जातीयवाद हा आपल्या भारतीय लोकांच्या रक्तामध्ये खूप पूर्वीपासून भिनलाय. एवढा की तो आपल्या रक्तातून काढला तर आपण भारतीय म्हणून जगूच शकणार नाही. आपण हे 4 माणसांत कबूल करत नाही. पण आपण आपली कृती किंवा अन्य गोष्टींमधून तो उघडपणे कबूल करतो. एवढेच नाही तर जातीयवादाचे निर्लज्जपणे समर्थनही करतो. कसे ते पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या एका घटनेवरून दिसून येते.
पुण्याच्या वाघोलीतील सिद्धी अपार्टमेंटमधील काही फ्लॅटधारकांनी एका बौद्ध समाजाच्या सभासदाला जातीवाचक शिवीगाळ केली. यामुळे या फ्लॅटधारकाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार बिल्डर अर्थात बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात बिल्डरने बौद्ध समाजाच्या व्यक्तीला फ्लॅटची विक्री केली होती. कालांतराने इतर फ्लॅट धारकांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. पण हा फ्लॅट धारक बधला नाही. तो सुशिक्षित होता. त्याने सोसायटीतील धर्मांध व्यक्तींचा सामना केला. पण एकेदिवशी त्रास सहन न झाल्याने त्याने पोलिस चौकीपुढे स्वतःला पेटवून घेतले.
या घटनेमुळे उच्चभ्रू सोसायटीतील जातीयवादाचे हे प्रकरण उजेडात आले. सध्या हे प्रकरण पुणेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात चर्चीले जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांचा सर्वच स्तरातून निषेध सुरू आहे. या घटनेतल आरोपी तुरुंगात खडी तर फोडतच आहेत, शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही समाज संशयाच्या नजरेतून पाहत आहे. यामुळे त्यांना त्यांच्याच सोसायटीत राहणे अवघड झाले आहे.
...तर सांगायचे असे की, जातीयवाद आजही संपला नाही. तो कोणत्या न कोणत्या रुपात आजही जिवंत आहे. फरक एवढाच की काहींच्या तो ओठावर येतो आणि काहींच्या पोटात शिजतो. कदाचित या लोकांना दुसऱ्यांचा जातीय द्वेष केल्याशिवाय अन्न पचत नसावे. जातीयवाद करणारी लोके 'मी जातीयवाद मानत नाही' असे म्हणण्यात सर्वात पुढे असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्राच्या घरी गेलो. शहरातील उच्चभ्रू वसाहतीत असणारे त्याचे ऐसपैस घर हेवा वाटावा असे होते. पाहताक्षणी कुणीही या घराच्या प्रेमात पडेल असे हे घर होते. त्याच्या बायकोनेही घर चांगलेच सजवले होते. आमचा चहापाणी झाला. जेवणही झाले. त्यानंतर निवांत गप्पाटप्पा रंगल्या. एकेक विषय निघत गेला. चर्चा समाजशास्त्रावर येऊन ठेपली. मग काय. हा तर माझा आवडता विषय... विषय निघत गेले आणि चर्चा रंगत गेली. अखेर मित्राच्या तोंडातून त्याच्या सोसायटीत सुरू असलेल्या जातीयवादाचा विषय निघाला. त्यानंतर त्याने जे सांगितले ते ऐकूण माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचली.
तर विषय असा होता की, माझ्या मित्राने जवळपास अर्धा कोटी खर्चून शहरातील मध्यवस्तीत फ्लॅट घेतला होता. पण त्या सोसायटीतील काही लोक प्रचंड जातीयवादी होते. माझा मित्र एक उत्साही कार्यकर्ता होता. तो शाळेपासून सर्वच कार्यक्रमांत हिरिरीने भाग घेत होता. ब्राह्मण, मराठा, राजपूत आदी सर्वच जाती धर्मांत त्याचे मित्र होते. तो त्यांच्या कार्यक्रमांनाही न चुकता हजर राहत होता. पण आज त्याला त्याच्याच सोसायटीत जातीयवादाच्या निखाऱ्याचा सामना करावा लागत होता.
मी म्हणालो, हे बघ तू असाच सहन करत बसलास तर हा त्रास कमी होणार नाही. माझे काही वकील मित्र आहेत. त्यांना तू भेट. मी स्वतः तुझ्यासोबत येतो. आपण यावर उपाय शोधू. तो हो म्हणाला. मग आम्ही शहरातीलच एका वकिलाकडे गेलो. हा माझा वकील मित्र थेट हायकोर्टात प्रॅक्टीस करतो. जनहित याचिका हा त्याचा आवडीचा विषय. त्याला हा विषय सांगितल्यानंतर त्यालाही चटकन या विषयाचे गांभीर्य समजले. त्याने त्याच्याकडे येणाऱ्या अनेक अशिलांचे अनुभव सांगितले. तसेच हे प्रकरण जातीयवाद करणाऱ्या माणसांना कसे जड जाईल? हे ही पटवून सांगितले.
माझ्या मित्राला धीर आला. मी तर त्याच्यासोबत होतोच. पण आता माझा वकील मित्र व त्याच्या संपर्कातले काही चांगले माणसेही आमच्यासोबत जोडली गेली. याकामी आम्ही एका आंबेडकरी संघटनेचीही मदत घेतली. मग काय, आम्ही थेट आमच्या मित्राची सोसायटी ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलो. साहजिकच पत्रकार असल्यामु्ळे माझ्या ओळखीचा एक कर्मचारी तिथेही निघाला. आम्ही त्याच्या मदतीने तेथील वरिष्ठांना संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. त्यानंतर आम्ही पोलिस, आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, वकील व मी स्वतः त्या सोसायटीत गेलो. तेथील अध्यक्ष व सचिवांना बोलावून त्यांच्या माघारी किंवा त्यांच्या सहमतीने सुरू असणाऱ्या जातीयवादाचा जाब विचारला.
आमची आक्रमक भूमिका पाहून या दोघांचीही चांगलीच तंतरली. त्यांनी ताबडतोब सदस्यांची मीटिंग बोलावली. त्यानंतर जे काही घडले ते थक्क करणारे होते. जातीयवाद करणारे जे काही दोन-चार लोक होते. तेच जातीयवाद किती वाईट आहे हे सांगत होते. हे पाहून माझ्या मित्राला या तणावातही हसू आवरत नव्हते. मी त्याच्या चेहऱ्यावरील भाव वाचले आणि हाच तो जातीयवाद करणारा महामानव असल्याचे माझ्या लक्षात आले. आम्ही लगेच त्या महामानवाला वेगवेगळे प्रश्न विचारले. आता मित्रालाही धीर आला होता. त्याने लगेच त्या व्यक्तीला फैलावर घेतले. मनातील सगळीच गरळ ओकली. यावेळी सोसायटीतील इतर लोकांनीही या व्यक्तीची छी थू केली.
त्यानंतर या व्यक्तीने माफी मागून विषय मिटवला. पण आम्हाला हे प्रकरण तडीस न्यायचे होते. आम्ही पोलिसांकरवी या सोसायटीतील व्यक्तींना समज दिली. तसेच कायद्यातील दंडात्मक तरतुदीही समजावून सांगितल्या. विशेषतः मित्राने सांगितलेल्या व्यक्तींना आपल्या शब्दांत समज दिली. याचा परिणाम असा झाला की, झाल्या अपमानामुळे या व्यक्तींना आता स्वतःच्याच सोसायटीत लोकांच्या नजरांचा सामना करणे अवघड झाले आहे.
माझ्या मते, अशी वेळ कुणावरही येऊ नये. पण लोक जात्यंधपणामुळे असे काही करतात की, स्वतःची टीमकी वाजवण्यासाठी दुसऱ्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांची स्वतःची प्रतिमा केव्हा मलिन होते हे त्यांनाही समजत नाही. असो, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण माणूस चंद्रावर गेला तरी जातीयवाद मिटला नाही हे अंतिम सत्य आहे. कुणी कितीही आव आणला तरी मनाच्या एका कोपऱ्यात जात हा विषय असतोच.
प्रत्येक सोसायटी, गाव व गल्लीबोळात असे एकतरी घर असते तिथे माणसाला हीन समजण्याची प्रवृत्ती वाढत असते. मग या कुटुंबातील लोक डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनिअर झाले किंवा अन्य एखादे मोठे अधिकारी झाले तरी त्याला अर्थ नसतो. कारण, या लोकांना स्वतःपेक्षा दुसरे कुणीच मोठे वाटत नाहीत. आता कायद्याने सर्वचजण समान झालेत. जातीयवाद्यांना धडा शिकवण्यासाठी अॅट्रोसिटी सारखे कठोर कायदे आहेत. या कायद्यांतर्गत अटक झाली तर 6 महिने घरचे तोंड पाहता येत नाही. याशिवाय समाजात जाणारी अब्रु वेगळीच...
त्यामु्ळे माणसाने माणूस म्हणून जगण्यात जो आनंद आहे. तो कशातच नाही. हा माझा अनुभव आहे. महाराष्ट्र विशेषतः मराठवाडा साधू संतांची भूमी आहे. या भूमीत आम्ही जातीयवादाची काटेरी झुडपे वाढूच देणार नाही. ही आम्ही आमच्यासाठी घेतलेली शपथ आहे. मग आम्ही कुठेही असलो तरी संकटात असणाऱ्या आमच्या मित्रांसाठी अर्ध्या रात्री धावून जाण्याची आमची हिंमत असते. ही हिंमत कुठून येते हे आम्हालाही कळत नाही.
