भाग्यदर्शी लोखंडे

लोकदृष्टी | सामाजिक न्याय | इतिहास | राजकारण | विज्ञान-तंत्रज्ञान | विचारवंत

बुधवार, ६ मे, २०२०

"कोविड-19" एक अनुभव.. !

"कोविड-19" नं संपूर्ण देशात धुमाकूळ घातलाय. या प्राणघातक विषाणूने आजपर्यंत देश-विदेशात अडीच लाखांहून अधिक बळी घेतलेत. तर 37 लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे.
याची दाहकता गरीब व श्रीमंत अशा दोन्ही देशांत सारखीच आहे. किंबहुना अमेरिकेसारखा बलाढ्य देशही यात पुरता होरपळून निघालाय. या आजाराची लागण साध्या स्पर्शाने होत असल्यामुळे नितांत सावध राहण्याची गरज आहे. हा विषाणु जेवढा घातक तेवढीच याची चाचणी प्रक्रियाही खूपच जिकिरीची आहे. डॉक्टर लोकांना संशयितांच्या घशातील लाळेचे व नाकातील स्रावाचे नमुणे घेण्यासाठी अक्षरशः डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत स्वतःला "पीपीई" कीटमध्ये बांधून घ्यावं लागतंय. एकाचं संक्रमण दुसऱ्याला होणार नाही यासाठी प्रत्येक चाचणीनंतर हातावर रसायन घेऊन ते स्वच्छ करावे लागतात. या धोकादायक स्थितीत एखादा संशयित शिंकला किंवा खोकलला तर त्यांच्या मनात निर्माण होणारी भावना काय असेल याची प्रचिती मला औरंगाबादच्या "MGM SPORT COMPLEX" मधील चाचणी केंद्रावर आली. येथे चाचणीसाठी येणाऱ्यांत वृद्धांपासून अवघ्या काही दिवसांच्या बाळाचाही समावेश होता. नमुना घेण्यासाठी डॉक्टरनं त्या नवजात बाळाच्या नाकात ती लहान काडी टाकली आणि ते बाळ लगेचच रडायला लागलं. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांचेच मन हेलावले. एक रुग्ण व त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच अशा चाचणी केंद्रांवर रांगा लावाव्या लागत आहेत. यांचे अहवाल निगेटिव्ह येतीलही. पण, चाचणीवेळी व चाचणीनंतर रिपोर्ट हातात येईपर्यंत मनाची होणारी घालमेल शब्दांत मांडणं महाकठीण काम आहे.
 कोरोनावर आज ना उद्या लस सापडेलही. पण, या रोगामुळे लोकांच्या मनावर उमटलेले ओरखडे कधीच न मिटणारे आहेत. कदाचित 'काळ' हे यावरील औषध असेलही. पण या विषाणूचा रंग बदलणारी रूपं पाहता "कोविड" जातीचा हा बॅक्टरीया "गोचिडा"सारखा असाच मानवजातीला चिकटून राहण्याची जास्त शक्यता आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे जगभरातील अर्थव्यस्थांना झालेले नुकसान वेगळेच आहे. जगातील कोट्यवधी लोकांवर या रोगामुळे बेरोजगार होण्याची वेळ आलीये. कष्टानं उभे केलेले नफ्यातले उद्योग मागच्या दीड महिन्यांत कोसळेलत. कदाचित, या उद्योगांवर अवलंबून असणारे असंख्य कामगार आता देशोधडीला लागतील. कारण, कंपन्यांवरच ताण आल्यामुळे त्या अधिक श्रमिकांचे ओझे उचलू शकणार नाहीत. त्यातचं  सरकारांनी नवीन प्रकल्पांना कात्री लावल्याने व नोकरभरती बंद केल्याने  ही स्थिती अधिक बिकट बनेल. यात काहीच शंका नाही. किंबहुना यात शंका घेण्याचे धाडसच मुळात कुणी करणार नाही.
तूर्त, संकट मोठं आहे. प्रत्येकाला आपापल्या पातळीवर काळजी घ्यावीच लागेल!
...आणि हो मी सुरक्षित आहे.

-भाग्यदर्शी लोखंडे
0+ WhatsApp Great

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा