भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

10,500 वर्षांपूर्वीची महिला कशी दिसत होती?


10,500 वर्षांपूर्वीची महिला कशी दिसत होती? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आरशासमोर उभे राहून आपण आज स्वतःकडे पाहतो. पण हजारो वर्षांपूर्वीच्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर कोणत्या भावना उमटत असतील? तिच्या डोळ्यांत काही कुतूहल होते का? भीती होती का? की निसर्गाशी एकरूप झालेल्या जीवनाचे शांत तेज होते? 

कल्पना करा. सभोवती दाट अरण्य. वाहती नदी. शिकारीसाठी निघालेला समूह. आणि त्या समूहात ती. आधुनिक जग, शहरे, भाषा, लेखन काहीच नाही. तरीही ती आपल्यासारखीच माणूस होती. तिलाही भूक लागायची. तिलाही कुटुंब होते. तिलाही हसू व अश्रू माहिती होते. 


शतकानुशतके तिची ओळख मातीखाली दडून राहिली. फक्त हाडांचा सांगाडा उरला. पण विज्ञानाने पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर त्वचा चढवली. डोळ्यांना रंग दिला. भावनांना आकार दिला. आणि अचानक 10,500 वर्षांचे अंतर विरुन गेले. आज आपल्या डोळ्यांपुढे ती उभी राहिली आहे. 

होय, 1988 साली बेल्जियमच्या मार्गोक्स गुहेत (Margaux Cave) पुरातत्त्व संशोधकांना काही मानवी सांगाडे आढळले होते. हे ठिकाण बेल्जियमच्या डिनांट (Dinant) लगत आहे. त्या अवशेषांतील एक सांगाडा एका महिलेचा होता. तो काहीसा चांगल्या स्थितीत होता. शास्त्रज्ञांनी त्याची कार्बन डेटिंग चाचणी केली असता तो सांगाडा 10,500 वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले. हा काळ म्हणजे मध्य पाषाणयुग. त्याला इंग्रजीत Mesolithic असे म्हटले जाते. या संशोधनासंबंधीची माहिती Smithsonian Magazine मध्ये प्रकाशित झाली आहे. 

डीएनए तंत्रज्ञानाने चेहरा तयार

या महिलेच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यात तिच्या हाडांमधून मिळालेल्या अनुवांशिक घटकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून तिच्या डोळ्यांचा, त्वचेचा व केसांच्या रंगाची माहिती मिळाली. या संशोधनानुसार, तिचे डोळे गडद निळे होते. केसही गडद रंगाचे होते. पण त्वचा मध्यम ते किंचित गडद छटेची असावी. 

या माहितीच्या आधारावर बेल्जियमच्या गेन्ट विद्यापीठाच्या (Ghent University) संशोधकांनी डच पॅलिओ - कलाकार अल्फोन्स केनिस (Alfons Kennis) व अॅड्री केनिस (Adrie Kennis) यांच्या मदतीने या महिलेच्या कवटीचे 3D स्कॅनिंग केले. कवटीच्या आकारावरून चेहऱ्याची रचना ठरवली. DNA माहितीच्या आधारावर डोळ्यांचा व केसांचा रंग निश्चित करण्यात आला. (https://phys.org/news/2025-07-artists-scientists-life-prehistoric-woman.html)

शिकारी करणाऱ्या समूहातील होती महिला

शास्त्रज्ञांच्या मते, सदर महिला शिकारी समाजाचा भाग होती. त्या काळात शेतीची सुरुवात झाली नव्हती. लोक लहान लहान गटांत राहत होते. अन्नासाठी शिकार व वन उत्पादनांवर अवलंबून राहत. म्यूज व्हॅली (Meuse Valley) परिसरात अशा प्रकारचे मानवी वस्तीचे पुरावे मोठ्या प्रमाणात आढळले. त्यामुळे तिचे जीवनही भटकंती व निसर्गाधारित होते असे मानले जाते. 

या शोधामुळे प्राचीन युरोपीयन लोकांच्या शारीरिक वैशिष्ट्यांबाबतची समज अधिक स्पष्ट झाली. पूर्वी असे मानले जात होते की, त्या काळातील सर्व लोकांची त्वचा गडद होती. पण विविध ठिकाणी सापडलेल्या चेडर मॅन (Cheddar Man) या व्यक्तीचेही डोळे निळे होते. पण त्वचा अधिक गडद होती, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले. त्यामुळे मध्य पाषाणयुगातील लोकांमध्ये जैविक विविधता होती हे अधोरेखित झाले. 

विज्ञानाने तिच्या अस्तित्वाला दिला पुन्हा आकार

अखेरीस, या पुनर्निमित चेहऱ्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे, मानवी इतिहास हा केवळ तारखा व अवशेषांचा संच ानही. तो जिवंत माणसांचा प्रवास आहे. 10,500 वर्षांपूर्वी हयात असणारी ही महिला तंत्रज्ञानाच्या मदतीने आज आपल्यापुढे उभी राहिली. विज्ञानाने तिच्या अस्तित्वाला पुन्हा एकदा आकार दिला. 

पण तिच्या डोळ्यांमधील शांतता, तिच्या चेहऱ्यावरची स्थिरता व तिच्या अस्तित्वातील सामर्थ्य आपल्याला मानवजातीच्या अखंड परंपरेची जाणीव करून देते. काळ बदलला. जीवनशैली बदलली. पण माणुसकीचा धागा तसाच राहिला. त्यामुळेच हा चेहरा केवळ भूतकाळाचा नाही, तर आपल्या वर्तमानाशी जोडणारा एक जिवंत सेतू आहे. 


वरील फोटो पाहताना ती महिला कशी वाटते? ती कठोर परिस्थितीत जगलेली, पण मनाने खंबीर अशी भासते. पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा दिसत नाही. एक स्थिर आत्मविश्वास दिसतो. डोळ्यांत खोल शांतता आहे. जणू ती काही निसर्गाशीच एकरूप झाली असावी. तिच्या व्यक्तिमत्त्वात एक साधेपणाही आहे. पण त्यात एक विलक्षण ताकद दडलेली जाणवते. आधुनिक सौंदर्याच्या मापदंडापेक्षा वेगळी, पण अत्यंत प्रभावी. उलट एक वेगळी जवळीक जाणवते. ती परकी नाही असेच वाटते. ती आपलीच कुणीतरी पूर्वज आहे, अशी भावना मनात अलगद उमटते.



0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा