महिला शासकांनी आपले कर्तृत्व व नेतृत्वाच्या जोरावर इतिहासाच्या पानावर आपला अमिट ठसा उमटवला. प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत त्यांनी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता, धैर्य व दूरदृष्टीने समाजाला दिशा दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक नवा अध्याय रचला. आपल्या शासनकाळात त्यांनी केवळ सत्ताच टिकवली नाही, तर समाजात प्रगती, सुधारणा व स्थैर्य आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच लिंगभेदाच्या सीमा तोडल्या गेल्या.
अहिल्याबाई होळकर मराठा साम्राज्यातील माळवा प्रांताच्या अशाच एक थोर व दूरदृष्टीच्या शासक होत्या. त्यांनी न्याय, धर्म, प्रशासन व समाजसुधारणांत आपले अतुलनीय योगदान दिले. त्यांच्या नम्र, न्यायी व कणखर नेतृत्वामुळे त्यांना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली. त्यांचा त्रिशताब्दी जयंती सोहळा शनिवारी संपन्न झाला. चला तर मग आज पाहूया पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास...
अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे 30 वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते. त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्याबाई होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच, पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.
अहिल्यानगरच्या चोंडी येथे जन्म
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 ऑगस्ट 1725 रोजी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे-पाटील, तर आईचे नाव सुशीलाबाई असे होते. अहिल्या बालपणापासूनच अत्यंत धाडसी होती. राज्यकर्त्याला आवश्यक असणारे सर्वच गुण तिच्याजवळ होते. मानकोजीरावांनी अहिल्याच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे त्यांचा गावातील वावर अत्यंत लक्षवेधी होता.
पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर?
त्याकाळी मुलींचे लग्न लवकर करण्याची प्रथा होती. त्यामुळे 1733 साली अहिल्यादेवींचे लग्न वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी खंडेराव होळकर यांच्याशी झाले. खंडेराव हे मराठा साम्राज्यातील होळकर घराण्याचे सरदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र होते. अहिल्यादेवी व खंडेराव यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला जातो. तो असा की, एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तिथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्याने वाळूचे एक शिवलिंग बनवले.
तेवढ्यात सैन्यदलातील एक घोडा उधळला. तो घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्यासोबतच्या मैत्रिणी घाबरून पळाल्या. पण अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्याचे रक्षण केले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोड्याशा जरबेच्या आवाजतच अहिलेल्या म्हटले, पोरी तुला घोड्याने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतांवर रोखत म्हणाली, हे शिवलिंग मी घडवले आहे व जे आपण घडवले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले.
तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत खूश झालेच. पण त्यांच्याबरोबर असणारे सरदार मल्हाररावही चांगलेच प्रभावित झाले. त्यांनी छोट्या अहिलेल्या आपली सून करून घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आपले सुपुत्र खंडेराव यांच्यासाठी तिचा हात मानकोजीराव यांच्याकडे मागितला. त्यानंतर या दोघांचे धुमधडाक्यात लग्न झाले.
अहिल्याबाई व खंडेराव यांचे वैवाहिकि जीवन सुखी होते. पण ते अल्पकालीन ठरले. 1754 साली खंडेराव यांचा एका युद्धात मृत्यू झाला. त्यामुळे अहिल्येवर वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षीच वैधव्य आले. त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा विचार केला. पण मल्हारराव होळकरांनी त्यांना त्यापासून प्रवृत्त केले. त्यांच्यावर माळवा प्रांताच्या प्रशासनाची जबाबदारी सोपवली. अहिल्याबाई व खंडेराव यांना मालेराव नामक एक मुलगा होता. त्याने होळकर घराण्याची गादी सांभाळली. पण त्याचाही 1766 मध्ये ऐन तारुण्यात मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्याबाईंनी स्वतः शासनाची सूत्रे हाती घेतली.
विधवा असतानाही मुलीचे केले कन्यादान
'इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" अशी उपमा दिली. थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. ते म्हणाले की, ज्या वेळी जगातील सर्वात महान स्त्रीयांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिले जाईल.'
अहिल्यादेवींनी मुक्ताबाईंचे लग्न यशवंतरावांशी लावून दिले. हे लग्न ठरले तेव्हा यशवंतरावांची जात किंवा राजघराण्याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती. त्यातच प्रथेनुसार विधवा महिलेला कोणतीही पूजा करण्याची परवानगी नव्हती. पण अहिल्याबाईंनी स्वतः मुक्ताबाईंचा कन्यादान विधी केला. मुक्ताबाई व यशवंतराव यांचा हा विवाह इंदूरमधील तत्कालीन जजगासाठी एक अविस्मरणीय घटना होती. कारण, त्या दिवशी इंदूरच्या लोकांनी या विवाहाच्या निमित्ताने एक विलक्षण क्रांतिकारी घटना अनुभवली होती.
राघोबादादांना घडवली कायमची अद्दल
एकदा माधवराव पेशवे यांचे चुलते राघोबादादा 50 हजार फौजेनिशी इंदूर राजधानीवर चाल करून आले. त्यांच्या मनात होळकरांची जहागीर जप्त करण्याचा डाव होता. त्याला अहिल्याबाईंचा कारभारी गंगोबातात्या चंद्रचूड यांची फूस होती. अहिल्याबाईंनी आपला सेनापती तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वात युद्धाची तयारी सुरू केली. तसेच 500 महिलांना सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांचे एक खास पथक तयार केले. एवढेच नाही तर महादजी शिंदे, बडोदेकर गायकवाड व नागपूरकर भोसले यांनाही तातडीने फौजा घेऊन येण्याचा सांगावा धाडला.
त्यानंतर पुण्याहून खुद्द पेशवा माधवराव यांच्याकडून 'बेलाशक पारिपत्य करा' अशा शब्दांमध्ये परवानगी घेतली. त्यानंतर क्षिप्रा नदीच्या पैलतटावर इंदूर शहरावर दबा धरून बसलेल्या राघोबादादाला निरोप पाठवला-
क्षिप्रा उतरून अलीकडे याल, तर तलवारीला तलवार भिडेल. तुम्ही आमचा पराभव केला तर काही नवल नाही, पण आमच्या महिला सैन्याने तुमचा पराभव केला, तर मात्र तुम्हाला कुठे तोंड दाखवायाला जागा राहणार नाही. अहिल्याबाईंच्या या शब्दांची जरब राघोबादादांना कळली. त्यानंतर ते तेथून परस्पर पसार झाले. अशाप्रकारे अहिल्याबाईंनी तलवार म्यानेतून न काढता केवळ मुत्सद्देगिरीच्या बळावर हे युद्ध जिंकले.
मल्हाररावांना होता अहिल्येवर पूर्ण विश्वास
पेशव्यांच्या कारकिर्दीतच म्हणजे 1730 साली मल्हारराव होळकरांना मावळ प्रांतातील सर्व परगण्यांचा अधिकार मिळाला होता. मराठ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी पेशव्यांनी आपल्या सरदारांना जहागिरी व वतनदारी दिली. 1734 साली होळकर राज्याची औपचारिक स्थापना करण्यात आली. होळकरांना वंशपरंपरेत चालणारी वतने, परगणे व इनाम मिळाल्यामुळे राज्यकारभाराचा पसारा वाढू लागला होता.
लेखिका विजया जहागीरदार यांनी अहिल्याबाईंचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात,
अहिल्याबाईंचे पती खंडेराव विलासी व व्यसनी प्रवृत्तीचे होते. त्याचे शल्य मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या मल्हाररावांना होते. त्यामुळे राज्यकारभाराची भिस्त राखेल असा वारसदार त्यांना अहिल्याबाईंच्या रुपाने दिसत होता. 'रोज फडनिशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठी माणसे पाठवावी, न्यायनिवाडे करावे, सरदारांना पत्रे पाठवावी, फौजा तयार ठेवाव्यात, खासगी उत्पन्न व सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवावे, खातेनिहाय पैशांचे वाटप करावे, गोळाबारूद बाणभाते, ढाली तलवारी सज्ज राखाव्या, सासऱ्यांच्या पत्राबरहुकूम सर्व रवाना करावे. मल्हारराव म्हणत आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या भरवशावर. मार्तंडानेच आम्हाला हे रत्न दिले. अवघी 20-22 वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली. इतिहासात याचे दाखले आहेत.'
लढाया व मोहिमांमधून लूट करून आणलेली संपत्ती राज्यात आल्यानंतर तोलली जात होती. त्यानंतर तिचा एक ठराविक हिस्सा पुणे दरबारी पाठवला जाई.
नवऱ्यालाही खडेबोल सुनावण्याची न्यायबुद्धी
अहिल्याबाईंची न्यायबुद्धी एवढी तीक्ष्ण होती की, त्यांनी खुद्द आपल्या पतीचीही हयगय केली नाही. विजया जहागीरदार यांनी त्यांच्या न्यायबुद्धीचा साक्ष देणरा एक किस्सा आपल्या पुस्तकात सांगितला आहे. त्या म्हणतात, अहिल्याबाईंचे पती खंडेराव यांचा राजमहल येथील लढाईत पराभव झाला. पण येताना त्यांनी बरीच लूट आणली. ही लूट सरकारी कार्यालयात वजन न करता ते वाड्यावर घेऊन गेले. अहिल्याबाईंनी याविषयी त्यांना खडेबोल सुनावत जाब विचारला. त्यावर खंडेरावांनी ही लूट आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर आणली असे सांगितले.
तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना खडेबोल सुनावले, त्या म्हणाल्या, स्वामी जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगटे रयतेसाठी असतात. आपण सुभेदारांचे वारस आहोत. चोरपेंढारी नाही. ही लूट निमुटपणे सरकारजमा करा आणि उरलेल्यांचा उपभोग घ्या. अन्यथा मला झडतीसाठी कारभारी पाठवावे लागतील, असे सुनावत त्यांनी ती लूट सरकार दरबारी जमा केली.
खंडेराव उधळपट्टी करणाऱ्यांपैकी एक होते
खंडेराव उधळपट्टी करणारे होते. त्यांनी आपल्या वाट्याचे वर्षभराचे पैसे अवघ्या 2 महिन्यांत उडवले होते. त्यानंतर ते अचानक हिशोबखान्यात येऊन पैसे मागू लाले. आपल्यावर आपल्या बायकोपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे हे पाहून त्यांचे डोळे लाल जर्द झाले होते. डोळ्यांवरती नशेची झापड होती. नजरेत आक्रमक संताप होता. आपल्या जागी अहिल्या बसली आहे त्याची चीड होती. आपणास पैशांची याचना करावी लागते याचा खदखदणारा संताप होता. राग होता. ते अहिल्याकडे रोखून बघत म्हणाले, मला माझ्या तनख्याचे पैसे हवेत. सल्ला नको. उपदेश तर मुळीच नको. हवेत ते पैसे. आणि ते आम्ही नेणारच. बघू द्या काय करता तुम्ही ते. तेच आम्हांस देखणे आहे.
अहिल्या या प्रहाराने किंचत विचलित झाली. पण लगेच स्वतःला सावरत समर्थपणे बोलली, मी जे काय करावे ते योग्य व दौलतीच्या हिताचे करावे अशी मामंजींची आज्ञा... आपल्या तनख्याचे पैके शिल्लक नाहीत. अर्थात आपला सरबरा होऊ शकणार नाही.
गंगोबातात्या थक्क होऊन अहिल्येकडे पाहत राहिले. सुभेदारांनाही जे जमले नाही, ते या धिटुकल्या सुनेने तडफदारपे केलेले पाहून त्यांचे मन कौतुकाने ओसंडू लागले. पण तेवढ्यात खंडेरावांनी तिच्या हातातील खतावणी लांब फेकूण दिली. हे पाहून अहिल्या ताडक उभी राहत म्हणाली, गंगोबातात्या, खतावणीची अशी बेअदबी करणाऱ्याचा जवाब लिहून घ्या अन् त्यांना पंचवीस मोहरा दंड ठोका. आम्ही सुभेदारीत जात आहोत. वसुलीस कामविसदार पाठवणे आहेत. आपण इथले काम निपटा व तिकडे या, असे सांगत अहिल्या वळूनही न पाहता ताडताड पुढे निघून गेल्या.
इंग्रजांविरोधात ठोस रणनीती
1764 च्या बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी मुघल बादशाह शाह आलम, बंगालचा नवाब व अवधचा नवाब शुजा यांचा पराभव केला. त्यानंतर तहामध्ये इंग्रजांनी अलाहाबादचा किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांची आक्रमक भूमिका पाहून मल्हाररावांना भविष्यातील युद्धाची जाणिव झाली. त्यामुळे जिथे लढाया होऊ शकतात, तिथून जवळच्या मोक्या ठिकाणी युद्ध सामग्री विशेषतः तोफांच्या दारूचा पुरवठा करणारे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी अहिल्याबाई वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत होत्या. याविषयी विनया खडपेकर आपल्या ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर पुस्तकात काही पत्रांचे संदर्भ देतात.
मल्हारराव होळकरांनी एका पत्राद्वारे अहिल्याबाईंना ग्वाल्हेरजवळ जाऊन लष्कराची तयारी करावी, दारुगोळ्याचा कारखाना लावून तोफखाना सिद्ध ठेवावा, अशी सूचना केली. त्यानंतर अहिल्याबाईंनी आपल्या तीर्थक्षेत्रांच्या भेटी रद्दबातल करून जोमाने कामाला सुरुवात केली. तोफांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्यांच्या कारखाना उभा करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम होते. पण त्यानंतरही त्यांनी हा कारखाना उभा करून दाखवला. मल्हारराव व अहिल्याबाई यांच्यातील पत्रव्यवहार इंदूरच्या मल्हारी मार्तंडच्या अंकात 1917 साली प्रसिद्ध झाली होती आजही ऐतिहासिक दप्तरांमध्ये ते उपलब्ध आहे.
अहिल्यादेवी होळकर विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. ब्रिटिशांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली
अहिल्यादेवींनी इंदूरमधील आपल्या सत्तेचे केंद्र हलवून नर्मदेकाठी महेश्वर इथे राजधानी स्थापन केली. महेश्वरचे जुने नाव महिष्मती नगरी असे होते. पण इंदूरचे सेनापतीपद दत्तकपुत्र तुकोजी होळकर यांच्याकडेच होते. महेश्वर राजधानी झाल्यानंतर 1767 ते 1795 पर्यंत अहिल्याबाईंनी उत्तम प्रशासनाचे विविध दाखले देत भारतापुढे आदर्श उभा म्हणून केला. या काळात त्यांनी केवळ उत्तरेतील राज्यांमध्येच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू्मध्येही लोकोपयोगी व धार्मिक वस्तु बांधल्या. यामुळे त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली.
अहिल्याबाईंनी मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासह अन्नछत्र, धर्मशाळा, विहिरी बांधल्या. नंदूरबारमध्ये त्यांनी विहीर खोदून घेतली. तिला आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखले जाते. अहिल्याबाईंनी लोकल्याणकारी कार्यक्रम राबवत आदर्श प्रशासन उभे केले. पण कर व्यवस्था, शेतकरी व व्यापाऱ्यांना सवलती, न्याय देण्याची व्यवस्था उभी केली. खेड्यापाड्यापर्यंत न्यायनिवाडा करण्याची यंत्रणा उभारली.
हुंडाबंदीचे धोरण राबवण्यासह दारुबंदीसाठीही कठोर पाऊले उचलली. मुलींची पाठशाळा व महिलांना शास्त्रशिक्षण सुरू केले. वैद्यांना निमंत्रित करून क्षय रोगावर संशोधन सुरू केले. जंगलतोडीविरोधात कार्यक्रम जाहीर केले. बंधारे, तळी बांधून सिंचनाने बागायती क्षेत्र वाढवले.
अहिल्याबाई होळकरांचे निवडक किस्से
चोराची शिक्षेपासून मुक्ती
एकदा एका चोराला अहिल्याबाईंच्या दरबारात आणले गेले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली, परंतु तो म्हणाला की, त्याने आपल्या भुकेल्या कुटुंबाच्या पोटात दोन घास टाकण्यासाठी चोरी केली. अहिल्याबाईंनी त्याला शिक्षा करण्याऐवजी त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्याला गावात काम मिळवून दिले. त्या म्हणाल्या, 'चोरी हा गुन्हा आहे, पण भूक ही त्या गुन्ह्यापेक्षा मोठी शिक्षा आहे.' हा किस्सा अहिल्याबाईंच्या दयाळू आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे उदाहरण आहे.
काशी विश्वनाथ मंदिराची निर्मिती
अहिल्याबाईंना धार्मिक कार्यात विशेष रुची होती. त्यांनी महेश्वर येथे नर्मदा नदीच्या काठी काशी विश्वनाथ मंदिराचा जिर्णोद्धार केला. याविषयी एक किस्सा सांगितला जातो. तो असा, एकदा अहिल्याबाईंना स्वप्नात शंकर भगवान दिसेल. त्यामुळे त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करणअयाचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या हाताने मंदिरासाठी दगड निवडले. तसेच बांधकामाता सहभाग घेतला. ही घटना त्यांच्या भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
शेतकऱ्याच्या जमिनीची पाण्याची व्यवस्था
एका गावातील शेतकऱ्याने अहिल्याबाईंकडे पाण्याच्या तुटवड्याची तक्रार केली. त्यावर त्यांनी तात्काळ त्या गावात विहिरी आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी निधी दिला. एकदा त्यांनी स्वतः एका गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामुळे शेतकरी त्यांना 'लोकमाता' म्हणू लागले. हा किस्सा त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाला अधोरेखित करतो.
स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन
अहिल्याबाईंनी त्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्यावर भर दिला. एकदा त्यांनी एका गावात मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले, जेव्हा त्यांना समजले की मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. त्यांनी स्वतःच्या खर्चाने शिक्षक नेमले आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. हा किस्सा त्यांच्या प्रगत विचारसरणीचे द्योतक आहे.
सैन्याचे नेतृत्व आणि युद्धातील धैर्य
अहिल्याबाई शांतताप्रिय होत्या, पण गरज पडल्यास त्या युद्धासाठीही सज्ज होत्या. एकदा माळवा प्रांतावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले आणि शत्रूंना पराभूत केले. युद्धात त्यांनी घोड्यावर स्वार होऊन सैनिकांना प्रेरणा दिली, ज्यामुळे त्यांचे सैन्य उत्साहाने लढले. हा किस्सा त्यांच्या धैर्य आणि नेतृत्वगुणांचा पुरावा आहे.
साधेपणा आणि नम्रता
अहिल्याबाईंच्या साधेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्या राणी असूनही साध्या वस्त्रात राहत आणि स्वतः कापड विणत. एकदा एका साध्या वेशातील व्यक्तीला त्यांनी आपल्या दरबारात बोलावले आणि त्याच्याशी सामान्य माणसासारखा संवाद साधला. नंतर समजले की तो व्यक्ती एक मोठा व्यापारी होता, जो त्यांच्या साधेपणाने प्रभावित झाला. यामुळे त्यांनी अहिल्याबाईंच्या राज्यात व्यापार वाढवण्याचा निर्णय घेतला. या विविध किस्स्यांद्वारे अहिल्याबाईंची न्यायप्रियता, करुणा, धार्मिकता आणि प्रगत विचारसरणी दिसून येते.
अहिल्यादेवींना भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद सोडवता आला नाही. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली. तसेच त्यांना त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. यासाठी रायगंण सुभ्यावर नवापूर या ठिकाणी ठिंगळे भिल्ल सरदार यांना अधिकार दिले. त्यामुळे भिल्ल जमाती होळकराच्या सैन्यात आल्या व त्यांनी सुरते वर वचक बसवला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी' त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
1795 साली घेतला अखेरचा श्वास
अहिल्याबाई होळकर यांचे निधन 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वर येथे झाले. त्या वेळी त्यांचे वय अंदाजे 70 वर्षे होते. त्यांनी माळवा प्रांतावर सुमारे 30 वर्षे (1767 ते 1795) शासन केले आणि आपल्या न्यायी, कल्याणकारी आणि धार्मिक कार्यांमुळे 'पुण्यश्लोक' म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांच्या कर्तृत्वातून आणि लोककल्याणकारी कार्यांमधून आजही जिवंत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा