भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

अय्यनकाली: दलितांचा स्वाभिमान आणि सामाजिक क्रांतीचा प्रणेता

आज केरळ भारतातील एक पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते. पण याच केरळात दलितांना शतकानुशतके आपल्या मानवाधिकारांपासून वंचित राहून जनावरांसारखे जीवन जगावे लागत होते. अस्पृश्य घोषित करण्यात आलेल्या या वर्गाने ज्या गुलामी व वर्चस्ववादाचा अनुभव घेतला, तो अतिशय वेदनादायी व भयंकर असा होता. धनदांडगे जमीनदार व सरंजामदारांचे गुलाम म्हणून राहणे हीच त्यांची नियती होती. पुरुषच नव्हे तर महिलांसह सर्वच लहानथोरांना उन, वारा, पाऊस, थंडी आदी कशाचीही पर्वा न करता या लोकांची धान्याची कोठारे कायम भरून राहतील याची तजवीज करावी लागे.

आपल्या आयुष्यात काही बदल होईल याची किंचीत कल्पनाही त्यांना करता येत नव्हती. अशा या बिकट परिस्थितीत अय्यनकाली यांचा जन्म झाला. त्यांनी दलितोद्धाराचे महान कार्य हाती घेतले. त्यांच्या अथक संघर्षामुळे दलितांचा उत्कर्ष झाला. केरळच्या सामाजिक व राजकीय संरचनेत अमुलाग्र बदल झाला. त्याचा परिणाम म्हणून आज केरळ जे आहे ते दिसते. चला तर मग घेऊया महात्मा अय्यनकाली यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा...


त्रावणकोरच्या वेंगणूर येथे जन्म

त्रावणकोर राज्य (थिरुविथामकूर) दक्षिण भारतातील 1729 ते 1949 पर्यंत अस्तित्वात असणारे एक महत्त्वपूर्ण राज्य होते. ते विद्यमान केरळच्या दक्षिण भागापासून तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्याच्या काही भागापर्यंत पसरले होते. तिरुवनंतपुरम ही त्याची राजधानी होती. याच तिरुवनंतपुरमपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेंगणूर गावातील पुलायार या अस्पृश्य मानल्या समाजात अय्यनकाली यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यन व आईचे नाव माला असे होते. या दाम्पत्याला एकूण 8 अपत्य होती. त्यात अय्यनकाली हे सर्वात थोरले होते.

अय्यन हे पी. ओ. परमेश्वरन पिल्लई नामक एका जमीनदाराकडे शेतमजूर किंवा कास्तकार म्हणून काम करत होते. त्यांच्या कामावर खूश होऊन परमेश्वरन यांनी त्यांना आपला 5 एकराचा एक तुकडा दिला. त्यावेळच्या हिशोबाने ही खूप मोठी संपत्ती होती. पुलय समाजाच्या व्यक्तीकडे जमिनीचा एवढा तुकडा असणे ही एक असामान्य गोष्ट होती. या जमिनीच्या बळावरच अय्यन यांना चांगले दिवस आले.


अय्यन यांनी आपल्या मुलांना शेती कसण्यास जुंपले. त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कुटुंबातील थोरला मुलगा म्हणून कालीच्या नावाच्या अगोदर त्यांच्या वडिलांचे नाव जोडण्यात आले. त्यामुळे ते अय्यनकाली या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या काळी दलितांना शाळेची पायरी चढण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे अय्यनकाली यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. पण या निरक्षर व्यक्तीचे चिंतन, संघटन क्षमता व धाडसाला तोड नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 1891 साली जन्म झाला, तेव्हा अय्यनकाली यांच्या आंदोलनाला चांगलीच धार चढली होती.

त्रावणकोर राज्यात जातीयवाद हा सामाजिक रचनेतील एक महत्त्वाचा व जटिल मुद्दा होता. मातृसत्ताक समाज असूनही त्रावणकोरमध्ये उच्चवर्णियांना काही विशेषाधिकार प्राप्त होते. तर खालच्या जातींना (दलित) मंदिर, शाळा व सार्वजनिक रस्त्यांवर मर्यादित प्रवेश होता. या सामाजिक भेदभावाला आव्हान देणे महाकठीण काम होते. पण अय्यनकाली यांनी याविरोधात दंड थोपटले आणि आधुनिक केरळच्या सामाजिक सुधारणा चळवळींचा पाया घातला.

अय्यनकाली लहानपणापासून निर्भिड बाण्याचे होते. एकदा ते आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. त्यांचा चेंडू एका सवर्ण व्यक्तीच्या घरावर गेला. त्या व्यक्तीने काली यांना अपशब्द बोलले. त्यांना धमकावले. या घटनेचा त्यांच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला. ते घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या आईवडिलांना ही गोष्ट समजली होती. त्यांनाही आपल्या मुलाला फटकारले. यामुळे त्यांच्या मनाला झालेली जखम अधिकच गहिरी झाली. वयाच्या 25 वर्षी त्यांचा चेल्लम्मा यांच्याशी विवाह झाला.

महिलांना छाती झाकण्याची परवानगी मिळवून दिली

अय्यनकाली महिला अधिकारांचे कडवे समर्थक होते. त्यांनी दलित महिलांविरोधात होणाऱ्या भेदभावाविरोधात निकराने लढा दिला. त्यांनी दलित महिलांना त्यांच्या छातीचा भाग झाकण्याचा अधिकार मिळवून दिला. 20 व्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत दलित महिलांना दास्यत्वाचे लक्षण म्हणून छाती उघडी ठेवण्यास भाग पाडले जात असे. यामुळे उच्च जातीच्या पुरुषांकडून त्यांना लैंगिक छळ व हिंसाचार सहन करावा लागत होता. अय्यनकाली यांनी या अमानवी प्रथेला आव्हान दिले. यासाठी त्यांनी मारु मरक्कल समारम सारखे एक जनआंदोलन उभे केले.

या आंदोलनाचे बंड 1895 साली सुरू झाले. एकदा अय्यनकाली यांची पत्नी चेल्लम्मा व मेहुणी शरीराचा वरचा भाग झाकून सार्वजनिक रस्त्याने जात होत्या. तेव्हा नायरांच्या एक गटाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे कपडे फाडले. त्यांना मारहाण केली. अय्यनकाली त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी हल्लेखोरांशी दोनहात केले. या घटनेमुळे त्रावणकोरमध्ये निदर्शने व संघर्ष सुरू झाला. त्यात हजारो दलित महिलांनी स्तन झाकण्यावरील बंदी धुडकावून लावली. हे बंड त्रावणकोरच्या राजांनी 1916 पर्यंत दलित महिलांना त्यांचे स्तन झाकण्याची परवानगी देईपर्यंत 2 दशकांहून अधिक काळापर्यंत चालले.

अय्यनकाली पद (सेना) ची स्थापना

अय्यनकाली यांनी सामाजिक लढा पुकारण्यासाठी पुलय समाजाच्या तरुणांची मोट बांधली. त्यांनी अय्यनकाल पदची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उच्चवर्णियांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. हिंसेचा बदला हिंसेने घेतला जाऊ लागला. यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. हे सर्व सहकारी अय्यनकाली यांना उरपिल्लई किंवा मूथपिल्लई अर्थात आपला हिरो म्हणून संबोधित करत.

बैलगाडी यात्रेची क्रांती (1893)

अय्यनकाली यांच्या काळात दलितांना सार्वजनिक रस्त्याने चालण्यास बंदी होती. त्यांना उघड्या अंगाने, अनवाणी पायाने चिखलाने माखलेल्या पायवाटेने चालावे लागले. या स्थितीत ते बैलगाडीला स्पर्श करण्याचेही स्वप्न पाहू शकत नव्हते. पण काली यांनी ही परंपरा मोडून काढण्यासाठी एक सुंदर बैलगाडी खरेदी केली. या बैलगाडीला तेवढेच सुंदर पांढरे बैल जोडले आणि निघाले थेट हमरस्त्याने...

उच्चवर्णीय नायर समाजाला त्यांची ही कृती रुचली नाही. ते त्यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धाऊन गेले. त्यांनी काली यांची बैलगाडी घेरली. हे पाहून अय्यनकाली यांनी त्यांना दोन-तीनदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या घरी जाऊ द्या, अशी विनंती केली. पण ते ऐकत नव्हते. अखेर त्यांनी झटकन आपल्या कंबरेचा खंजीर काढला आणि ते त्यांच्या अंगावर तुटून पडले. आता जास्त शहाणपणा दाखवला तर तुम्हाला या खंजीरचा प्रसाद मिळेल असे ते त्यांना ठणकावत म्हणाले. अय्यंकाली यांचे हे रौद्ररूप पाहून नायर समाजाचे तरुण आल्यापावली पळून गेले. अशा प्रकारे अय्यनकाली यांनी आपल्या स्वाभिमानाची पहिली लढाई जिंकली होती.

या घटनेनंतर अय्यंकाली यांनी बराच वेळ त्यांना वर्जित असलेल्या हमरस्त्याने बैलगाडी दामटली. अशा प्रकारे त्यांनी दलितांना हमरस्त्यावर येण्यास असणाऱ्या बंदीच्या चिंधड्या उडवल्या. या घटनेमुळे पुलया समाजात एका क्रांतीचे बीजारोपण झाले.

गाजलेले चालियार बंड

अय्यनकाली यांनी नंतर या आंदोलनाला अधिक व्यापक रूप दिले. 1898 साली त्यांनी आपल्या समाजबांधवांना एकत्र करून प्रतिबंधित हमरस्त्यांवर चालण्याचा निर्णय घेतला. ते स्थानिक बाजारपेठ असणाऱ्या अरलुम्मुडुला जाणाऱ्या मार्गाने पुढे गेले. अय्यनकाली व त्यांचे सहकारी बलरामपूरमच्या चालियर गल्लीत पोहोचले तेव्हा नायरांनी त्यांचा रस्ता रोखला. त्यांच्यावर हल्ला केला. पण अस्पृशांनी त्याचा बाणेदारपणे सामना केला. यामुळे हल्लेखोरांना काढता पाय घ्यावा लागला. यामुळे दलितांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी बिनधोकपणे बंदी असणाऱ्या रस्त्यांवर चालण्यास सुरुवात केली.

या घटनेचे लोन केवळ बलरामपूरपर्यंतच मर्यादित राहिले नाही. ते कषक्कुट्टम व कमियापुरम सारख्या आसपासच्या गावांतही पसरले. यामुळे गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली. इतिहासात या घटेनला चालियार बंड म्हणून ओळखले जाते. दलितांनी रस्त्यांवर चालणे सुरू केले. पण त्यांच्यासाठी बाजारपेठ अजूनही बंद होती. हा अन्याय दूर करण्यासाठी अय्यनकाली नेडुमंगडु बाजारात शिरले. तिथेही भयानक संघर्ष झाला. अय्यनकाली यांच्या नेतृत्वातील दलित कार्यकर्त्यांनी त्याचा निकराने सामना केला.

साधुजन परिपालन संघमची स्थापना

अय्यनकाली यांना आपल्या समुदायाला त्यांचे अधिकार मिळवून देण्याच्या संघर्षात एका मजबूत संघटनेची गरज भासत होती. त्यांच्यापुढे एस एन डी पी योगम् यांचे उदाहरण होते. त्यांना स्वतःही संघटना बांधणीचा अनुभव होता. परिणामी, 1907 साली त्यांनी साधुजन परिपालन संघमची स्थापना केली. या संघटनेत केवळ पुलयच नव्हे तर सर्वच समाजाच्या गरिब व वंचितांचा समावेश होता. या संघटनेचे एक संविधान तयार करण्यात आले. ते 24 तासांत विभागण्यात आले. त्यात दलितांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अधिकार मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला.

अय्यनकाली यांनी ज्या गोष्टींवर भर दिला त्यात साफसफाई, स्वच्छता, शिस्त व देवावर विश्वास यांचा समावेश होता. संघटनेने आपल्या सुरुवातीच्या बैठकांतच मजुरांना आठवडी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी सुट्टीच्या दिवशी या मजुरांनी संघटनेच्या बैठकीला हजर राहून आपल्या समस्यांवर चर्चा करावी अशी अटही घातली. काही दिवसांतच या संघटनेच्या शाखा संपूर्ण त्रावणकोरमध्ये पसरल्या. या संघटनेचे शुल्क म्हणून गोळा झालेल्या पैशांतून त्यांनी वेंगणूर येथे एक भूखंड खरेदी केला. त्यावर संघटनेचे कार्यालय बांधले. बी जे थॉमस यांची अस्पृश्यतेविरोधी संघटना या भागात तेव्हा सक्रिय होती. या संघटनेचे नंतर साधुजन परिपालन संघात विलिनीकरण झाले.

शाळा बांधली, पण सवर्णांनी रातोरात पाडली

अय्यनकाली यांनी शिक्षणावर फार जोर दिला. त्यांना स्वतःला शिक्षण घेता आले नाही. पण शिक्षणातूनच दलितांची गुलामगिरीतून मुक्ती होईल हे त्यांना ठावूक होते. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्याची जोरदार मागणी केली. पण ती पूर्ण झाली नाही. अखेर त्यांनी स्वतःच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 1904 मध्ये त्यांनी वेंगणूरमध्ये एक टूमदार शाळा सुरू केली. पण नायरांनी त्याच रात्री ती जाळून टाकली. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळा उभी करण्यात आली.

दलितांचा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सवर्णांना रूचला नाही. त्यांनी त्यांची शाळा उद्ध्वस्त केली. कारण, दलित शिकले तर ब्राह्मणवादी गुलामगिरीच्या व्यवस्थेतून मुक्त होतील हे त्यांना चांगलेच माहिती होते.

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुलय जातीच्या एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. ही कामचलाऊ व्यवस्था होती. सर्वच सोईसुविधांपासून वंचित असणारी ही शाळा दलितांच्या केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर चालत होती. ही एक अशी शाळा होती, ज्यात ब्लॅकबोर्डही (फळा) नव्हता. विद्यार्थ्यांसाठी जमिनीवर पडलेली वाळूच पुस्तक होती. या वाळूवर त्यांची बोटे एखाद्या पेनासारखी फिरत होती.

सरकारचा शाळेची कवाडे खुली करण्याचा आदेश, पण...

अय्यनकाली यांनी त्रावणकोर प्रशासनाकडे अस्पृश्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्याची मागणी केली. तसा अर्जही केला. त्यासाठी आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनापुढे नमते घेत सरकारने 1910 साल सरकारी शाळेत मुलांना प्रवेश देण्याचा आदेश जारी केला. सवर्ण कर्मचाऱ्यांनी तो मध्येच दाबून ठेवला. त्यावेळी त्रावणकोरच्या शिक्षण विभागाचे संचालक मिशेल, तर दीवान पी राजगोपालचारी होते. हे दोघेही दलितांच्या शिक्षणाप्रती अत्यंत संवेदनशील होते. प्रत्यक्षात राजगोपालचारी यांनी 1907 सालीच अय्यनकाली यांच्या अर्जावर सकारात्मक आदेश जारी केला होता. पण अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी हा आदेश दाबून ठेवला होता.

त्यानंतर अय्यनकाली यांनी राजगोपालचारी यांची भेट घेतली. या भेटीत राजगोपालचारी यांनी त्यांना अस्पृश्यांच्या शिक्षणाचा आदेश 1907 सालीच काढण्यात आल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना हा आदेश सवर्ण कर्मचाऱ्यांनी मध्येच दाबून ठेवल्याचे समजले. काली व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी शाळेत जाऊन चौकशी केली. पण या शाळांनी सरकारचा असा कोणताही आदेश आपल्याला लागू नसल्याचे सांगितले.

दलित महिला शिक्षणाला दिले प्राधान्य

अय्यनकाली यांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी दलित महिलांना शिक्षणाचा अधिकारही मिळून दिला. दलित महिलांना अज्ञान व अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षण हवे असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी दलित मुलींसाठी शाळा स्थापन केल्या. त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी त्यांची मुलगी कल्याणी हिला शिक्षण घेण्यासही प्रोत्साहित केले. त्यानंतर कल्याणी केरळातील पहिल्या दलित महिला पदवीधरांपैकी एक बनल्या.

अय्यनकाली यांनी दलित महिलांसाठी सामूहिक सभा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून या महिलांना त्यांच्या तक्रारी, आकांक्षा व प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळत होती. त्यांनी साधुजन परिपालन संघम या त्यांच्या संघटनेच्या राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होण्यास प्रेरित केले.

दलितांचे अन्न चालते, पण ते चालत नाहीत का?

शालेय प्रशासनाचा हा व्यवहार अय्यनकाली यांच्या जिव्हारी लागला. हे लोक दलितांनी घाम गाळून पिकवलेले अन्न खात होते, पण त्यांची मुले शाळेत गेली की त्यांना विटाळ होत होता. कालीने संपाचे हत्यार उपसले. आमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतात काम करणार नाही, अशी घोषणा केली. शेतमजूर त्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात उतरले. सवर्ण संतापले. त्यांनी या संपाचा सामना करण्याचा निर्धार केला. त्यांनी शेतमजुरांना मारहाण केली.

पण त्यामुळे आंदोलकांना अधिकच चेव आला. त्यांनी जमीनदारांपुढे आणखी काही मागण्या केल्या. त्यांच्या मागण्या होत्या, छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जमीनदारांनी दलितांना मारहाण करू नये, शेतमजुरांना गुलाम म्हणून वागणूक देऊ नये, दलितांना हमरस्त्याने जाण्याची परवानगी देण्यात यावी. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले.

त्रावणकोरचे तत्कालीन शिक्षण संचालक डॉक्टर मिशेल यांना दलितांच्या दयनीय स्थितीची माहिती होती. त्यांनी दीवान पी. राजगोपालचारी यांची भेट घेऊन 1910 साली अस्पृश्यांच्या मुलांना शाळेची कवाडे खुली करण्याचा नवा आदेश जारी केला. पण या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दलितांना पुन्हा आंदोलन करावे लागले. अखेरीस शेतमजुरांच्या मागण्या मान्य झाल्या आणि त्यांचा संप मिटला.

दगडी माळा, लोखंडी बांगड्यांवर पाणी

त्यावेळी दलित महिला गुळगुळीत दगडापासून तयार झालेल्या माळा व लोखंडी तारांच्या बांगड्या घालत होत्या. त्यांना सोने व चांदी खरेदी करण्यास मनाई होती. कालीच्या नजरेतून दगड व लोखंडाचे दागिने हे गुलामगिरीचे प्रतीक होते. त्यामुळे त्यांनी महिलांना हे दागिने सोडण्याचे आवाहन केले. त्यानुसार महिलांनी हे दागिने घालणे सोडले. कोल्लम जिल्ह्यातील पेरिनाटू येथील महिलांनी हे दागिने सोडले तेव्हा सवर्णांनी त्याचा विरोध केला. यावरूनही दलित व दलितेतर यांच्यात मोठा संघर्ष झाला. 1915 मध्ये याच ठिकाणी दलितांचा एक कार्यक्रम झाला. त्यावर सर्वणांनी हल्ला चढवला.

या हल्ल्याची वार्ता देशात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाले. पण अय्यनकाली यांनी दलितांना शांततेचे आवाहन केले. अखेरिस सर्वच जातींच्या पुढाऱ्यांचे एक अधिवेशन कोल्लम येथे झाले. त्यावर एकमेकांवर आक्रमण न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषी हक्कांसाठी झालेला संघर्ष

अय्यनकाली यांनी पुलायार समुदायाला जमिनीवर मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. त्यांच्या काळात पुलायार हे प्रामुख्याने ग्रामीण गुलाम म्हणून काम करत होते. 1914 मध्ये त्यांनी पुलायार कामगार हडताळ आयोजित केली. यामुळे शेतमजुरांना कामाचे तास कमी करणे आणि मजुरी वाढवणे यासारखे हक्क मिळाले. या आंदोलनाने दलित समुदायाला आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला.

अय्यनकाली यांच्या काळात स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली होती. त्रावणकोर येथेही ही लाट उसळळी. पण कालीने या आंदोलनात भाग घेतला नाही. त्यांनी केवळ या आंदोलनाशी संबंधित स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली. स्वातंत्र्यसैनिकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले. विशेषतः ज्या दलितांनी या चळवळीत सहभाग घेतला. त्यांचेही कालीने तोंडभरून कौतुक केले.

अय्यनकाली यांच्या निधनाने एक युग संपले

अय्यनकाली यांनी दलितांचा उद्धार व प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले. यामुळे त्यांचे शरीर खंगले होते. त्यांना विविध आजारांनी ग्रासले. अखेरीस ते अंथरुणाला खिळले आणि त्यातच 18 जून 1941 रोजी त्यांचे निधन झाले. ​​​​​​अय्यनकाली हे नाव म्हणजे सामाजिक समतेच्या लढ्याचा अखंड ध्यास व अन्यायाविरुद्धच्या बंडखोरीचा अखंड नाद होता. त्यांच्या निधनाने केवळ केरळ नव्हे, तर संपूर्ण देश एका निर्भीड योद्ध्याला व दलित-शोषितांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका महामानवाला मुकला. त्यांनी अस्पृश्य समुदायाच्या शिक्षणासाठी, महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढताना दाखवलेला धैर्य व दृढनिश्चय आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो.

अय्यनकाली यांच्या निधनाने एक युग संपले. त्यांनी शतकानुशतके चालत आलेल्या अन्यायाच्या साखळ्या तोडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. खरा बदल हा केवळ शब्दांनी नव्हे, तर न थांबणाऱ्या संघर्षाने व समाजाला एकत्र बांधण्याच्या अटल विश्वासाने घडतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला वंदन करताना आपण त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे...

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा