भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

रविवार, ५ एप्रिल, २०२६

सोसायटीतल्या गोष्टी



संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला झुकला होता आणि सोसायटीच्या अंगणात नेहमीप्रमाणे गप्पांचा फड रंगायला सुरुवात झाली होती. मुलं खेळत होती, काही जण फिरायला निघाले होते, तर काहीजण बाकांवर बसून रोजच्या चर्चेत रमले होते.

त्या सोसायटीत वेगवेगळ्या स्वभावाचे लोक राहत होते. काही साधे, मनमिळावू. काही थोडे अबोल. आणि काही असेही, ज्यांना स्वतःचाच खूप अभिमान होता. शरद देशमुख हे त्यापैकीच एक. पैशाने श्रीमंत. मोठा फ्लॅट, गाडी, प्रतिष्ठा... सगळं होतं त्यांच्याकडे. पण बोलण्यात नेहमीच एक तुच्छतेचा सूर असायचा. 'अरे, हे लोक ना… काहीच कळत नाही त्यांना,' ते मित्रांमध्ये म्हणायचे. त्यांच्या नजरेत बहुतेक लोक 'किरकोळ'च होते. पण देशमुख एकटे नव्हते. त्यांच्या आजूबाजूला काही लोक नेहमीच असायचे, ज्यांना सोसायटीत 'होकार मंडळी' म्हणून ओळखलं जायचं.


देशमुख काहीही बोलले की, हे लोक लगेच म्हणायचे, 'हो सर, अगदी बरोबर!' 'तुमच्यासारखं कोणी विचारच करू शकत नाही.' 'तुम्ही आहात म्हणूनच सोसायटी चालते.' या सततच्या होकारामुळे देशमुखांचा आत्मविश्वास हळूहळू गर्वात बदलत गेला. त्यांना वाटू लागलं. आपण जे बोलतो, तेच अंतिम सत्य आहे.

हे 'होकार मंडळी' स्वतः काहीच करत नसत, पण देशमुखांच्या प्रत्येक वाक्यावर शिक्कामोर्तब करायचं काम मात्र प्रामाणिकपणे करत असत. कुणी विरोध केला, तर त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहायचे.



सोसायटीत गणेश पाटीलही राहत होता. तो सर्वांहून वेगळा होता. तो कधीच अकारण होकार देत नसे. चुकीचं वाटलं, तर शांतपणे स्वतःचं मत मांडायचा. आणि कदाचित म्हणूनच तो देशमुखांना थोडासा 'अप्रिय' वाटायचा. गणेश अत्यंत साधा माणूस. खासगी नोकरी. फार पैसे नव्हते, पण मन मात्र मोठं होतं. सोसायटीत कुणाचं काही काम अडकलं, तर पहिला फोन गणेशकडेच यायचा.

एकदा सोसायटीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. टाकीत काहीतरी बिघाड झाला होता. सगळे रहिवासी त्रस्त झाले. सकाळपासून पाणीच नव्हतं. लोकांची चिडचिड सुरू झाली.

शरद देशमुख खाली आले आणि मोठ्याने बोलू लागले, 'ही सोसायटी आहे की काहीतरी गावठी वस्ती? साधं पाणी व्यवस्थापनही जमत नाही!' त्यांच्या आवाजात चीडपेक्षा जास्त तुच्छता होती. तेवढ्यात त्यांच्या भोवतीची होकार मंडळी लगेच म्हणाली, 'हो सर, अगदी खरं!' 'हे लोक काही कामाचे नाहीत.'

पण त्यापैकी एकही जण पुढे येऊन उपाय सांगत नव्हता.

तेव्हा गणेश पुढे आला आणि शांतपणे उपाय मांडला. 'देशमुख साहेब, मी प्लंबरला फोन केला आहे. तो येतोय थोड्याच वेळात.'

'तुम्ही? तुम्ही काय करणार यात? 'हे काम प्रोफेशनल लोकांचं आहे. प्रत्येक गोष्टीत उडी मारायची सवय झाली आहे तुम्हाला,' देशमुख हसत म्हणाले.

गणेश काही बोलला नाही. फक्त हलकंसं हसला.

थोड्याच वेळात प्लंबर आला. पण त्याला टाकीपर्यंत पोहोचण्यासाठी एक खास चावी लागणार होती - जी सोसायटीच्या ऑफिसमध्ये ठेवलेली होती. आणि त्या ऑफिसची किल्ली? ती देशमुख साहेबांकडेच होती. कारण तेच त्या वर्षीचे चेअरमन होते.

सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. देशमुख थोडे गडबडले. 'अं... ती किल्ली मी... बहुतेक वर विसरलोय,' ते म्हणाले.

गणेश शांतपणे म्हणाला, 'काही हरकत नाही. चला, आपण दोघं जाऊन घेऊन येऊ.' वर जाताना देशमुख थोडे शांत झाले होते. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं - परिस्थिती किती पटकन बदलते. किल्ली आणून दिल्यावर काम सुरू झालं. काही वेळात पाणीपुरवठा सुरळीत झाला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

'धन्यवाद गणेशराव!' कुणीतरी म्हटलं. 'तुमच्यामुळे काम पटकन झालं.' देशमुख बाजूला उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज दिसत होती. 



काही दिवसांनी सोसायटीत गणपती उत्सवाची तयारी सुरू झाली. सगळे रहिवासी उत्साहाने कामाला लागले होते. कुणी सजावट करत होतं, कुणी कार्यक्रमाची आखणी. देशमुख नेहमीप्रमाणे फक्त सूचना देत होते. 'हे असं करा... ते तसं करा...' 

देशमुख सूचना देत होते, आणि त्यांच्या भोवतीचे तेच लोक पुन्हा म्हणत होते, 'वा सर, काय प्लॅनिंग आहे!' 'तुमच्यामुळेच कार्यक्रम भारी होणार.' पण प्रत्यक्षात काम करत होते ते गणेशसारखे साधे लोकच. त्यांचा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांशी त्याचा छान संवाद होता.

एकदा एका छोट्या मुलाने देशमुखांना विचारलं, 'काका, तुम्ही काही काम का करत नाही?' आजूबाजूचे लोक हसू लागले. देशमुख थोडे चिडले. 'मी व्यवस्थापन करतो. तेच मोठं काम आहे.' गणेशने मुलाला जवळ घेतलं आणि म्हणाला, 'अरे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने योगदान देतो. तेच महत्त्वाचं.'

देशमुख शांत झाले. पण त्यांच्या मनात काहीतरी हलत होतं. गणपतीच्या दिवशी कार्यक्रम खूप छान झाला. सगळे आनंदात होते. शेवटी सगळ्यांनी मिळून प्रसाद घेतला. देशमुख एकटेच एका कोपऱ्यात उभे होते. ते सगळ्यांकडे पाहत होते... हसणारे चेहरे, एकमेकांना मदत करणारे लोक, साध्या गोष्टीतून आनंद शोधणारे.

गणेश त्यांच्या जवळ आला. म्हणाला, 'काय साहेब, कार्यक्रम कसा वाटला?' देशमुख थोडा वेळ काही बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, 'खूप छान... आणि खूप काही शिकवलं.'

गणेश हसला. म्हणाला, 'आपण सगळे शिकतच असतो ना.'

देशमुख म्हणाले, 'मी कदाचित लोकांना कमी लेखत होतो. मला वाटायचं, पैसे असले की सगळं मिळतं. पण... आज कळलं की लोकांशिवाय काहीच शक्य नाही.'

गणेशने हलकं हसत उत्तर दिलं, 'माणूस मोठा त्याच्या मनाने असतो, पैशाने नाही.'

त्या दिवसानंतर देशमुख बदलले. त्यांच्या बोलण्यातला तो तुच्छतेचा सूर कमी झाला. ते गप्पांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यांना समजलं होतं - फक्त 'हो सर' म्हणणारे लोक आपल्या भोवती असले, तरी ते आपल्याला मोठं बनवत नाहीत. खरं मोठेपण तेव्हा येतं, जेव्हा कोणी आपल्याला चुकीचं दाखवण्याची हिंमत करतो... आणि आपण ती चूक स्वीकारण्याची तयारी ठेवतो.

अखेर सोसायटीच्या गप्पांमध्ये एक वेगळाच रंग भरला होता. जिथे आधी टीका होती, तिथे आता समजूत होती. जिथे गर्व होता, तिथे आता नम्रता होती. गर्व माणसाला अहंकारी बनवतो, पण माणुसकीच त्याला खऱ्या अर्थाने माणसाला स्वाभिमानी बनवते हे सर्वांना समजले होते. क्रमश:...

0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा