भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, २० जुलै, २०२५

संत कबीर : विचार, दोहे आणि जीवनप्रवास

 15 व्या शतकात वाराणसीत जन्मलेले कबीर हे केवळ संत किंवा कवी नव्हते, तर एक थोर सामाजिक सुधारक व आध्यात्मिक क्रांतिकारक होते. जुलाहा समाजात वाढलेल्या या साध्या विणकराने आपल्या तीक्ष्ण बुद्धीने व हृदयस्पर्शी दोह्यांनी हिंदू - मुस्लिम धर्माच्या सीमा ओलांडून मानवतेचा थोर संदेश दिला. कर्मकांड, धर्मांधता व सामाजिक भेदभाव यांना आपल्या निर्भिड वाणीतून आव्हान दिले. 'मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में', असे म्हणत ईश्वराला मंदिर-मशिदीत नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या हृदयात शोधण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे सूफी आणि भक्ती परंपरांचा अनोखा संगम असलेले कबीर आजही त्यांच्या शाश्वत विचारांनी लाखो लोकांना प्रेरणा देतात.

संत कबीर यांची जयंती गत 11 जून रोजी साजरी करण्यात आली. चला तर मग आज संत कबीर यांच्या शिकवणीचा धुंडाळा घेऊया...


कबीर यांच्या जन्माच्या दोन कथा

संत कबीर यांचा जन्म नेमका कधी झाला? याविषयी इतिहासकारांमध्ये एकमत नाही. पण प्रचलित मान्यतांनुसार, त्यांचा जन्म 1398 ते 1440 या कालखंडात उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथे झाला. काही स्रोतांनुसार, त्यांचा जन्म 1398 मध्ये, तर काहींनुसार 1440 मध्ये झाला असे मानले जाते. संत कबीर यांच्या जन्माविषयी दोन कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, कबीर हे एका हिंदू ब्राह्मण विधवेचे पुत्र होते. त्यांना त्यांना नीरू व नीमा या मुस्लिम जुलाहा (विणकर) दाम्पत्याला दत्तक दिले.


दुसऱ्या कथेनुसार, संत कबीर यांचा जन्मच मुळात मुस्लिम जुलाहा कुटुंबात झाला. या वेगवेगळ्या दाव्यांमुळे कबीर यांच्या जन्माची निश्चित माहिती मिळणे कठीण आहे. पण तरीही, त्यांचा जन्म वाराणसीतील लहरतारा तलावाजवळ झाला असा उल्लेख सर्वत्र आढळतो. त्यांच्या जन्माविषयीच्या या संदिग्धतेमुळे त्यांचे जीवन व कार्य यावर आधारित माहिती (विशेषतः त्यांचे दोहे आणि भक्ती रचना) अधिक महत्त्वाची मानली जाते.

कबीर यांचे बालपण वाराणसीतील जुलाहा समाजातच गेले. हा समाज त्या काळात निम्न सामाजिक स्तराचा मानला जायचा. त्यांचे कुटुंब अत्यंत साधे जीवन जगत होते, आणि नीरू विणकर म्हणून काम करत होते. त्यामुळे कबीर यांना बालपणीच विणकामाचे धडे मिळाले. पुढे हाच व्यवसाय त्यांनी स्वीकारला.

संत कबीर यांचे बालपण हिंदू व मुस्लिम संस्कृतींचा संगम होता. पण त्यावेळी सामाजिक असमानता व धार्मिक कट्टरता फार प्रबळ होती. या वातावरणाचा त्यांच्या विचारांवर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या कविता व दोह्यांमधून सर्वसामान्य लोकांच्या भाषेत आध्यात्मिक व सामाजिक सुधारणांचा संदेश दिला.

स्वामी रामानंद यांना गुरू मानले

संत कबीर यांची स्वामी रामानंद यांचे शिष्य होण्याची इच्छा होती. वयाच्या 5 व्या वर्षी ते स्वामीजींकडे गेले व त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली. पण स्वामीजींनी त्यांना भेटण्यास नकार दिला. पण कबीर निराश झाले नाही.

स्वामीजी रोज ब्रह्म मुहूर्तावर गंगा स्नानासाठी जात होते. एकेदिवशी ते नदीचा घाट उतरत असताना कबीर त्यांच्या मार्गात आडवे झाले. रामानंद स्वामी यांचा पाय त्यांना लागला. ते राम-राम म्हणत खाली वाकले व त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांचे तेच राम-राम हे शब्द कबीर यांनी गुरूमंत्री मानला आणि त्याचा जाप करू लागले. कबीर यांनी ते शब्द अशा प्रकारे म्हटले -

हम कासी में प्रकट भये है, रामानंद चेताये.

त्यानंतर काही दिवसांनी समंत कबीर यांच्या गुरूभक्तीने प्रभावित होऊन तथा आपले प्रमुख शिष्य अनंतानंद यांच्या सूचनेनुसार स्वामी रामानंद यांनी त्यांना आपले शिष्य मानले. कबीर यांनी आपले समर्पण व निष्ठने लवकरच रामानंद यांचे मन जिंकले. ते रामानंद यांच्या जवळपास 1500 शिष्यांपैकी एक प्रमुख शिष्य बनले.

संत कबीर स्वामी रामानंद यांच्याशिवायही इतर हिंदू संत-महात्मे व मुस्लीम पीर-फकिरांशीही विचार विनिमय करत होते. ते प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी शिकण्यास प्राधान्य देत होते.

कबीर यांनी गुरूला नेहमीच देवाहून मोठा दर्जा दिला. त्यामुळेच ते म्हणत होते,

गुरू गोविंद दोऊ खडे, काके लांगू पाँय,

बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो बताय.

संत कबीर यांच्या मते, इच्छा व आकांक्षा हे सर्वच दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे ते गुरूभक्ती व भगवत भजनाचा उपदेश देत म्हणतात,

चाह मिटी, चिंता मिटी, मनवा बेपरवाह,

जिसको कुछ नही चाहिए, वही शाहनशाह.


कबीर विवाहित होते की अविवाहित?

कबीर यांच्या विवाहाविषयी तीव्र मतभेद आहेत. काही लोक त्यांना अविवाहित, तर काही जण विवाहित मानतात. पण त्यांच्या दोह्यांतून ते विवाहित असल्याचे स्पष्ट होते. असे म्हटले जाते की, त्यांच्या प्तनीचे नाव लोई असे होते. त्यांना कमाल नामक मुलगा व कमली नामक एक मुलगी होती. घरात नेहमीच साधूसंतांचा राबता असल्यामुळे कमाल व लोई यांना खूप त्रास होत असत. कमाल यांना आपल्या वडिलांचे वागणे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असत. कदाचित त्यामुळेच कबीर म्हणाले होते -

बूढा बंस कबीर का, उपजा पूत कमाल,

हरि का समिरन छोडि के, घर ले आया माल.

पत्नी लोई विरोध करत असे, तेव्हा कबीर तिला समजावून सांगताना म्हणत-

कहत कबीर सुनहु रे लोई,

हरि बिन राखन हार न कोई.

दुसरीकडे, कबीर पंथात कबीर यांना बाल ब्रह्मचारी मानत कमाल व कमली हे दोघे त्यांचे शिष्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण एकेठिकाणी ते म्हणतात,

नारी तो हम भी करी, पाया नही विचार,

जब जानी तब परिहरि, नारी महाविकार.

या ओळींमधून कबीर यांनी स्वतःच आपण विवाहित असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ते अविवाहित असल्याचा कोणताही संशय उरत नाही. पण ते या विवाहामुळे आनंदी नव्हते हे मात्र खरे...

ईश्वर नेमके कुणाचे?

मुलांसोबत खेळताना कबीर नेहमीच हरि-हरि, राम-राम, गोविंद-गोविंद आदी शब्द बोलत असत. ते ऐकूण मुसलमान नाराज होत. एकेदिवशी कबीर यांनी कपाळावर टीळा लावून गळ्यात जानवे घातले. त्यामुळे ब्राह्मण संतापाने म्हणाले, तू तर मुसलमान आहेस, पण आतापर्यंत राम-राम म्हणत होतास. आता आमचा धर्म स्वीकारलास का?

ते ऐकूण कबीर म्हणाले, राम, हरि व गोविंद तर माझ्या हृदयात आहेत. त्यांच्याशिवाय मला कुणाचीही गरज भासत नाही. पण तुम्ही वेद, पुराण व गीता वाचन करूनही पैशांचे मागे पळता. मग ईश्वर तुमचे कसे झाले?

कर्म-फळ सांगणारी शेतकऱ्याची कथा

लेखक एम. वैरागी आपल्या 'संत कबीर और उनकी अनमोल शिक्षा' या पुस्तकात संत कबीरांचा एक किस्सा सांगितला आहे. एकदा संत कबीर यांनी एका शेतकऱ्याला प्रश्न केला. 'तू ईश्वरासाठी काही वेळ काढतोस का?' शेतकऱ्याने उत्तर दिले, 'नाही, अजून माझी मुले छोटी आहेत, ते तरुण झाली, की अवश्य पूजाअर्चा करेन.'

काही वर्षांनंतर कबीरांनी पुन्हा त्याला प्रश्न केला, 'आता तर तुझी मुले मोठी झाली असतील, त्यामुळे तुला पूजापाठासाठी पुष्कळ वेळ मिळत असेल.' शेतकरी उत्तरला, 'माझा मुलांची लग्न करण्याचा विचार आहे. त्यानंतरच मला पूजापाठ करता येईल.' काही वर्षांनी पुन्हा हा प्रश्न विचारल्यानंतर शेतकऱ्याने उत्तर दिले, 'माझी नातवांचे तोंड पाहण्याची इच्छा आहे. '

संत कबीर यांनी हिंमत सोडली नाही. काही वर्षांनी पुन्हा विचारल्यानंतर शेतकऱ्याने निराशेचा सूर आळवला. तो म्हणाला, 'माझे नातू फार उद्धट निघालेत. ते खूप त्रास देतात. त्यामुळे दिवसभर मला त्यांच्यावर लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मला ईश्वरासाठी वेळच मिळत नाही.'

पुन्हा काही वर्षांनी जेव्हा कबीर त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. तेव्हा त्यांना कळले की, त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी अंतर्धान लावले. त्यांना दिसले की, त्या शेतकऱ्याकडे एक गाय होती. त्याला ती फार प्रिय होती. त्याने तिच्या वासराच्या रूपात जन्म घेतला होता. हे वासरू मोठे झाल्यानंतर त्याला नांगरणीस जुंपण्यात आले. त्यानंतर ते म्हातारे झाले असता त्याला घाण्याला जोतण्यास आले. शेवटी ते कोणत्याही कामाचे राहिले नसता, शेतकऱ्याच्या मुलांनी त्याला एका खाटकाला विकले. खाटकाने त्याला कापून त्याचे मांस लोकांना विकले, तर त्याची कातडी ढोल तयार करणाऱ्यांना विकली. आता ढोल वाजवणारे त्याला जोरजोरात बदडत होते. शेतकऱ्याची ही स्थिती पाहून कबीर यांच्या तोंडातून शब्द निघाले...

बैल बने हल में जुते, ले गाडी मे दीन

तेली के कोल्हू रहे, पुनि घेर कसाई जीनगरशीमांस कटा बोटी बिकी, चमडन मढी नक्कार

कुछ कुकरम बाकी रहे, तिस पर पडती मार.


मोह फार वेदनादायी असतो

संत कबीर एकदा एका गावात गेले होते. त्यांना दिसले की, लोक एका वेश्येला गावाबाहेर काढत होते. पण तिला ते गाव सोडायचे नव्हते. गावकऱ्यांनी जेव्हा तिचे घर जाळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संत कबीर यांनी त्याला रोखले. ते म्हणाले, संयम ठेवा, ती स्वतःच निघून जाईल.

दुसऱ्या दिवशी सकाळीच भिक्षापात्र घेऊन ते तिच्या दारात पोहोचले. एका दिव्य पुरुषाला भिक्षापात्र घेऊन आलेले पाहताच, ती अनेक पंचपक्वान घेऊन बाहेर आली. कबीर यांनी त्या पंचपक्वानांकडे पाहिलेही नाही. ते म्हणाले, मी येथे या पंचपक्वानासाठी आलो नाही, तर तु्हाला मोहावरण दूर करण्यासाठी आलो आहे. तुझ्यात एक दिव्य स्त्री दडली आहे. तिला तुझ्यातील कलुषित कामनेच्या आवरणाने झाकून टाकले आहे. मला त्या आवरणाची भीक हवी आहे.

त्या महिलेने हे ऐकले आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती म्हणाली, बाबा, हे एवढे सोपे आहे का? हे मोहावरण तर माझ्या कातडीसारखे माझ्या अंगाला चिकटले आहे. ते दूर केले तर मला जी वेदना होईल, ती मला कशी बरे सहन होईल?

कबीरदासजी म्हणाले, जोपर्यंत मला माझी भीक मिळणार नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही.

त्यावर त्या महिलेने त्यावर गंभीरपणे विचार केला. हे गाव सोडल्याशिवाय आपले मोहावरण दूर होणार नाही हे तिला पटले. तिने आपली भावना संत कबीर यांना बोलून दाखवली. ते संतुष्ट झाले. या दारात भिक्षा मागण्यासाठी आल्यानंतर आपल्याला एका दिव्य स्त्रीचे दर्शन झाले, असे ते मनातल्या मनात म्हणाले.

संत कबीर शिक्षित होते अशिक्षित?

संत कबीर आपल्या काळातील एक महान संत साहित्यिकार होते. त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. ते निरक्षर होते. ही गोष्ट मान्य करत ते स्वतः म्हणाले होते,

मसि कागद छुओ नही, कलम गही नहि हाथ.

पण त्यानंतरही त्यांच्या मुखातून जे निघाले, ते तर्क व साहित्याच्या कसोटीवरील ती काळ्या दगडावरील पांढरी रेघ ठरली. त्यांच्या काव्यात जीवनदर्शनाच्या चरमोत्कर्षाची अभिव्यक्ती दिसून येते. त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून जो संदेश दिला, तो तेव्हा जेवढा प्रासंगिक होता, तेवढाच तो आजही आहे. त्यामुळेच ते म्हणतात,

माला पेरत जुग गया, मिटा न मन का फेर

कर का मनका डारि दे, मन का मनका फेर.

संत कबीर यांच्या लेखनशैलीचे प्रामुख्याने दोन भागांत विभागणी करता येईल. एक रचनात्मक व दोन टीकात्मक. रचनात्मक शैलीत ते लोकांना दया, करुणा, क्षमा, आनंद, धैर्य, गुरूप्रेम, विश्वास, उदारभाव आदींचा संदेश देत असत. उदा.

गुरू पारस को अंतरो, जानत है सब संत

वह लोहा कंचन करे, ये करि लेय महंत.

दया धर्म का मूल है, पाप मूल संताप,

जहाँ क्षमा तहाँ धर्म है, जहाँ दया तहाँ आप.

टीकात्मक शैलीत कबीर लोकांना चुकीचे कर्म केल्यास त्याचे फळ वाईट मिळते, असा सतर्कतेचा इशारा देतात. उदा.

कबीर गर्व न कीजिए, उँचा देखि अवास,

काल परौं भुंई लेटना, ऊपर जमसी घास.

हाथ चढि के जो फिरै, ऊपर चँवर ढुराय

लोग कहैं सुख भोगवे, सीधे दोजख जाय.


सामाजिक थोतांड अन् अवडंबरावर हल्ला

संत कबीर यांनी तत्कालीन समाजाचे अवगुण अत्यंत परखडणे मांडत. त्यातून ते समाजाची थोतांड व अवडंबरातून सुटका करण्याचा प्रयत्न करत. त्यांचे दोहे आजही आपल्याला सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देतात. ते म्हणतात,

कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय,

आप ठग्या सुख उपजै और ठग्या दुःख होय.

अर्थात, संत कबीर चोरी, लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना सांगतात की, दुसऱ्याला लुटण्यापेक्षा स्वतः लुटले गेलेले बरे, कारण दुसऱ्याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दुःखात होणार.

सिंहों के लेहड नाही, हंसों की नहीं पाँत,

लालों की नहीं बोरियां, साध न चलै जमात.

अर्थात सिंह जंगलात एकटाच असतो, सिंहांचे कळप नसतात. तसेच हंसाचे थवे नसतात आणि रत्नांची पोती नसतात. याच प्रकारे संतही जाती-जमाती घेऊन चालत नाहीत. ते एकटेच जनकल्याणासाठी झटतात.

कबीर घास नींदिये, जो पाऊँ तलि होइ,

उडि पडै जब आँख में, बरी दुहेली होइ.

कबीर या दोह्यात म्हणतात, कुणालाही छोटे लेखू नये. पायाखालचे काडी कचराही जेव्हा डोळ्यात जातो, तेव्हा खूप त्रास होतो.

सब काहू का लीजिए, सांचा सबद निहार,

पच्छपात ना कीजिये, या कहे कबीर विचार.

कबीर या दोह्यातून सत्याची महती सांगतात. ते म्हणतात - सत्य कुठेही मिळाले तर ते निसंकोच भावनेने ग्रहण करावे. सत्याचा स्वीकार करताना भेदाभेदाचा विचार मनात येऊ देऊ नका.

मगहर येथे घेतला अखेरचा श्वास

संत कबीर यांचा मृत्यू हा त्यांच्या जीवनाचा व शिकवणींचा एक महत्त्वाचा टप्पा होता. असे मानले जाते की, 1518 मध्ये मगहर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कबीरदास यांनी मृत्यूला नेहमीच जीवनाचा एक अविभाज्य भाग मानले. त्यांनी आपल्या दोह्यांमधून मृत्यूच्या स्वीकाराविषयी व नश्वरतेच्या सत्यावर प्रकाश टाकला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शिकवणी आणि दोहे लोकांच्या मनात प्रेरणा देत राहिले. कबीरांच्या मृत्यू हा केवळ शारीरिक अंत नव्हता. तर त्यांच्या विचारांचा आणि तत्त्वज्ञानाचा अमर प्रवास सुरू झाला. तो आजही मानवतेला मार्गदर्शन करतो.

संत कबीर यांच्या जन्माविषयी जसे मतमतांतरे आहेत, तसे त्यांच्या मृत्यूविषयीही इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. कबीरांनी मृत्यूला नेहमीच जीवनाचा अविभाज्य भाग मानले. त्यांनी आपल्या दोह्यांमधून मृत्यूची स्वीकारार्हता, नश्वरतेचे सत्य व ईश्वरभक्तीच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. त्यांच्या मृत्यूच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, कबीरांनी मगहर येथे मृत्यू स्वीकारला. हे ठिकाण त्या काळी अशुभ मानले जायचे. पण कबीर यांना मृत्युच्या ठिकाणाने मुक्ती अर्थात मोक्ष मिळण्यावर कोणताही परिणाम होत नाही हे दाखवून द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मृत्यूसाठी मगहर हे ठिकाण निवडले.

संत कबीर यांच्या मृत्यूविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, कबीरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून हिंदू व मुस्लिम अनुयायांमध्ये वाद निर्माण झाला. हिंदू त्यांचा मृतदेह दहन, तर मुस्लिम दफन करू इच्छित होते. या वादानंतर जेव्हा त्यांचा मृतदेह पाहण्यासाठी चादर उघडली गेली, तेव्हा तिथे फक्त फुले आढळली. ही फुले दोन्ही समुदायांनी आपापल्या रीतीने वाटून घेतली. यातून कबीरांचा सर्वधर्मसमभावाचा संदेश अधोरेखित होतो. कबीरांचा मृत्यू हा त्यांच्या शारीरिक अस्तित्वाचा अंत होता, पण त्यांचे दोहे व तत्त्वज्ञान आजही लाखो लोकांना जातीपातीच्या बंधनांतून मुक्त होऊन सत्य आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारण्याचा उपदेश देतात.

शेवटच्या दोह्यांबाबत मतमतांतरे

संत कबीर यांच्या शेवटच्या दोह्यांबद्दल स्पष्ट ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. कारण त्यांच्या दोह्यांचे संकलन व लेखन त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी केले. तथापि, कबीरांच्या शिकवणींमधील काही दोहे त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्याशी आणि मृत्यूच्या सत्याशी संबंधित मानले जातात. खाली कबीरांचे काही प्रसिद्ध दोहे दिले आहेत, जे मृत्यू, नश्वरता आणि जीवनाच्या साराशी संबंधित आहेत.

काल करे सो आज कर, आज करे सो अब,

पल में परलय होयगी, बहुरि करेगा कब.

अर्थात, उद्या जे करायचे आहे ते आज कर, आणि आज जे करायचे आहे ते आता कर. क्षणात सर्व नाश पावेल, मग पुन्हा कधी करशील?

माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय,

एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूँगी तोय.

अर्थात, माती कुंभाराला म्हणते, तू मला रोज का तुडवतोस? एक दिवस असा येईल की मीच तुला तुडवेल.

कबीर मृत्यु सब कउ खाए, कोई नहिं बाचै जाय,

जो बाचै सो हरि भजे, सोई सूरति पाय.

अर्थात, कबीर म्हणतात, मृत्यू सर्वांना गिळतो, कुणीही सुटत नाही. जो ईश्वराचे भजन करतो, तोच खरी मुक्ती मिळवतो.

या दोह्यांमधून कबीरांनी मृत्यूला जीवनाचा अटळ भाग मानले आणि ईश्वरभक्ती, सत्य व आत्मचिंतनावर भर दिला. त्यांच्या शेवटच्या काळातही त्यांनी मानवतेला साधेपणा आणि आध्यात्मिक जागरूकतेचा संदेश दिला.


0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा