भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

शनिवार, १९ जुलै, २०२५

अण्णाभाऊ साठे – लोककथांचे सम्राट आणि श्रमिकांचा आवाज

मातंग (मांग) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख वंचित (दलित) समुदाय आहे. हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक व आर्थिक विकासापासून दूर राहिला. पण या समाजाची संस्कृती फार समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. ही संस्कृती त्यांच्या लोकपरंपरा, कला, धार्मिक श्रद्धा व सामाजिक रीतिरिवाजांमधून दिसून येते. याच मातंग समाजात अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे थोर व्यक्ती होऊन गेले. ज्यांनी अवघा दीड दिवस शाळेत जाऊन समाजातील धन, जात व धर्मदांडग्यांना प्रखर आव्हान दिले. अण्णांची येत्या 18 जुलै रोजी पुण्यतिथी आणि 1 ऑगस्ट रोजी जयंती आहे. 

चला तर मग आज 'पाहूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा धगधगता संघर्षमय जीवनपट... 


सांगलीच्या वाटेगावात जन्म 

अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एका मातंग कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव, तर आईचे नाव वालुबाई साठे असे होते. त्यांचे बालपण अत्यंत गरिबी व सामाजिक भेदभावाच्या सावटाखाली गेले. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शाळेत घातले. पण सवर्णांकडून होणाऱ्या भेदभावामु्ळे त्यांनी दीड दिवसांतच शाळा सोडली. म्हणजे ते केवळ दीड दिवस शाळेत गेले. त्यांच्या कुटुंबाचीआर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. गावातील दुष्काळामुळे त्यांना 1931 मध्ये वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी सातारा येथून पायी मुंबईला स्थलांतर करावे लागले. हा प्रवास 6 महिन्यांचा होता. त्यात त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले. 

अण्णाभाऊंचे समाजकार्य हे दलित, कामगार, शेतकरी आणि उपेक्षित समाजाच्या सक्षमीकरणासाठीच्या व्यापक संघर्षाचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या अनुभवातून शोषणाची आणि विषमतेची तीव्र जाणीव मांडली. शिक्षण न मिळालेल्या परिस्थितीतही त्यांनी लेखन, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली. 


तुमच्या मुंबईत जातीची शिवाशिव आहे का? 

अण्णांनी बालपणीच सामाजिक भेदभाव अनुभवला. त्यांनी एकदा आपल्या वडिलांना विचारले, तुमच्या मुंबईत जातीची शिवाशिव आहे का? 
वडील म्हणाले, व्हयं. चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्या कपबशा बाहेर ठीवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर पसून पेत्यात. तसं बघाय गेलं तर आम्हाला कुणीच वळखत न्हाय. पण ह्यो जुना रिवाज हाय म्हणून आम्ही आपलं बाहेर बसून पेतो. उगीच कुणआची खटखट नको म्हणून. इंग्रज साहेबांकडेही शिवाशिव नसती. मी त्यांच्याकडे माळी काम करायला गेलो. म्हणजे ते मला त्येंच्याच कपात च्या देतात. त्यांच्याकडे एकच माणसाची जात. आमची माणसं नस्ती आडगी. म्हणूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन् आम्ही एका देशाचं असूनही एकमेकांना शिवून घेत न्हाय. 

अण्णांचे वडील भाऊराव मुंबईत माळी काम करून गावाकडे असणाऱ्या कुटुंबाचा चरितार्थ चावलत. मुंबईत राहत असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते. 

भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत वास्तव्य 

अण्णा वयाच्या 11 व्या वर्षी आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईला आले. ते तिथे भायखळ्याच्या चांदबीबी चाळत राहत होते. अण्णा तिथे कपडे विकणाऱ्या फेरीवाल्याकडे काम करू लागले. त्याची कपड्याची पेटी डोक्यावर घेऊन त्याच्यामागे चालत असत. एकदा त्यांची भेट ज्ञानदेव नामक नातलगाशी झाली. ते उत्त कलावंत होते. अण्णांनी त्यांच्याशी जवळीक वाढवली. आणि ते त्यांच्या वरळीच्या घरी जाऊ लागले. तिथे ते ज्ञानदेवच्या तोंडून रामायण, हरिविजय व पांडवप्रताप हे ग्रंथ ऐकत. फक्त ऐकून त्यांनी हे ग्रंथ तोंडपाठ केले होते. 

 अण्णाभाऊ कोहिनूर मिलमध्ये काम करू लागले. तिथेच त्यांचा कामगार चळवळीशी संबंध आला. ते सभा, मिरवणुका आदी कार्यक्रमात भाग घेऊ लागले. ऐतिहासिक पोवाडे म्हणू लागले. त्यांच्या खणखणीत आवाजाला जनतेची दादही मिळू लागली. ते जे पाहत ते लगेच आत्मसात करण्याची अनोखी क्षमता त्यांच्याकडे होती. त्यातूनच ते बासरी वाजवायला शिकले. याच काळात कोहिनूर मिलचा संप झाला. हा संप 6 महिने चालला. गिरणी बंद पडली. कोहिनूर मिलची नोकरी सुटल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले. यावेळी त्यांना पुन्हा आपल्या गावी म्हणजे वाटेगावला परतावे लागले. 

तुमच्या झोपडीचे दार लहान का? 

वयाच्या 17-18 व्या वर्षी अण्णांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यांचे वडील थकले होते. नंतर ते माटुंग्यातील चिरागनगर येथील एका झोपडीत राहायला आले. अण्णांनी आपले उभे आयुष्य याच झोपडपट्टीत काढले. याच झोपडीत त्यांच्या एकाहून एक श्रेष्ठ अशा कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, आपण गलिच्छ वस्तीत राहत असलो तरी आपले मन स्वच्छ असावे. एकदा लोकांनी त्यांना विचारले, अण्णा, तुमच्या झोपडीचे दार लहान का? त्यावर अण्णाभाऊ म्हणाले, पंडित नेहरू माझ्या झोपडीत आले तरी त्यांना वाकूनच यावे लागले.

अण्णाभाऊंचे बालपण पारंपरिक तमाशा व लोकवाद्यांच्या सान्निध्यात गेले. त्यामुळे त्यांच्या साहित्य व शाहिरीवर त्याचा मोठा प्रभाव पडला. गावातील सामाजिक विषमता व शोषणाच्या अनुभवांनी त्यांच्या मनावर कायमस्वरुपी ठसा उमटवला. हे अनुभव त्यांच्या लेखनातून व सामाजिक कार्यातून व्यक्त झाले. सांगलीहून पायी चालत मुंबई गाठणाऱ्या अण्णांनी नंतर स्वकर्तृत्वावर थेट रशिया गाठली. दलित समाजाला जागृत करण्याचे फार मोठे कर्म त्यांनी केले.

मुंबईत कम्युनिस्ट विचारांचा ओढा 

 अण्णाभाऊंनी मुंबईला आल्यानंतर चरितार्थासाठी कोळसा वेचणे, फेरीवाल्यांच्या मागे गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी करणे आदी मिळतील ती कामे केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यानंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. 

 मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करत होतेच. तथापि, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी परतले. तिथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे 1942 च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. 

 मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकीक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांसोबत अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला 'स्तालिनग्राडचा पवाडा' 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी 1944 साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. अमळनेरचे अमर हुतात्मे व पंजाब - दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचाना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. पंजाब - दिल्लीचा दंग या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. 

 उपेक्षितांच्या समृद्धीचे स्वप्न 

 अण्णाभाऊ उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेल्या दलित व श्रमिकांच्या समृद्धीचे स्वप्न पाहत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढाऊ व विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झाले होते. 'जग बदल घालुनी घाव, सांगूनि गेले मज भीमराव', हे त्यांचे गीत खूप गाजले. अण्णांची अतिशय तळमळीने लिहिण्याची वृत्ती होती. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ते म्हणत. हाच त्यांच्या लेखणाचा प्रेरणास्त्रोत होता. मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेून दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. 

 अण्णाभाऊंच्या शाहिरीतील मार्क्सवाद

 अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून सामान्य कष्टकऱ्यांच्या वाट्याला आलेली आर्थिक विषमता, वर्ग व्यवस्था, जीवनातील संघर्ष, उपासमारी, लाचारी, बेकारी, जमीनदारी, सावकारी पाश, भांडवलदारी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली. अण्णाभाऊंचा 1935 साली मुंबईत कसबी कामगार म्हणून काम करताना कम्युनिस्ट चळवळीशी संबंध आला. त्यातून त्यांची शाहिरी अधिक जीवंत झाली. मार्क्सने ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये कामगाराची पिळवणूक अनुभवली व त्याविरोधात आवाज उठवला. त्याचप्रमाणे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून शेतकरी, कष्टकरी, दलित, गिरणी कामगारांच्या दुःखाला वाचा फोडली. 

 ब्रिटिशांविरोधात दंड थोपटणारा 'फकिरा' 

 अण्णाभाऊंनी मराठीत तब्बल 35 कादंबऱ्या लिहिल्या. माणूस हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता. त्यांजी फकिरा ही कादंबरी चांगलीच गाजली. तिला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णांनी आपली फकिरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. या कादंबरीद्वारे त्यांनी भीषण दुष्काळात ब्रिटिशांचे खजिना, धान्य लुटून गोरगरिबांना वाटणाऱ्या फकिरा या मातंग समाजातील लढाऊ बाण्याच्या तरुणाचे चित्रण केले. त्यामुळे त्यांचे साहित्य हे तत्कालीन समाजाच्या वास्तव जीवनाचे अपत्य मानले जाते. 

 अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये नाट्य आहे. जीवनाचे वास्तव नाटक त्यांच्या कथेत अगदी संघर्षाच्या वातावरणात खेळते राहते. त्यातील संवाद बोलके व झणझणीत वाटतात. क्रोध, असूया, सूड, धाडस आदी प्रखर भावनांचे लखलखते पाणी त्यांच्या संवादांना आगळीच घाट आणते. त्यांच्या कथेतील माणसे ढोंग जाणत नाहीत. ती आपल्या भावना रोखठोकपणे बोलून दाखवतात. जे कृतीने करायचे आहे. त्याचा उच्चार त्यांच्या बोलण्यातून होतो. 

 पिराजीची भानगड व कोंबडी चोर या दोन कथा याचे बोलके उदाहरण आहे. पहिल्या कथेतला पिराजी काय किंवा दुसऱ्या कथेतील रामू काय, दोघांच्याही हातून गुन्हे घडतात. ते पोटाची आग शमवण्यासाठीच. इतरांची फजिती करता करता कधी कधी त्यांचीही फजिती होते. आपण करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. पश्चाताप झालेला पिराजी म्हणतो, आता मला ह्यो गाव नगं. म्या लाई भानगडी केल्या. अब्रू गेली - कळा गेली. पार पार गेली. जे जीवन त्यांनी पत्करले आहे त्याला जबाबदार ते नाहीत. हे अण्णाभाऊ वाचकांना इतक्या नकळत पटवून देतात की, त्यामुळे या उपद्व्यापी प्राण्यांबद्दल कधी अनुकंपा वाटू लागते हे आपल्यालाही समजत नाही. कारुण्या व हास्य या दोहोंचा उगम एकाच परिस्थितीतून होतो हे सूत्र अण्णा भाऊंना पुरते समजले होते. 

 अण्णांची मर्मभेदी अन् पल्लेदार भाषा 

 अण्णांच्या कथेचे आणखी एक आकर्षक अंग म्हणजे तिची मनात रुतणारी भाषा. एखादा भाला फेकल्यासारखी त्यांची वाक्यरचना थेट वाचकांच्या हृदयात शिरते. ते अगदी कोंदणात मोती बसवल्यासारखे अर्थानुकूल शब्द वापरतात. 'दगडाच्या खिळ्यात उगवणारे झाड जसे वाकडे-तिकडे वर यावे, तद्वत पिराजीचे मन अनंत अडचणींच्या दगडातून वाकडेतिकडे होऊन वर आले होते', 'कूडसं पडून तोंडओळख मोडली होती', 'प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली', 'बगळा बैलाच्या गोचड्या तोडतो, त्यो काय बैलावर उपकार म्हनं नवं, तर आपलं प्वाट भराया पाई', 'तो जीव घोटाळेपर्यंत बोले म्हणून लोक त्याला बडबड्या केरु म्हणत', आदी त्यांनी लिहिलेली अनेक वाक्ये माणसाच्या मनात घर करतात. 

 'सारे विश्‍व घेऊन बसलेल्या त्या अंधाराची मूठ आता सैल होत होती. नवे वारे कपारीवरून धावत होते. अठरा भार वनस्पतींचा सुगंध वार्‍याने पुढे पळत होता. वृक्षराजींच्या मुखावर तजेला आला होता. पूर्वेने लाल प्रकाशाचा मळवट भरला होता. त्यामुळे सर्व जीवजंतू मानवाच्या दृष्टीत एकरूप होत होते. दवबिंदूच्या सिंचनाने न्हाईलेले प्रचंड दगड हत्तीप्रमाणे लोळत असल्याचा भास होत होता आणि दूर सोनेरी पिकांनी नटलेला तळवट धुक्यातून बाहेर निघत होता,' सह्याद्रीच्या परिसराचे हे वर्णन एखाद्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यासारखे धावते आणि नयनसुभग वाटते. 

 'माझी मैना गावाकडं राहिली...' 

 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर 1 मे 1960 रोजी आजच्या महाराष्ट्राची स्थापना झाली. पण या चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांना जो संयुक्त महाराष्ट्र अपेक्षित होता, तो मिळाला नाही. बेळगाव व कारवार हा सीमाभाग तसाच कर्नाटकात राहिला. मुंबईतील फाउंटन व बेळगावात झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडूनही आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याची सल अण्णाभाऊंच्या मनात निर्माण झाली. त्यातून 'माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली' या गीताचा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हे गीत फार गाजले. ते लोकांच्या केवळ ओठांवरच नव्हे तर हृदयावर कोरले गेले. आज 60 वर्षांनंतरही हे गाणे तेवढेट टवटवीत वाटते. शाहीर विठ्ठल उमाप किंवा आनंद शिंदे यांच्या आवाजात हे गाणे ऐकले की आजही अंगावर काटा येतो. 

 गरिबांनी कुठं टाकाव्या खाटा 

 अण्णाभाऊ एकेठिकाणी श्रमिकांच्या हातांना वंदन करताना म्हणतात, 
 प्रारंभीचा मी आजला, 
कर ज्याचा येथे पुजिला. 
जो व्यापुनि संसाराला,
 हलवी या भुगोला. 

 मुंबईचा गिरणी कामगार या पोवाड्यात ते म्हणतात, 
बा कामगारा, तुज ठाई अपार शक्ती, 
ही नांदे मुंबई तव तळ हातावरती, 
हे हात पोलादी, सर्व सुखे निर्मिती, 
परि तुला जगण्याची भ्रांती. 

अण्णाभाऊंनी भूख दुबळ्याचे बळ, भूख बंडांचं मूळ हा भुकेचा सिद्धांत मांडला. सावकारशाही व भांडवलशाही श्रमिकांचे शोषण करणारे बगळे आहेत, हे सांगताना एका कवनात ते म्हणतात, 
नदीला बगळा, जमून सगळा टपून बसती कशाला. 

 अण्णांनी भांडवलदारांची व्यापारी वृत्ती, काळाबाजार, लुबाडणूक, कामगारांचे व शेतकऱ्यांचे शोषण, वर्णवर्चस्ववादी दांभिकता याने शेतकरी, कामगारांचे होणारे हाल लोकनाट्य व शेतकरी गीतातून मांडले. ते म्हणतात, 
जोंधळा नाही गहू, 
खातो रबरी आटा 
गरिबांनी कुठं टाकाव्या खाटा. 

 1958 साली मुंबईच्या नायगाव येथे पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या उद्घाटनावेळी अण्णाभाऊंनी ही पृष्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे संपूर्ण जग कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली असल्याचा नवा सिद्धांत त्यांनी मांडला. अण्णाभाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नाही असे नाही, पण त्यांचा प्रकृतीधर्म गंभीर लेखकाचा होता. 

 मराठी माणसांच्या गाथा गाण्यात धन्यता 

 अण्णाभाऊंना मराठी माणसांच्या गाथा गाण्यात धन्यता वाटत होती. महाराष्ट्राची परंपरा हा त्यांचा प्रदीर्घ पोवाडा महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास आहे. हा पोवाडा महाराष्ट्राचा तर आहेच, पण प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. त्यांचे काही कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा प्रत्येक नेता हा अण्णांच्या शाहिरीचा नायक होता. खानदेशातील श्रीपत पाटलांच्या नेतृत्वातील निघालेल्या कामगारांच्या मोर्चात 9 कामगारांनी प्राण गमावले. स्वतः श्रीपत पाटलांनी हौतात्म पत्करले. अण्णांनी त्यांच्यावर अमळनेरचे अमर हुतात्मे हा पोवाडा लिहिला. त्यात प्राण फुंकून त्यांनी तो गायला. श्रीपत पाटलांना त्यांनी अमरपद दिले. 
 श्रीपती पाटील दिलदार, पुढारी खंबीर, केला निर्धार 
घेऊन विचार सर्वा्ंचा, बेत केला त्याने निकराचा पोवाडा ऐका म्होरं त्याचा. 

अण्णाभाऊंनी कामगारांना स्फुर्ती देण्यासाठी हा पोवाडा लिहिला. 

बाबासाहेबांच्या विचारांतून लढण्याची प्रेरणा 

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील समाजाचा उत्कर्ष करणारी क्राती अण्णाभाऊंना लढण्याची प्रेरणा देत होती. घाव गालून जग बदलण्याचे तत्वज्ञान त्यांनी या महामानवाकडून घेतले होते. देशातील धनदांडग्यांनी, जातदांडग्यांनी व धर्मदांडग्यांनी ज्यांचे शोषण केले, त्या दलितांच्या बाजूने ते ठामपणे उभे होते. शोषकांवर व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर त्यांनी आपल्या लेखणीने कुठाराघात केले. कामगारांच्या लढ्याने त्यांच्या मनात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण केली. बाबासाहेबांच्या निधनानंतर आयोजित श्रद्धांजली सभेत त्यांनी, 
 जग बदल घालुनी घाव 
सांगून गेले मला भीमराव. 
 ही कविता सादर केली. ती चांगलीच गाजली. 

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत निधन 

 अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी मुंबईच्या गोरेगावातील सिद्धार्थनगर झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व सामाजिक चळवळीला मोठा धक्का बसला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्या शाहिरीने प्रबोधनाचे कार्य केले. त्यामुळे त्यांचे निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नव्हती, तर एका क्रांतिकारी व परिवर्तनवादी विचारसरणीच्या आवाजाचा अंत होता. 

 मातंग समाजात जन्मलेल्या या थोर साहित्यिकाने आपल्या लेखनातून व शाहिरीतून दलित, शेतकरी व श्रमिकांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडली. पण त्यांच्या जीवनातील शेवटच्या काळात सामाजिक उपेक्षा आणि आर्थिक दारिद्र्य यामुळे त्यांना मोठ्या हालअपेष्टांचा सामना करावा लागला. त्यांच्या साहित्याने रशियासारख्या देशातही मान मिळवला, परंतु मराठी साहित्यिक प्रतिष्ठानांनी त्यांना योग्य तो मानसन्मान मिळाला नाही, अशी खंत व्यक्त केली जाते. 

 अण्णाभाऊ साठे यांचे किस्से 

 1.रशियातील ऐतिहासिक भाषण 

अण्णाभाऊ साठे यांनी 1950 च्या दशकात रशियाला भेट दिली. मॉस्को येथे त्यांनी मराठीतून एक प्रभावी भाषण केले. त्यांचे हे भाषण रशियात झालेले पहिलेच मराठी भाषण ठरले. या भाषणात ते छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना म्हणाले, कदाचित तुमच्यावर मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यात साडेतीन लोक मराठी बोलतात. ती माणसे तुमच्यासारखीच नेक व झुंजार आहेत. तुमचा अफानासी भारतात आला होता. पण त्याचे पहिले पाऊल माझ्या मराठी धरणीवर, महाराष्ट्र राज्यात, शिवाजी राज्याच्या मातृभूमीत पडले होते. त्या राज्याच्या मराठीत मी बोलत आहे. 

 अण्णांच्या या भाषणाचे इंग्रजी व रशियन भाषेत भाषांतर करण्यासाठी 2 दुभाषे उपस्थित होते. त्यांनी रशियातील समाजवादाचे यश व तिथली स्वप्नवत दुनिया पाहून प्रभावित झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्यांचा रशियात एवढा प्रभाव होता की, मॉस्को येथे त्यांचा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा संपूर्ण मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. अण्णांच्या भाषणानंतर रशियन लोकांची झुंबड उडाली. ते अण्णांना महाराष्ट्राविषयी विविध प्रश्न विचारू लागले. 

2. ये आझादी झूठी है, देश की जनता भुकी है 

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण अण्णाभाऊंनी त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवरील एका सभा घेतली. या सभेत त्यांनी 'ये आझादी झूठी है, देश की जनता भुकी है' असा नारा दिला. त्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत होता. पण त्यानंतरही त्यांनी आपला आवाज बुलंद ठेवला. हा नारा नंतर त्यांच्या सामाजिक व आर्थिक अन्यायाविरोधातील लढ्याचे प्रतीक बनला. 

 3. लाल बावटा पथकाची स्थापना 

अण्णाभाऊंनी 1944 साली शाहीर अमर शेख, गवाणकर यांच्या मदतीने लाल बावटा पथक स्थापन केले. या पथकाद्वारे त्यांनी तमाशाला लोकनाट्याचा दर्जा दिला. सामाजिक जागृती व परिवर्तनाचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांची 'माझी मैना गावाकडे राहिली' ही लावणी आणि इतर रचना लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या. या पथकामुळे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीर बनले.

 4. फकिरा कादंबरी आणि सामाजिक लढा 

अण्णाभाऊंची 'फकिरा' ही कादंबरी त्यांच्या साहित्यातील एक मैलाचा दगड ठरली. या कादंबरीत त्यांनी मांग समाजातील एका लढाऊ तरुणाची कथा मांडली. हा तरुण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने व अन्नधान्य लुटून गरिबांना वाटतो. या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दलित व शोषित समाजाच्या लढ्याला मोठा आधार दिला. 

 5. अशिक्षित असूनही साहित्य संपदा 

अण्णाभाऊंना केवळ दीड दिवस शाळेत जाण्याची संधी मिळाली. पण त्यानंतरही त्यांनी 35 कादंबऱ्या, 21 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 19 पोवाडे व शेकडो लावण्या लिहिल्या. त्यांच्या साहित्यात माणूस हा केंद्रबिंदू होता. त्यांनी सामाजिक विषमता, शोषण व अत्याचाराविरोधात सातत्याने लिखाण केले. त्यांचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरित झाले. जे त्यांच्या वैश्विक प्रभावाचे द्योतक आहे. 

 6. आकाशातील ताऱ्याला नाव 

2024 मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सुशील तुपे या तरुणाने आकाशातील एका ताऱ्याला अण्णाभाऊंचे नाव दिले. अमेरिकेतील एका संस्थेमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा अण्णाभाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचा अनोखा सन्मान होता. 

 7. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम 

अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक शाखा असलेल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) मध्येही सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या पोवाड्यांनी व लावण्यांनी लोकांना एकत्र आणले. एवढेच नाही तर त्यांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरितही केले.

 8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा 

अण्णाभाऊंवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खोलवर प्रभाव होता. त्यांनी आपल्या साहित्यात विशेषतः 'जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव' या गीतातून आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आंबेडकरांना आपले गुरु मानले. तसेच दलित समाजाच्या मुक्तीसाठी त्यांच्या विचारांचा पुरस्कार केला. 

 9. हलाखीचे जीवन आणि अढळ साहित्य 

अण्णाभाऊ साठे यांचे आयुष्य अत्यंत हलाखीत गेले. अखेरच्या काळात त्यांना आर्थिक अडचणी व उपेक्षेचा सामना करावा लागला. तरीही, त्यांनी आपल्या साहित्यिक कार्यातून कधीही तडजोड केली नाही. त्यांचे साहित्य वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण आहे. ते समाजातील उपेक्षितांना आशेचा किरण दाखवते. त्यामुळे त्यांचे जीवन उपेक्षित व शोषित वर्गाच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लावण्या व पोवाड्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा दिली.
0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा