनुसार, बोलिव्हियन सैनिकांनी अटक करण्यापूर्वी चे गेव्हारा यांच्याकडील बंदुकीच्या गोळ्या संपल्या होत्या. त्यांच्या पायाची गोळ्यांनी अक्षरशः चाळणी झाली होती. त्यामुळे लष्करी जवान त्यांच्याजवळ पोहोचताच ते एकदम ओरडून म्हणाले, 'गोळीबार करू नका, मी चे गेव्हारा आहे. मी मृत्यूपेक्षा जीवंत राहून तुमच्या कामी येईन.'
घाबरटा मला गोळी घाल...
चे गेव्हारा यांना अटक करण्यात आली. पण बोलिव्हियन लष्कराचा त्यांना जीवंत सोडण्याचा कोणताही प्लॅन नव्हता. चे गेव्हारा यांना पकडणाऱ्या एका तुकडीच्या अधिकाऱ्याने नंतर सांगितले की, 'चे गेव्हारा यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांची स्थिती फारच वाईट होती. त्यांनी उठून एका सैनिकाकडे तंबाखू मागितला. ते तो तंबाखू आपल्या पाईपमध्ये भरून ओढू लागले. त्यावेळी दुसऱ्या एका अधिकाऱ्याने त्यांचा पाईप हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या अधिकाऱ्याला तो पाईप त्यांची आठवण म्हणून स्वतःकडे ठेवायचा होता. पण गेव्हारा यांनी लाथ मारून त्याला पळवून लावले. दुसऱ्या दिवशी चे यांना एका शाळेत नेण्यात आले. बोलिव्हियन अध्यक्षांनी त्यांच्या हत्येच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. पण चे गेव्हारा यांना गोळ्या घालणार कोण? हा प्रश्न सर्वांपुढे आ वासून उभा टाकला होता.
ही जबाबदारी मारियो टेरान नामक एका सैनिकाने घेतली. टेरान यांचे वय त्यावेळी अवघे 27 वर्षे होते. त्याचे अनेक सहकारी चे गेव्हाराविरोधात लढताना शहीद झाले होते. त्यामुळे तो गेव्हारा यांचा भयंकर द्वेष करत होता. त्याने दारुचे काही घोट घेतले आणि गेव्हारा यांच्या दिशेने आपले पिस्तुल तानले. त्यावेळी त्याचे हात थरथरत होते. हे पाहून गेव्हारा त्याला म्हणाले, घाबरटा गोळी घाल, तू केवळ एका माणसाला ठार मारत आहेस हे लक्षात ठेव.
हात छाटून क्युबाला पाठवण्यात आले
चे गेव्हारा यांना एकूण 9 गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे हात कापून क्युबाला पाठवण्यात आले. उर्वरित शरीर एका अज्ञात स्थळी दफन करण्यात आले. पण अशा निर्घृण मृत्यूमुळे चे गेव्हारा कायमचे अजरामर झाले. जगभरात त्यांच्या समर्थकांची एक मोठी फौज तयार झाली. ही फौज त्यांना आजही आदर्श मानते. क्युबात त्यांना हीरोचा दर्जा मिळाला. तर लॅटिन अमेरिकेच्या अनेक देशांत त्यांना संतांसारखे पूजले जाते. ते जगभरातील क्रांतीचे एक प्रतीक बनले. पण सुरूवातीला सांगितल्यानुसार त्यांचे टीकाकारही कमी नव्हते. क्युबा सोडून अमेरिकेला गेलेले लोक त्यांना एक क्रूर व्यक्ती मानत होते. त्यांना चे गेव्हारा यांच्या हत्येमुळे मोठा आनंद झाला.
चे गेव्हारा यांचे निवडक किस्से
1. द मोटारसायकल डायरी
चे गेव्हारा यांनी 1952 मध्ये आपला मित्र अल्बेर्तो ग्रानादोसोबत दुचाकीवरून लॅटिन अमेरिकेत तब्बल 8 हजार किलोमीटरचा प्रवास केला. वयाच्या 23 व्या वर्षी केलेला हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या प्रवासात त्यांनी अर्जेंटिना, चिली, पेरू, कोलंबिया व व्हेनेझुएलामधील सामान्य लोकांची गरिबी, त्यांच्यावर होणारा अन्याय आणि सामाजिक असमानता जवळून पाहिली.
चे गेव्हारा यांनी पेरूमध्ये एका कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत रुग्णांची सेवा केली आणि तिथल्या लोकांच्या दुःखाने त्यांचे मन हेलावले. हा अनुभव त्यांना क्रांतिकारक बनण्याच्या दिशेने घेऊन गेला. याच अनुभवांनी त्यांच्यात मनात क्रांतिकारी विचारांचा जन्म झाला. या प्रवासावर आधारित त्यांनी लिहिलेली 'द मोटारसायकल डायरी' ही जगप्रसिद्ध आहे. त्यावर एक चित्रपटही बनला आहे.
2. क्युबाच्या जंगलातील लढाई
1956 साली चे व फिडेल आपल्या 82 क्रांतिकारकांसह 'ग्रॅनमा' नामक एका छोट्या जहाजातून क्युबावर हल्ला करण्यासाठी निघाले. पण क्युबाचा हुकूमशहा फुलजेन्सियो बतिस्ता यांच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात फक्त 12 जण वाचले. त्यात चे व फिडेल होते. या दोघांनी सिएरा मेस्ट्राच्या जंगलात लपून राहून गनिमी काव्याने आपले युद्ध सुरू ठेवले. त्यात एकदा चे यांच्या पायाला गोळी लागली, तरीही त्यांनी स्वतःच आपली जखम बांधली आणि झुंज देत राहिले. त्यांचा हा जिद्दी स्वभाव सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यानंतर 2 वर्षांच्या संघर्षानंतर 1959 मध्ये त्यांनी बतिस्ताला सत्तेवरून पायउतार करत क्युबाला स्वतंत्र घोषित केले.
3. डॉक्टर ते क्रांतिकारक
चे गेव्हारा हे वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर होते. त्यांनी अर्जेंटिनामधील गरीब आणि आदिवासी रुग्णांवर उपचार केले. क्युबन क्रांतीतही ते सैनिकांच्या बरोबरीने युद्धात उतरत. तसेच लढताना जखमी सैनिकांवर उपचार करत. एकदा जंगलात लढताना चे यांना दम्याचा तीव्र झटका आला. पण त्यांनी स्वत:च्या तब्येतीची पर्वा न करता जखमी सैनिकांना प्रथमोपचार दिले. त्यांचा हा त्याग सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरला.
चे गेव्हारा हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर एक विचारवंत आणि लेखकही होते. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, विचारसरणी आणि क्रांतीच्या तत्त्वज्ञानावर आधारित अनेक लेख, डायऱ्या व पुस्तके लिहिली. त्यांचे लिखाण मार्क्सवादी तत्त्वज्ञान, सामाजिक न्याय व मानवतावाद यावर केंद्रित आहे. त्यांच्या लेखनातून त्यांचा संवेदनशील स्वभाव, क्रांतीबद्दलची तळमळ आणि सामान्य माणसांप्रती असलेली सहानुभूती प्रकर्षाने जाणवते.
4. मी मृत्युचा नव्हे क्रांतीच्या अमरत्वाचा विचार करतोय
क्युबाच्या क्रांतीनंतर चे गेव्हारा स्वस्थ बसले नाही. त्यांनी जगभरात क्रांती पसरवण्याचे स्वप्न पाहिले. ते बोलिव्हियात गेले. तिथल्या गरीब शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारविरोधात लढा सुरू केला. पण हा लढा अत्यंत कठीण होता. 8 ऑक्टोबर 1967 रोजी बोलिव्हियन सैन्याने त्यांना घेरले. पकडले गेल्यावर त्यांना एका शाळेत ठेवण्यात आले. तिथे एका सैनिकाने त्यांना विचारले, 'तुम्ही तुमच्या मृत्यूबद्दल विचार करताय का?' चे यांनी शांतपणे उत्तर दिले, 'नाही, मी क्रांतीच्या अमरत्वाबद्दल विचार करतोय.' त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
5. आता एक शेवटचा किस्सा...
मारियो टेरान यांनी चे गेव्हारा यांना ठार मारल्यानंतर जवळपास 30 वर्षे नोकरी केली. त्यानंतर ते रिटायर झाले. जग त्यांना विसरले होते. पण 2007 मध्ये त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. वृद्धापकाळामु्ळे टेरान यांना डोळ्यांचा आजार जडला होता. त्यांनी व्हेनेझुएलात उपचार घेतले. विशेष म्हणजे व्हेनेझुएलात त्यांच्यावर ज्या डॉक्टरांनी उपचार केले ते क्युबाचे होते. क्युबात आरोग्य सेवा मोफत आहे. एवढेच नाही तर क्युबा 20 हून अधिक देशांतही ही सेवा विनामुल्य पुरवतो. त्यात व्हेनेझुएलाचाही समावेश आहे. म्हणजे मारियो टेरान यांच्यावर ज्या देशाने उपचार केले, त्याच देशाच्या हीरोची अर्थात चे गेव्हारा यांची त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.
'जगाला तुम्हाला बदलू द्या, मग तुम्ही जग बदलू शकाल' हा संदेश देऊन हे वाक्य सत्यात उतरवणारा थोर क्रांतिकारक म्हणजे चे गेव्हारा. एका छोट्या देशातून आलेल्या या अवलियाने आपल्या अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात जगासमोर केवळ क्रांतीचा नव्हे, तर आयुष्य लार्जर दॅन लाईफ कसे जगायचे हा महत्त्वाचा संदेश दिला.चे गेव्हारा क्रांतीच्या रणांगणात न डगमगता, शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या तत्वांसाठी लढत राहिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा