भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

मुथुलक्ष्मी रेड्डी: भारताच्या पहिल्या महिला आमदार आणि देवदासी प्रथेच्या विरोधातील लढवय्या

भारताच्या उत्थानात महिलांचे योगदान हे एखाद्या तेजस्वी दीपस्तंभासारखे आहे. कुटुंबाच्या स्नेहमयी मायेपासून स्वातंत्र्याच्या रणांगणापर्यंत, शिक्षण, विज्ञान, कला, आरोग्य व सामाजिक क्रांतीच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास रचला. त्यातून भारताच्या प्रगतीचा मार्ग प्रकाशमान झाला. महिलांनी आपले अटळ धैर्य, असीम करुणा तथा दृढनिश्चयाने केवळ आपली स्वप्नेच सत्यात उतरवली नाही, तर सामाजिक वाईटांविरोधातही कंबर कसून लढा दिला. भारताच्या इतिहासात अशा अनेक थोर महिला होऊन गेल्यात. चला तर मग पाहूया महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा संघर्षमय जीवनपट... मुथुलक्ष्मी रेड्डी ह्या भारताच्या पहिल्या हाऊस सर्जन तथा स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिल्या महिला आमदार होत्या. त्यांचा जन्म 30 जुलै 1886 रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण स्वामी अय्यर असे होते. ते महाराजा महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांच्या मातोश्री चंद्रामाई यांचा देवदासी समुदायाशी संबंध होता. 

  एक मुलगी हायस्कूलमध्ये येऊन शिकते कशी?
मुथुलक्ष्मी मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी महाराजा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. पण कॉलेजचे प्राचार्य व इतर विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. त्यांच्या पार्श्वभूमीसह त्यांचे मुलगी असणे हे त्यामागचे कारण होते. कॉलेजमध्ये एखाद्या मुलीला प्रवेश दिला तर त्याचा परिणाम इतर पुरुष विद्यार्थ्यांवर होऊ शकतो अशी भीती प्राचार्यांना वाटत होते. पुदुकोट्टईच्या मार्तंड थोंडामन महाराजांनी या आक्षेपांवर दुर्लक्ष केले. त्यांनी मुथुलक्ष्मीला कॉलेजमध्ये प्रवेश दिला. शिष्यवृत्तीही दिली. पण विरोधामुळे त्यांच्या कॉलेजमधील वर्तनावर 3 महिने पाळत ठेवण्याची अट ठेवली. त्यातून त्यांचे चारित्र्य निष्कलंक आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यात आले.
 मुथुलक्ष्मी यांना वर्गात मुलांपासून वेगळे बसवण्यात येईल. त्यांच्या व मुलांच्या मध्यभागी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. शाळेची घंटा वाजल्यानंतर मुथुलक्ष्मी सर्वप्रथम वर्गाबाहेर पडत. त्यानंतर मुले बाहेर येत. त्यांनी चांगल्या गुणांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्यापुढे शिक्षिका होण्याचा प्रस्ताव ठेवला. पण त्यांची आकांक्षा त्याहून जास्त होती. त्यांनी 1907 साली मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला. तिथे प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांना राजांकडून 150 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानी 1912 साली 7 गोल्ड मेडलसह आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या मद्रास ( आताचे चेन्नई) येथे महिला व मुलांच्या सरकारी रुग्णालयात हाऊस सर्जन बनल्या. मुथुलक्ष्मी मद्रासमध्ये होत्या तेव्हा तिच्या चुलत बहिणीचा एका मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. त्यावेळच्या देवदासी प्रथेमुळे वडिलांवर बाळाची देखभाल करण्याची कोणतीही जबाबदारी नव्हती. मुथुलक्ष्मी या मुलाच्या देखभालीचा विडा उचलला. त्यांनी वैद्यकीय शिक्षण सुरू असताना या मुलाचे संगोपन केले.

सरोजिनी नायडू यांच्या भेटीने मिळाली प्रेरणा

मुथुलक्ष्मी वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. त्यावेळी थोर स्वातंत्र्यसेनिक तथा कवयित्री सरोजिनी नायडू त्यांच्या महाविद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. सरोजिनी नायडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी महिलांचे हक्क तथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची संधी नाकारली आणि 'विमेन्स इंडियन असोसिएशन'साठी काम करण्यास प्राधान्य दिले. महिलांना सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यामुळे त्या तमिळनाडूत आणि देशभरात आदर्श ठरल्या. मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची आठवण म्हणून तमिळनाडू सरकारने 30 जुलै हा दिवस 'हॉस्पिटल डे' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आरोग्यसेवेच्या प्रचारासाठी समर्पित आहे. 

लग्नापूर्वी नवऱ्यापुढे ठेवली महत्वाची अट

मुथुलक्ष्मी रेड्डी विमेंट इंडियन असोसिएशन मार्फत सामाजिक व राजकीय कार्य करू लागल्या. 1914 साली त्यांचा विवाह डॉक्टर टी सुंदर रेड्डी यांच्याशी झाला. पण लग्नापूर्वी त्यांनी आपल्या नवऱ्यापुढे ते आपल्या सामाजिक कार्यात व कोणत्याही गरजू व्यक्तीला वैद्यकीय मदत करण्याच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाहीत अशी अट ठेवली. ती त्यांनी आयुष्यभर पाळली. मुथुलक्ष्मी यांची निवड इंग्लंडला जाण्यासाठी झाली होती. पण कुटुंबाने त्यांना परदेशात जाण्यास नकार दिला. तामिळनाडूचे तत्कालीन आरोग्यमंत्री पनागल राजा यांनी मुथुलक्ष्मी यांना 1 वर्षांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश सरकारला दिले होते. 

 देवदासी प्रथेविरोधात ऐतिहासिक लढा 

'स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू धर्मशास्त्राच्या प्रभावामुळे अंधश्रद्धेच्या चरकात अडकलेल्या दलित समाज व त्यातही दलित स्त्री देवदासीसारख्या अनेक प्रश्नांनी वेढलेली होती. स्त्री म्हणून व त्याहीपेक्षा दलित स्त्री म्हणून तिच्या दुःखाची जात वेगळी आहे हे मुथुलक्ष्मी यांनी जाणले होते. विशेषतः अस्पृश्य जातीमध्ये देवदासी, मुरळ्या सोडण्याची जी अनिष्ट चाल आहे ती बंद करायला हवी. कारण त्यातून त्यांच्या शोषणाचा मार्ग खुला होतो, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी ही कुप्रथा कायद्याद्वारे बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण त्यांचा हा पुरोगामीपणा त्या काळातील काही मंडळींना रुचला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर बेंबीच्या देठापासून टीका केली.' मुथुलक्ष्मी यांच्या आई चंद्रामाई देवदासी प्रथेशी संबंधित होत्या. त्यामुळे त्यांना या कुप्रथेचे दुष्परिणाम जवळून दिसले. देवदासी प्रथेत तरुण मुलींना मंदिरांमध्ये 'देवाच्या सेवेसाठी' वाहिले जात होते. त्यातून त्यांचे शोषण व्हायचे. मुथुलक्ष्मींनी या प्रथेविरोधात कठोर लढा दिला. 

मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 5 सप्टेंबर 1929 रोजी विधान परिषदेच्या पटलावर 1926 च्या हिंदू धर्मादा अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार या कायद्याच्या कलम 44 मध्ये एक नवा खंड जोड्यात आला. त्यात हे मान्य करण्यात आले की, धार्मिक वेश्यावृत्तीची सुरुवात अत्यंत मोठ्या व अतिपवित्र उद्देशांसाठी सुरू करण्यात आली, पण नंतर ती अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत पोहोचली. त्यामुळे या कायद्याद्वारे स्त्री-अर्पण करण्याच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली. मुथुलक्ष्मी यांनी मद्रास विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. त्यात त्यांनी देवदासी प्रथेला 'सतीप्रथेचे सर्वात वाईट रूप' व 'धार्मिक अपराध' अशी उपमा दिली. धर्मांध मंडळीच्या विरोधाला न जुमानता त्यांनी हा प्रस्ताव यशस्वीपणे मांडला, आणि 1947 मध्ये ही प्रथा कायदेशीररित्या बंद झाली. हा त्यांच्या सामाजिक सुधारणांमधील सर्वात मोठा विजय होता. मुथुलक्ष्मी यांनी महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करताना त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, देवदासी प्रथेचा अंत, वेश्यागृहे बंद करण्यासाठी आणि महिला व मुलांची तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. 

महात्मा गांधींची घेतली भेट 

मुथुलक्ष्मी यांनी सप्टेंबर 1927 मध्ये श्रीनिवास अयंगार यांच्या निवासस्थानी महात्मा गांधी यांची भेट घेतली. मद्रास विधान परिषदेच्या सदस्या म्हणून त्यांनी गांधींकडे देवदासी प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी त्यांचे समर्थन मागितले. त्यानंतर गांधींनी यंग इंडियामध्ये एक लिहून त्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. 1920 मध्ये मिठाच्या सत्याग्रहावेळी महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुथुलक्ष्मी यांनी मद्रास विधान परिषदेच्या आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला गांधींना पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेण्यात आले. तिथेही त्यांनी इंग्रजांविरोधातील आपला लढा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प केला. गांधींची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. हे ऐकून मुथुलक्ष्मी यांना दुःख झाले. त्यांनी भारतीय महिला संघाच्या सदस्यांच्या मदतीने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना सभांचे आयोजन केले. 

बालविवाहाविरोधात आवाज 

त्या काळात बालविवाह ही एक सामान्य प्रथा होती. मुथुलक्ष्मींनी याविरोधात ठामपणे आवाज उठवला. विवाहासाठी मुलींच्या संमतीचे वय 14 वर्षांपर्यंत वाढवण्याचा कायदा मांडला. त्यांनी मुलींवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाविरोधातही कायदा बनवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जेव्हा त्यांच्या स्वत:च्या विवाहाची चर्चा सुरू झाली, तेव्हा त्यांनी लहान वयात लग्न करण्यास ठाम नकार दिला. त्यांनी स्वतःच्या वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य दिले. डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी 19 ते 25 जानेवारी 1931 पर्यंत लाहोर येथे झालेल्या पहिल्या आशियाई महिला संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले. त्या 1933 ते 1947 पर्यंत भारतीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षाही राहिल्या. त्यांनी कॅन्सर केअर फंडही सुरू केला. त्या राज्याच्या समाज कल्याण बोर्डाच्या पहिल्या अध्यक्षाही होत्या. 

अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना

मुथुलक्ष्मी यांच्या धाकट्या बहिणीचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्याचा त्यांना जबर धक्का बसला. या घटनेतून सावरून त्यांनी 1954 साली चेन्नई येथे अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. दक्षिण भारतातील हे पहिले तर देशातील दुसरे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र आहे. आज ही संस्था जगातील सर्वात मोठ्या कॅन्सर रुग्णालयांपैकी एक मानली जाते. या संस्थेत दरवर्षी 80 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. मुथुलक्ष्मी यांनी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृती केली. तसेच गरीब रुग्णांसाठी मोफत उपचाराची व्यवस्था केली. 1974 मध्ये अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट प्रादेशिक कर्करोक संशोधन व उपचार केंद्र म्हणून घोषित झाले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्याला सेंटर ऑफ एक्सलेन्स म्हणून मान्यताही दिली. येथे 40 टक्के रुग्णांना मोफत उपचार, तर उर्वरित रुग्णांना नाममात्र शुल्क आकारले जाते. मॉलिक्युलर ऑन्कॉलॉजी व क्लिनिकल ट्रायल्समधील अत्याधुनिक संशोधनही येथे केले जाते. 

आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी

मुथुलक्ष्मी यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांचे पुस्तक 'माय एक्सपिरीयन्स अॅज अ लेजिस्लेटर'मध्ये त्यांच्या कार्याची नोंद आहे. त्यांनी महिला व मुलांसाठी एक विशेष रुग्णालय स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. सरकारने त्यांचा सल्ला स्वीकारला आणि प्रसूती रुग्णालयात बाल विभाग उघडला. त्यांनी नगरपालिका तसेच इतर स्थानिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची पद्धतशीर वैद्यकीय तपासणी करण्याची शिफारस केली. ट्रिप्लिकेन येथील कस्तुरबा रुग्णालय हे त्यांच्या प्रयत्नांचे स्मारक आहे. मुथुलक्ष्मी रेड्डी यांची इंग्लडमधील महिला व मुलांच्या आरोग्यासंबंधी एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना इंग्लंडला जाण्यास परवानगी नाकारली. पण मद्रास प्रेसिडेन्सीचे तत्कालीन आरोग्य मंत्री पनागल राजा यांना आपल्या प्रांतातील गरिबांच्या कल्याणासाठी नेहमीच चिंता होती. त्यामुळे प्रांतातील वैद्यकीय शिक्षण, मुलांचे शिक्षण, कुटुंब नियोजन व स्वच्छतेच्या विषयांवर काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुथुलक्ष्मी यांच्या परदेश दौऱ्याला आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले.

22 जुलै 1968 साली झाले निधन 

मुथुलक्ष्मी यांच्या योगदानाची दखल घेत सरकारने 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 22 जुलै 1968 साली वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचे चेन्नईत निधन झाले. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे निष्ठा, करुणा आणि सामाजिक बदलांच्या अथक प्रयत्नांचा संगम होता. देवदासी प्रथेच्या निर्मुलनापासून कर्करोग उपचारांच्या क्षेत्रातील क्रांतीपर्यंत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व समाजातील वंचितांसाठी अखंड लढा दिला. त्यांच्या निधनामुळे भारताने एक मानवतेची एक खरी सेवक गमावली. पण त्यांचा वारसा आजही लाखो जीवनांना प्रेरणा देत आहे.
0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा